संताप, ताप अन् पवारांच्या औषधोपचाराची प्रतीक्षा!


गोविंदराव आदिकांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीतील नाराजांची मांदियाळी नुकतीच नगर शहरात जमली होती. आगामी निवडणुकांत पक्षाला घवघवीत यश हवे असेल तर जे कोणत्याच निवडणुकीत जिंकून येऊ शकत नाही, त्यांच्या उपद्व्यापांना आवर घालण्याची गरज यावेळी नेत्यांनी बोलून दाखवली. या नेत्यांचा रोख जिल्हाध्यक्ष घनश्यामअण्णा शेलारांवर होता. दक्षिणेतून लोकसभेची जागा राष्ट्रवादीला जिंकायची आहे. परंतु, पक्षाला सत्तास्थाने देताना नेमका दक्षिणेवर घोर अन्याय झाला. झेडपीचे अध्यक्षपद, पक्षाच्या वाट्याचे मंत्रिपद हे उत्तरेला गेले. आ. बबनराव पाचपुतेंचे मंत्रिपद काढले गेल्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांना अलिकडे काही कामे असतील तर पालकमंत्री पिचड कुठे भेटतील, असा प्रश्‍न विचारावा लागत आहे. जिल्हाध्यक्षांवर होणारे गटबाजीचे आरोप अन् पालकमंत्र्यांचे दुर्लभ झालेले दर्शन, या बाबी राष्ट्रवादीसाठी निवडणुकांच्या मोसमात हितावह नाहीत. उलटपक्षी विरोधकांना फायदेशीर ठरणार्‍या आहेत. चढलेला ताप जालिम औषधाद्वारे उतरविण्याची पवारांना सवय आहे. नगर राष्ट्रवादीचा हा ताप पवार कधी उतरवतील? हा खरा सवाल आहे.

...........


