छोटे दादा, की मोठे दादा?


मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी जिल्ह्यातील पक्षनेत्यांची लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक घेतली अन् नगर दक्षिण मतदारसंघाची लढत अगदी स्पष्टच झाली. पवारांच्या नजरेत आ. बबनराव पाचपुते हेच सध्या तरी लोकसभेसाठी संभाव्य उमेदवार आहेत. पवारांचा ‘कामाला लागा’ हा आदेश नेहमीप्रमाणे त्यांच्या निकटवर्तीयांना प्राप्त झाला असून, ते नेते कामाला लागले आहेत. दक्षिणेची उमेदवारी पाचपुतेंना मिळणार असली तरी, ती शेवटच्याक्षणी नेमकी आ. बबनराव पाचपुतेंना मिळते, की विक्रमसिंहांना, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. राजकारणात ठरवून काही घडवून आणले जात असते. दक्षिणेतील पक्षांतर्गत व बाह्य राजकीय समिकरणे काहीही असली तरी, ही जागा जिंकणे हे पवारांचे ध्येय आहे. या ध्येयसाध्यासाठी पवार नेमका कोणता गेम खेळणार हे कालौघातच कळेल. पवारांनी पाचपुतेंना उमेदवारी देण्याचे दृढसंकेत देत, सध्या तरी धुसर असलेले राजकीय चित्र पुरेसे ठसठसीत केले आहे.

........

लोकसभेचा नगर दक्षिण मतदारसंघ अखेर अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेच राहणार आहे. तसा स्पष्ट निर्वाळा मुंबईतील पक्षनेत्यांच्या बैठकीत पक्षाध्यक्ष तथा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिलाच आहे. काल-परवा शिर्डीत येवून गेलेले प्रदेशाध्यक्ष आ. भास्कर जाधव यांनीही मतदारसंघ बदलाबाबत वावड्या उठविणार्‍यांना चिमटा काढत, हा मतदारसंघ पक्षाकडेच राहणार असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले. जिल्ह्याचे राजकारण सध्या दक्षिणेतील या मतदारसंघावर केंद्रीत झाले आहे. राष्ट्रवादीकडे या मतदारसंघातून लोकसभा लढविण्यासाठी अनेकजण इच्छुक असले तरी बारामतीचा पांडुरंग कुणाला पावतो, हा खरा प्रश्‍न उरतो. पंढरीच्या पांडुरंगाच्या वारीचा दीर्घ वारसा असलेल्या पाचपुते कुटुंबीयांना गोरगरीबांचा तो पांडुरंग पावत आला. त्यामुळेच बबनराव पाचपुते हे शुन्यातून राजकीय अस्तित्व निर्माण करू शकले. पंढरीच्या पांडुरंगाप्रमाणेच बारामतीच्या पांडुरंगानेही कधी पाचपुतेंना दूर केले नाही. त्यामुळे लोकसभेचे तिकीट हे पाचपुते पिता-पुत्रांपैकी कुणा एकाला मिळणार हे स्पष्टच आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या बैठकीचाही तोच कौल होता. परंतु, लोकसभेचा उमेदवार कोण? छोटे दादा की मोठे दादा, हाच तेवढा प्रश्‍न आता उरला आहे. याच आठवड्यात पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची मुंबईत पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत नगर दक्षिणेबाबत सांगोपांग चर्चा झाली. पक्षाच्या सातपैकी पाच तालुकाध्यक्षांनी लोकसभेची उमेदवारी आ. बबनराव पाचपुते यांना द्यावी, अशी गळ पवारांना घातली होती. जिल्ह्यात यावर्षी अभूतपूर्व असा दुष्काळ पडून गेला. हा दुष्काळ निवारणासाठी व दुष्काळग्रस्त जिल्हावासीयांना दिलासा देण्यासाठी पालकमंत्री म्हणून आ. पाचपुते यांनी केलेल्या कामाचे खुद्द शरद पवार यांनीच कौतुक केले. खासगीतील बैठकीत पवारांनीच लोकसभेसाठी कामाला लागा, असा आग्रह आ. पाचपुतेंना धरला. परंतु, आ. पाचपुते हे लोकसभेसाठी फारसे इच्छुक नसून, विक्रमसिंहांसाठी ते आग्रही आहेत. त्यामुळे लोकसभेची उमेदवारी आ. पाचपुते, की विक्रमसिंह पाचपुते यांच्यापैकी कुणा एकाला मिळणार असली तरी नेमके कोण मैदानात असेल, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. पक्षातर्फे लोकसभा