ऋतुराजाची चाहूल
जंगल, माळरानावर पळस फुलला अन् अंतर्मनाला आतल्या आत साद घालणारा वसंतोत्सव सुरु होण्याची वेळ आली। वसंत आणि संत यांचे काम सारखेच असते। संत जीवन फुलवून टाकतात, तर वसंत मन फुलवतो। पळस फुलला, की वसंताची चाहूल लागते. ही चाहूल निसर्गासह मनाला आणि तनाला भुरळ घालते. ही भुरळ जीवन सुखावह करणारी आणि सततच्या दगदगीतून विरंगुळा देणारी आहे. त्यासाठी सिमेंटच्या जंगलात राहणार्या मानव नावाच्या दोन पायाच्या प्राण्याला निसर्गात जावे लागेल. निसर्गाशी गुजगोष्टी कराव्या लागतील, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे निसर्गाचे मन समजावून घ्यावे लागेल. प्रियकराची आतुरतेने वाट पाहणारी प्रेयसी प्रियकराला पाहताच भावविभोर होते. ही भावविभोर अवस्था तिचे मन आणि तन दोन्ही प्रियकरात एकरुप करुन टाकते व साजरा होतो एक आनंदोत्सव. हा आनंदोत्सव साजरा करायचा असेल तर आता योग्य घटिका समीप आली आहे. त्यासाठी वसंतोत्सवाच्या रंगात न्हाहण्यासाठी, निसर्गाच्या प्रेमात पडण्यासाठी जंगलाकडे जायाला हवे. संत दर्शनाने जीवन कृतार्थ होत असेल परंतु वसंत दर्शनाने जीवन हर्षोल्हासित होईल. सिमेंटच्या खुराड्यात राहणार्यांसाठी चांगली पर्वणी निसर्गाने आणली. वस...