जे स्वतः नगरपालिकेच्या निवडणुकीत निवडून येऊ शकत नाहीत, अशी माणसे पक्षाचे वाटोळे करायला निघाले आहेत. गटबाजी अन् लावालावीचे राजकारण ही मंडळी करत आहेत, अशा संतप्त शब्दांत शुक्रवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठनेते तथा राष्ट्रीय सरचिटणीस गोविंदराव आदिक यांच्या उपस्थितीत नगरमध्ये पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या ठरावीक नेत्यांच्या बैठकीत संबंधित नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. या भावनांमागे दुहीच्या राजकारणाची बिजे पेरणार्‍यांबद्दल खदखदणारा असंतोष अन् इतके दिवस दबून बसलेला परंतु अनावर झालेला पराकोटीचा संताप अन् संतापच कारणीभूत होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष घनश्यामअण्णा शेलार यांच्याबद्दल राष्ट्रवादीमधीलच काही नेत्यांनी त्यांचा नामोल्लेख टाळत हा खदखदणारा संताप चव्हाट्यावर आणला. वरवरून सर्वकाही ठीकठाक दिसत असले तरी जिल्हा राष्ट्रवादीत अलिकडे काही बरे चाललेले नाही, असे उघड करणार्‍या अनेक बाबी आहेत. फारच भिंग लावून या पक्षात पाहिले तर हा पक्ष फुटीच्याच उंबरठ्यावर असावा, असे भासते. आता जी खदखदत नगरमध्ये आदिकसमर्थकांच्या मांदियाळीतून बाहेर पडली, ती पाहाता पक्षाचे काही खरे नाही, असे दिसते. कॉंग्रेसमध्ये सध्या तरी असलेले राज्य-केंद्र समन्वय समितीचे अध्यक्ष विनायकराव देशमुखही या मांदियाळीत आवर्जुन हजर होते. पक्ष कोणताही असला तरी ते कट्टर आदिकसमर्थक आहेत, ही बाब नव्याने सांगण्याची गरज नाही. देशमुखांनीही मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने कॉंग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र येत आघाडीची गरज प्रतिपादित केली. हे सांगताना राष्ट्रवादीतील दुखर्‍या जखमेवरही त्यांनी नेमके बोट ठेवले. आदिकसमर्थकांच्या बैठकीला महापालिका निवडणुकीची किनार असली तरी, पडद्यामागचे वास्तव बरेच वेगळे आहे. भारतीय जनता पक्षाच्या संस्कृतीतून आलेले घनश्यामअण्णा शेलार यांची ताकदच काय? असा सवाल बरीच मंडळी कालपरवापर्यंत खासगीत विचारत होती. हाच सवाल कर्जत-जामखेड तालुक्याचे पक्षनेते राजेंद्र फाळके यांनी उघड उघड विचारला. पक्षाध्यक्ष शरद पवार नुकतेच जिल्ह्यात येवून गेले. कर्जत अन् जामखेड तालुक्यात त्यांचे कार्यक्रम झाले. परंतु, या सर्व कार्यक्रमातून राजेंद्र फाळके यांना मुद्दामहून डावलण्याचा उद्दामपणाही झाला. हा प्रकार कुणी केला ही बाब नेत्यांसह कार्यकर्त्यांना माहित असली तरी, ती चाणाक्ष शरद पवारांच्या नजरेतूनही सुटली नाही. त्यामुळेच या दौर्‍यात पवारांनी फाळकेंना बोलावून घेत, आपल्यासोबत, आपल्या गाडीत घेतले. पुढील निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा करत, जिल्ह्यातील पक्षाच्या परिस्थितीसह राजकीय परिस्थितीचीही माहिती घेतली. चौंडी येथील कार्यक्रमात पवारांनी पावसाबद्दल भाष्य केले होते. नैसर्गिक पाऊस त्यानंतर आता जोरदारपणे सुरु झाला. पक्षांतर्गत गटबाजींच्या तक्रारीचाही पाऊस आता धो धो बरसायला लागला आहे. आदिकसमर्थकांच्या मांदियाळीने ही बाब खासकरून चव्हाट्यावर आली. माजी पालकमंत्री आ. बबनराव पाचपुते यांचे मंत्रिपद का गेले? हा खरा तर पक्षाच्या निष्ठावंतांना सतावणारा प्रश्‍न आहे. जिल्ह्यातील दुष्काळ हाताळण्यात पाचपुते यांनी आपले सर्व कौशल्य पणाला लावले होते. ते पालकमंत्री असतानाच त्यांनी आता निवडणूक  होऊ घातलेल्या नगर शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला होता. हजारो कोटी रुपये आपल्या मंत्रिपदाच्या काळात जिल्ह्यात आणून त्याचे व्यवस्थित वाटप केले व विकास योजनांना गती दिली. परंतु, आपल्याच मंत्र्यांच्या या कामाचा प्रचार-प्रसार करण्याची जबाबदारी ज्या जिल्हाध्यक्षांसह पक्षावर होती, त्या जिल्हाध्यक्षांनी मंत्र्यांच्या या कामाचा पक्षाला फायदा होईल, असा त्याचा प्रचार-प्रसार करण्यासाठी काय केले? हा प्रश्‍न विचारला गेला तर त्याचे उत्तर अगदी नकारार्थीच येते. घनश्यामअण्णा शेलार अन् अजित पवार यांच्यातील जवळीक ही नेहमीच जिल्ह्यात चर्चेची बाब राहिली आहे. पाचपुतेंचे मंत्रिपद काढताना ज्या दक्षिणेतून पक्षाला खासदारकीची निवडणूक नुसतीच लढवायची नाही तर जिंकायचीही आहे, त्या दक्षिणेत पक्षाची सत्तास्थाने काय, याचा विचार पक्षाच्या नेत्यांनी कधी केला का, हा प्रश्‍न आता उपस्थित होतो. पक्षाकडे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आहे तेदेखील उत्तरेतच आहे. पक्षाकडे एक मंत्रिपद आहे तेदेखील आता उत्तरेकडेच गेले. उत्तरेत कॉंग्रेसचे दोन अन् राष्ट्रवादीचा एक असे तीन मंत्रिपदे गेलीत. दक्षिणेला झेडपीच्या उपाध्यक्षपदाशिवाय काय मिळाले? असा प्रश्‍न उपस्थित केला गेला तर त्याचेही उत्तर नकरार्थीच येईल. शरद पवारांनी दक्षिणेची जागा काढण्यासाठी कामाला लागा, असे आदेश दिले आहेत. आदिकांच्या नेतृत्वाखाली एकवटलेले नेते कामाला लागले आहेत, परंतु त्यांचा एकंदरित सूर पाहाता त्यांचे कामाला लागणे कोणते अन् कुणासाठी?, ही बाब पुरेशी लक्षात येते. लोकसभेसाठी दक्षिणेतून आ. पाचपुतेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यात जमा आहे. प्रश्‍न असा, की आ. पाचपुते हे मैदानात असतील, की त्यांच्या आग्रहास्तव विक्रमसिंह पाचपुते हे मैदानात असतील, हे पाहावे लागणार आहे. पक्षासाठी नगर महापालिका निवडणूक ही लिटमस टेस्ट असून, त्यातून आगामी निवडणुकांची दिशा अन् पक्षाची दशाही स्पष्ट होईल. तथापि, सध्या तरी पक्षात फारसे ऑलवेल नाही. ज्येष्ठनेते शरद पवार व अजित पवार यांनी नगर राष्ट्रवादीत खास लक्ष घालून योग्य ते बदल किंवा योग्य त्या दुरुस्त्या केल्या नाही तर निवडणुका जिंकणे तर दूरच; उलटपक्षी पक्षातील फाटाफूट रोखण्यासाठी शक्तीपणाला लावण्याची वेळ त्यांच्यावर येईल. काल-परवाच्या बैठकीत जिल्ह्यातील नेत्यांची तळमळ, संताप अन् जिल्हाध्यक्षांविषयी असलेल्या संतप्त भावना गोविंदराव आदिकांना कळाल्याच आहेत. या भावना ते पवारांच्या कानावर घालतीलतच. त्यानुसार, निवडणुकांपूर्वी योग्य त्या दुरुस्त्या होतील, अशी अपेक्षा नेत्यांसह कार्यकर्त्यांना आहे. आदिवासी विकास व पालकमंत्री म्हणून मधुकरराव पिचडांना मंत्रिपद मिळाल्यानंतर दक्षिणेतील जागा जिंकून आणण्याचीही जबाबदारी पिचडांवर आली होती. परंतु, पिचड अन् पाचपुते यांच्यातील काम करण्याच्या पद्धतीतील फरकही आता कार्यकर्त्यांना जाणवू लागला आहे. पालकमंत्री कुठे भेटतील? हा प्रश्‍न पाचपुते हे पालकमंत्री असताना कधी कुण्या कार्यकर्त्याने विचारला नव्हता. तो प्रश्‍न आता कार्यकर्त्यांची छळवणूक करत आहे. ना. पिचडांना भेटायचे म्हणजे कुठे जायाचे? मुंबईत, अकोलेत की नगरला ते कधी येईल, याची वाट पाहायाची, अशी कार्यकर्त्यांची दशा झाली आहे. पूर्वी जिल्हा परिषद असो, की जिल्हाधिकारी कार्यालय बैठकांचे सत्र चालायचे. पालकमंत्री म्हणून पाचपुते हे सातत्याने बैठका घेऊन लोकांची प्रश्‍ने मार्गी लावत असत. आता नवे पालकमंत्री पिचड हे जिल्ह्यात फार क्वचित दिसत असून, त्यांच्याकडे कामे घेऊन जायाची म्हणजे ते पहिल्यांदा नगरमध्ये कधी असतील याची दहा ठिकाणी विचारपूस करावी लागत आहे. लोकसभेला सामोरे जाताना आधीच दक्षिणेला सत्तास्थाने देताना पक्षनेतृत्वाने अन्याय केला. त्यातच पालकमंत्र्यांचेही दर्शन दुर्लभ झाल्याने कार्यकर्त्यांच्या भावनांचा योग्य पातळीवर विचार होईल किंवा नाही हा प्रश्‍न असून, तो वेळीच सोडवावा लागणार आहे. 
.....

