होय, सरकारचा माज उतरवावाच लागेल!
पुरोगामी महाराष्ट्र ही या राज्याची खरी ओळख. शेतकर्यांच्या, कष्टकर्यांच्या घामाने समृद्ध झालेल्या या राज्याला विचाराचा दीर्घ वारसा आहे. यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांनी या राज्याला विकासाच्या शिखरावर नेऊन पोहोचविले. त्यांच्या काळात पोलिस कधीही कानाच्या वर गेले नाहीत. या नेत्यांचा धाक पोलिसांवर होता. आताचे राज्यकर्ते चव्हाण, पवारांचा वारसा चालविणारे आहेत. परंतु, या राज्यकर्त्यांचा पोलिसांवर कोणताही वचक नसून, काही रक्ताचा वारसा चालविणारे दादा नेते तर पोलिसांना शेतकर्यांवरच गोळीबार करण्याचे आदेश देतात, याला काय म्हणावे. या राज्यात कायदा व सुव्यवस्था नावाचा काहीही प्रकार शिल्लक उरला नाही. दरोडेखोर महिलांच्या इज्जतीचे सामूहिक लचके तोडत आहेत, राज्य बॉम्बस्फोटांनी हादरून गेले आहे. गुंडपुंडांनी डोके वर काढले आहे. त्यांना वठणीवर आणण्यासाठी पोलिसांच्या बंदुकाच काय पण दांड़ुकेदेखील चालत नाही. शेतकर्यांवर अन्याय करणार्या या सरकारचा माज आता उतरवावाच लागणार आहे. आता हा माज मतदान यंत्राव्दारेच उतरावा लागेल.
..
वारंवार सत्तेत राहिल्याने राज्यकर्त्यांना मुजोरी चढते. सत्तेची गुर्मी डोक्यात शिर...