‘नालायकांची’ साथ सोडणे म्हणजे ‘मध्यावधी’!
- फोकस/ पुरुषोत्तम सांगळेराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व राज्यातील जाणकार नेते शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ‘नालायक’ लोकांची संगत सोडण्याचा सल्ला दिला आहे. हा सल्ला वडिलकीच्या नात्याने खचितच दिला नसेल; राजकीय भूमिकेतूनच तो दिला गेला असेल, असे वाटते. पवारांच्या मनात काय आहे, हे कधीच महाराष्ट्राला सहजासहजी कळले नाही. परंतु, सरकार पाडण्याचा पवारांचा अनुभव तसा दांडगा आहे. उद्धव यांनी उद्या कथित नालायकांची साथ सोडलीच तर महाराष्ट्राला मध्यावधीला सामोरे जावे लागेल. त्याचा फायदा पवारांपेक्षा शिवसेनेलाच होईल, हे सांगण्यासाठी कुण्या ज्योतिष्याची गरज नसावी!
---
एकवेळ मासा पाण्याशिवाय जीवंत राहू शकेल; परंतु शरद पवार सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, असे गमतीने म्हटले जाते. ते कदाचित खरेही असेल. परंतु, सत्ता गेल्याचे शल्य पवारांना कधी जाणवले नाही. सत्ता गेली तशी त्यांनी आपल्या चाणाक्षपणे आणलीही. आतादेखील मोदी लाटेच्या भंपकगिरीत पवारांची राज्यातील सत्ता गेली. ही भंपकगिरी दोन वर्षातच उघड पडल्याने गेलेली सत्ता परत येण्याचे संकेतही मिळत आहेत. शरद पवारांना अडथळा काय वाटत असेल तर तो म्हणजे शिवसेनेचा! पुढील काळात भाजप अन् शिवसेना सोबत राहणे पवारांना परवडणारे नाही. एकवेळ शिवसेना सत्तेत आली तरी चालेल; परंतु भाजप नको! हा पवारांचा इरादा दिसतो. त्यामुळेच त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना त्यांच्याच शब्दांची आठवण काल करून दिली. उद्धव म्हणाले होते, हे सरकार नालायकांचे आहे. मग् आता उद्धव या नालायकांच्या सोबतीला का राहतात? असा सवाल परवा पवारांनी विचारला. भाषणाच्या ओघात पवार बोलून गेले, असे त्याचा साधा सरळ कुणी अर्थ घेऊ नये. पवार असे साधेपणाने कधीच काही बोलत नसतात. आगामी राजकीय घडामोडींची नांदीच त्यांच्या बोलण्यातून उमटत असते. उद्धव यांनी एकदा भाजपची साथ सोडली, की हे राज्य मध्यावधी निवडणुकीलाच सामोरे जाईल. सद्या राज्यात विद्यमान सरकारविषयी प्रचंड नाराजी खदखदत असून, या नाराजीच्या लाटेत भाजपचा पार पालापाचोळा होणार आहे. या बदलत्या वातावरणाचा पवारांना जितका फायदा अपेक्षित आहे. त्यापेक्षाही जास्त फायदा हा शिवसेनेला होणार हे अगदी उघड सत्य आहे. तो पवारांनाही चालणारा आहे. उद्या सत्ता स्थापन्याची गरज पडलीच तर पवार शिवसेनेच्या पाठीमागेही उभे राहू शकतात. कारण, पवारांना राजकारणात कुणीही अस्पृश्य नाही. म्हणूनच जेव्हा शिवसेनेने भाजपला वेशीवर उभे केले होते, तेव्हा चाणाक्षपणे भाजपला सत्ता स्थापण्यास सहकार्य हे पवारांनीच केले होते. आज मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस जे दिसतात, तीही केवळ पवारांचीच कृपा आहे हे विसरून चालणार नाही. काँग्रेसचे अस्तित्व संपविण्यासाठी पवारांनी राजकीय धुर्तता दाखवली; तद्वतच शिवसेनेचे अस्तित्व संपविण्यासाठी भाजपने रणनीती आखलेली आहे. काँग्रेस राज्यात तरी अस्तित्वहीन होणे ही जशी पवारांची गरज आहे, तसेच शिवसेना मजबूत स्थितीत असणे हीदेखील पवारांची गरज आहे. कारण, विरोधक म्हणून शिवसेना पवारांना परवडते, भाजप नाही. शिवसेनेने कधीही पवारांच्या मूळस्थानावर घाला घातला नाही. ते काम भाजपच्या काळात झाले. त्यामुळेच सत्ता शिवसेनेच्या वाट्याला गेली तरी चालेल. भाजप राज्यात मोठा होणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणे आहे, हे न कळण्याइतपत पवार नक्कीच अडाणी नाहीत.