उमेदवारीचे आश्‍वासन घेऊन माजी आ. राजीव राजळे हे राष्ट्रवादीत आल्याचे सांगितले जाते. परंतु, मुंबईतील बैठकीनंतर सध्या राजळेदेखील शांत दिसत आहेत. उमेदवारीसाठी आपण फार उतावीळ नव्हतो, अशी त्यांची नेहमीच भूमिका राहिली आहे. शिवाय, मुंबईतील बैठकीतच पक्ष देईल तो उमेदवार निवडून आणू, अशी ग्वाहीच राजळे यांनी पवारांना दिली होती. आता समोर आलेल्या चित्राप्रमाणे उद्या कदाचित सामना रंगलाच तर तो विद्यमान खा. दिलीप गांधीविरुद्ध पाचपुते असा रंगेल, असेच काहीसे संकेत या घडीला मिळत आहेत. पालकमंत्री तथा आदिवासी विकासमंत्री राहिलेल्या आ. पाचपुतेंचे मंत्रिपद जाणे ही जिल्हावासीयांसाठी थोडी धक्कादायकच बाब होती. परंतु, शरद पवारांच्या या राजकीय खेळीचे पदर आता उलगडत आहेत. माजी प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी पुढची विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे, त्यांच्या अकोले मतदारसंघातून त्यांचे पुत्र निवडणूक लढविणार आहेत, त्यामुळे शेवटचे सव्वावर्ष या ज्येष्ठ नेत्याच्या अनुभवाचा फायदा त्यांना लाल दिव्याची गाडी मिळू देण्यात झाल्याचे दिसते. ना. पिचड १९९९ मध्ये पहिल्या टर्ममध्ये कॅबिनेट मंत्री होते. त्यानंतर आता त्यांच्या गळ्यात पुन्हा एकदा मंत्रिपदाची माळ पडली. परंतु, आ. पाचपुते अन् ना. पिचड यांच्यातील फरक दस्तरखुद्द कार्यकर्त्यांनाच जाणवू लागला असून, पाचपुतेंवर टिका करणार्‍यांना ना. पिचडांचे दर्शनच दुर्लभ झाल्याने या मंडळींना आ. पाचपुतेंची सहज उपलब्धता आता लक्षात आली असेल. आ. पाचपुते हे मंत्री असताना जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसाठी सहज उपलब्ध होत होते. दांडगा जनसंपर्क व प्रभावी संपर्क जाळे यामुळे अगदी राजकीय विरोधकांनाही सहजपणे त्यांच्यापर्यंत पोहोचता येत होते. आता पालकमंत्र्यांकडे काही काम असेल तर त्यांना भेटायचे कुठे? हा प्रश्‍न पडतो. राजकारणात बर्‍याचवेळा बर्‍याच गोष्टी ठरवून होत असतात. लोकसभेसाठी आकड्यांचा खेळ लक्षात घेता, खासदारांची संख्या वाढविण्यासाठी शरद पवारांनी जास्तीत जास्त जागा जिंकून आणण्याचे उद्दीष्ट ठरवले आहे. नगर दक्षिणेची जागा जिंकणे हा पवारांचा इरादा पक्का असून, त्यासाठी आ. बबनराव पाचपुते यांना मैदानात उतरविण्याचा त्यांचा मानसही पक्का आहे. श्रीगोंद्यात पाचपुतेविरोधकांनी बांधलेली राजकीय मोट पाहाता, तसेही पाचपुतेंना विधानसभेपेक्षा लोकसभेची निवडणूक जिंकणे सोपे जाईल, हे स्पष्टच आहे. खरे तर, दिल्लीचे तख्त अन् त्याने हुलकावनी देणे ही मराठी माणसासाठी नवखी बाब नाही. यापूर्वी स्व. यशवंतराव चव्हाणांना हा कटू अनुभव आलाच होता. तोच अनुभव गत काही दशकांपासून ज्येष्ठनेते शरद पवार घेत आहेत. ’शरदबाबू पंतप्रधान होत असतील तर त्यांना आमचा पाठिंबा असेल’, अशी भूमिका दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच घेतली होती. परंतु, शिवसेना अन् राष्ट्रवादीचे संख्याबळही राज्याच्या शरदबाबूंना पंतप्रधान करण्याइतके कधी झाले नाही. एच. डी. देवेगौडा किंवा इंद्रकुमार गुजरालसारखे कमी संख्याबळातही पंतप्रधान बनून गेले. परंतु, शरद पवारांचे पंतप्रधानपदाचे स्वप्न अद्याप तरी साकार झाले नाही. खरे तर दिल्लीचे तख्त काबिज करणे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न होते. दुर्देवाने महाराजांना तितकेसे आयुष्य लाभले नाही. अन् महाराजांचे हे स्वप्न साकार होऊ शकले नाही. आता शरद पवार जर राजकीय चमत्काराने पंतप्रधान होत असतील तर महाराजांचे स्वप्न सत्यात उतरू शकते, अशी एक भाबडी आशा मराठी माणसाला लागून आहे. खुद्द पवारही आकड्यांच्या गोळाबेरीजात आपले पारडे जड असावे म्हणून आतापासून कामाला लागले आहेत. त्यादृष्टीने नुकतीच मुंबई येथे झालेली बैठक ही महत्वपूर्ण मानता येईल. दक्षिणेचा गड काबिज करायचा आहे कामाला लागा, असा आदेश पवारांनी जिल्ह्यातील नेत्यांना दिलाच आहे. पवारांच्या कामाला लागा या आदेशाचा प्रत्येक नेत्याने आपआपल्या परीने अर्थ घेतला असून, प्रत्येक नेता अलिकडे कामाला लागल्याचे दिसून येते. दक्षिणेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चांगलेच वर्चस्व आहे. पारनेर, नगर, पाथर्डी-शेवगाव, कर्जत-जामखेड अन् श्रीगोंदा या तालुक्यात पक्षाला अन् पवारांच्या नेतृत्वाला मानणारा मोठा वर्ग आहे. काही तालुक्यात विरोधी पक्षाचे आमदार असले तरी तेथे पक्षाचे स्थानिक नेतृत्व राजकीयदृष्ट्या वजनदार आहे. प्रश्‍न असा पडतो, की याला हा चालतो, त्याला तो चालत नाही. पक्षांतर्गत कुरघोडीचा एवढाच एक मुद्दा सोडला तर बाकी पक्षाचा उमेदवार पडावा, असे चित्र अजिबात या भागात नाही. या पक्षांतर्गत कुरघोडीवर पवार काय उतारा काढतात, हे पाहणे मात्र नजीकच्या काळात महत्वाचे ठरणारे आहे. सध्या तरी मुंबईतील बैठकीत श्रेष्ठींनी जो उमेदवार दिला त्याला निवडून आणू असा शब्द जिल्ह्यातील नेत्यांनी पवारांना दिला आहे. आता पवारांचा रोख जर बबनराव पाचपुते यांनी उमेदवारी करावी असा असेल तर जिल्ह्यातील नेत्यांना पाचपुतेंच्या विजयासाठी प्रयत्न करावेच लागतील. नाही तर त्याची भरपाई पाठोपाठ येणार्‍या विधानसभा निवडणुकीत वसूल होईल, हे उघडच आहे. लोकसभेसाठी माजी आ. राजीव राजळे हेदेखील इच्छुक आहेत. पक्ष जोपर्यंत अधिकृत उमेदवारी जाहीर करत नाही, तोपर्यंत इच्छुक म्हणून शर्यतीत राहणे तसेही गैर नाही. घनश्यामअण्णांनाही लोकसभेसाठी उमेदवारी मिळावी, असे वाटणे तसे काहीच गैर नाही. युवानेते म्हणून विक्रमसिंहांनीही लोकसभेसाठी दावेदारी ठोकणे हेही काहीच वावगे नाही. पक्षनेत्यांना दक्षिणेची जागा हवी आहे अन् त्यासाठी दिलेला उमेदवार विजयी करणे हेच जिल्ह्यातील नेत्यांचे प्रमुख लक्ष्य असेल असे या नेत्यांनी पवारांना आश्‍वासित केलेले आहे. दक्षिण मतदारसंघात यावेळेसही भाजपविरुद्ध राष्ट्रवादी अशीच परंपरागत लढत रंगेल. परंतु, या लढाईची खरी गंमत ही असेल, की लढणारे मोहरे मात्र तेच ते राहण्याची दाट शक्यता फारच कमी आहे. विद्यमान खासदार हाच पुढील उमेदवार असतो, असे एक सूत्र भाजप सहसा पाळत असते. ज्यांची नावे संभाव्य उमेदवार म्हणून घेतली जावू शकत होती त्या नेत्यांना जिल्हाध्यक्ष अन् शहर-जिल्हाध्यक्षपदावर बसविण्यात आले असून, त्यांच्या खांद्यावर नगर महापालिकेची जबाबदारीही देण्यात आली आहे. या नेत्यांपैकी जिल्हाध्यक्ष ऍड. प्रतापकाका ढाकणे हे लोकसभेसाठी संभाव्य उमेदवार असले तरी त्यांच्यापेक्षा कुणी मराठा उमेदवार मिळतो का, याचा शोध भाजप घेत आहे. पक्षातील मराठा उमेदवार मिळाला नाही तर दुसर्‍या पक्षातील तरी फोडता येतो का, यावर भाजपनेते जोर देणार आहेत. पाण्यात जाळे टाकून बसलेल्या भाजपच्या जाळ्यात जाण्यासाठी काही मुत्सद्दी मासे तसेही तयार आहेतच. त्यामुळे लढत स्पष्ट असली तरी लढतीतील मोहरे मात्र वेगळे असेल, असे राजकीय धुरीणांकडून व्यक्त होत असलेले मत फारच बोलके वाटते. उद्या, आ. बबनराव पाचपुतेंचा वाढदिवस. त्यांना लोकसभेच्या विजयासाठी इनऍडव्हान्स शुभेच्छा देत आहोत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खसखसच्या शेतीचे वास्तव!