हातात हात अन् पायात पाय!

दुही अन् गटबाजीचे राजकारण हा मराठा राज्यकर्त्यांना शापच आहे. एकमेकांच्या हातात हात देताना पायात पाय घालण्याची सवय काहींना असते. मराठ्यांचा इतिहास पाहाता घरभेदींची संख्या कमी निघणार नाही. बबनराव पाचपुतेंचे मंत्रिपद घालविण्यासाठी ज्यांनी राजकीय दुहीची बिजे पेरलीत, त्याच नेत्यांनी कार्यकर्ते, स्थानिक जनाधार असलेले नेते त्यांच्यातही दुहीची बिजे पेरून पक्ष खिळखिळा केल्याची बाब प्रकर्षाने जाणवते. उडत्या पक्षाची पिसे मोजणारे शरद पवारांसारखे जाणते नेतृत्व ही बाब हेरणार नाही, असे नाही. काही बाबी त्यांच्याही कानावर गेल्या आहेत. परंतु, ताप पूर्ण चढल्यानंतर त्यावर जालिम औषध देण्याची पवारांना सवय आहे. आता नगर राष्ट्रवादीत जे खदखदते आहे. त्यावर पवारांकडून निश्‍चित औषध दिले जाईल. परंतु, हा ताप योग्य त्या पातळीवर चढण्याची वाट कदाचित पवार पाहात असावेत, असा एक सूर ज्येष्ठ कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.
.....

गटबाजी आवरावीच लागेल

नगर शहर राष्ट्रवादीने शिवसेनेला आंदण दिले आहे का? असा एक जळजळीत सवाल नेहमीच नगरकर उपस्थित करत असतात. विधानसभेसाठी नगरमधून वारंवार शिवसेनेचा आमदार निवडून येतो. महापालिकेची सत्ताही शिवसेना-भाजपकडे जाते. या परिस्थितीला केवळ पक्षांतर्गत गटबाजी व अंतर्गत विरोध याच बाबी कारणीभूत आहे. शिवसेनेला सोयीस्कर होईल, असे राजकारण शहरात खेळले जाते. तीच बाब जिल्ह्यातील बहुतांश मतदारसंघातही लागू होते. कर्जत-जामखेड मतदारसंघातून राजेंद्र फाळके यांचा झालेला पराभव अन् गतवेळेस लोकसभेसाठी पक्षाच्या उमेदवाराचा झालेला पराभव या बाबी त्याच्याच द्योतक आहेत. स्वपक्षातील नेत्यांची जिरवाजिरवी करताना विरोधकांना बळ देण्याचे काम जोपर्यंत होत राहील, तोपर्यंत पक्षाची ताकद वाढणे तर दूरच परंतु, वाताहतच निश्‍चित आहे. ही वाताहत थांबवायची असेल तर गटबाजी आवरावी लागेल, अन् त्यासाठी दोन्ही पवारांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा लागणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खसखसच्या शेतीचे वास्तव!