--
सरकार पाडणे हाच पवारांचा इतिहास
गेल्या काही महिन्यांपासून शरद पवार राज्यातच सक्रीय झाले आहेत. त्यांच्या डोक्यात काय शिजते आहे, याचा अंदाज अद्याप कुणाला आला नाही. परंतु, ज्या प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना जेलमध्ये घालण्याच्या धमक्या देत आहेत. तो प्रकार पाहाता सत्ता नसल्याचे धोके पवारांच्या निदर्शनास आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वाधिक बदनामीही फडणवीस यांनीच केली. तेव्हा डॅमेज कंट्रोल करणे आणि भाजपविषयी जनमाणसात असलेल्या नकारात्मक लाटेचा फायदा उचलणे यासाठी सद्या शरद पवारांच्या प्रयत्नांना वेग आला आहे. भाजपच्या सत्तेचा पवारांना जसा धोका वाटतो, तसा तो शिवसेनेलाही वाटतो. कारण, सत्तेच्या माध्यमातून शिवसेनेच्या अस्तित्वालाच धक्का पोहोचविण्याचे काम सुरु आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या प्रकारे हा पक्ष बांधला, त्याचे अस्तित्व निर्माण केले आणि एक कडवट पक्ष म्हणून जनमाणसात बिंबवला. त्या प्रतिमेलाच धक्के देण्याचे काम भाजपचे धुरीण करत आहेत. शिवसेना सत्तेत आहे की विरोधी पक्षात, ही या पक्षाची अवस्थादेखील याच राजकीय अनिश्चिततेतून निर्माण झालेली आहे. शिवसेनेलाही मजबूत पक्ष म्हणून पुढे येण्यासाठी मुळावर आलेले हे सरकार उलथविण्याशिवाय पर्याय नाही. अन् सत्ता उलथविण्याचा दीर्घ अनुभव पवारांइतका अन्य कुणाला नाही. 1978 आणि 2014 मध्ये अशाप्रकारे पवारांनी काँग्रेसची सरकारे पाडलीच होती. आघाडी झाली असती तर पुन्हा सत्ता आली असती, असे एक विधान परवा राष्ट्रवादीच्या मुंबईतील वर्धापनदिन कार्यक्रमात पवारांनी केले होते. परंतु, शिवसेना-भाजपची काडीमोड होताच राष्ट्रवादीनेच सर्वप्रथम आघाडी तोडल्याची घोषणा केली होती. हे मराठी जनता विसरलेली नाही. युती तुटताच राजभवनावर जाऊन राष्ट्रवादीनेच सरकारला दिलेला पाठिंबा मागे घेत असल्याचेही पत्र दिले होते. आता शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना नालायकांची सोबत सोडण्याचा दिलेला सल्ला पाहाता, हे सरकार कोसळविण्यासाठी पवारांचे प्रयत्न सुरु झालेत, असाच त्याचा अर्थ होतो. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून आपला प्रभाव पाडू शकले नाहीत. राज्यातील दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, कामगार व उद्योजकांचे प्रश्न अशा सर्वच मुद्द्यांवर या सरकारची कामगिरी अत्यंत नकारात्मक आहे. सरकारविषयी जनमाणसातील संताप आपल्याच पथ्यावर कसा पडेल, याचा विचार करणार नाहीत, ते शरद पवार कसले?
------------------------------

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा