पवार, पॉवर आणि राजकारण!


फोकस/ पुरुषोत्तम सांगळे
निवासी संपादक


शरद पवार जेव्हा शांत भासतात तेव्हा त्यांचे खरे तर प्रचंड काम सुरु असते. पवारांच्या पॉवरची कल्पना अद्याप कुणालाही आली नाही. कालच्या मोदीभेटीमागचे कारण अद्याप कुणालाही कळलेले नाही. या भेटीची फारच त्रोटक माहिती पवारांनी दिली. ही भेट कशासाठी होती, हे नजीकच्या काळात थेट परिणामांनीच दिसून येईल. पवार, त्यांची पॉवर आणि त्यांचे राजकारण हे सगळेच अनाकलनीय असते. आताही मराठा आरक्षण, मराठ्यांचे मोर्चे आणि सत्ताधार्‍यांची वाटचाल या सर्वच विषयांवर पवारांनी ‘शांतते‘च्या काळात केलेले काम दिसून येईल. मोदींच्या भेटीमागचा हाच अन्वयार्थ आहे.
----
भगवानगडावरील मेळाव्यावरून आणि त्या कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री महादेव जानकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना शिवराळ भाषा वापरल्याने राज्यात जेव्हा वातावरण पेटले होते; तेव्हा राज्याचे जाणकार नेते शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यात मश्गुल होते. या भेटीसाठी खुद्द पंतप्रधानांनीच पवारांना बोलावणे पाठविले होते. भेटीचा फारच त्रोटक तपशील खुद्द पवारांनी जाहीर केला असला तरी, मोदी यांनी मात्र अवाक्षरही न काढता मौन पाळले आहे. पवारांच्या अलिकडच्या काळात झालेल्या प्रत्येक भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असेच मौन पाळले. परंतु, त्यानंतरच्या काळात राज्यात आणि देशात काही घडामोडी मात्र निश्‍चितच पहावयास मिळाल्यात. राज्यातील मराठा समाजाचे लाखालाखाने निघणारे मोर्चे हे भाजपचे शीर्ष नेतृत्व म्हणून मोदी यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे. गुप्तचर यंत्रणांनी या मोर्चांबाबतचे तपशील मोदींना कळवलेलेच होते. परंतु, तरीही अशा तपशीलांवर विश्‍वास ठेवण्यापेक्षा खुद्द पवारांकडूनच माहिती जाणून घ्यावी व हे मोर्चे रोखण्यासाठी काय करायला हवे, याबाबतची सल्लाही घ्यावा, अशी काहीशी योजना मोदींच्या डोक्यात घोळत असावी, असा एक राजकीय तर्क अनेकांनी व्यक्त केलेला आहे. परंतु, तो तितकासा खरा नसावा. केवळ एवढ्या एका कामासाठी मोदी हे पवारांची भेट घेणार नाहीत. अनेक मुद्दे या चर्चेत चर्चेला आले असावेत, आणि अनेक मुद्द्यांवर मोदींनी पवारांचा सल्ला घेतला असावा, असा दुसरा एक तर्क राजकीय धुरीण बोलून दाखवितात तो खरा वाटतो. मराठा आरक्षणाचा विषय न्यायालयात असला तरी काही संसदीय आयुधे यानिमित्ताने मोदींनी तपासून पाहिली असतील, असे तर्कटही मांडले जात आहे. पवारांची अन् मोदींची दिल्लीत भेट झाली आणि दुसर्‍याच दिवशी आर्थिक मागास विद्यार्थ्यांना असलेल्या ईबीसी सवलतीची मर्यादा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहा लाखापर्यंत वाढविण्याचा निर्णय जाहीर केला. हा निर्णय मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा आहे. मी अगोदरच नमूद केल्याप्रमाणे पवार-मोदी यांची भेट होते; तेव्हा राज्यात काही तरी घडामोड होत असते. ईबीसी मर्यादा वाढविण्याची मोठी घडामोडही याच भेटीनंतर झाली, हे लक्षात घ्यावे लागेल. सरकारच्या या निर्णयाचा फायदा जसा मराठा समाजाला होणार आहे, तसाच तो ब्राम्हण समाजालाही होणार आहे, इतर उच्चवर्णीय समाजालाही होणार आहे.
शरद पवार आणि मोदींची भेट होण्यापूर्वी काही घटनाही घडल्या होत्या. त्याकडेही लक्ष द्यावे लागेल. दसरा मेळाव्यानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘युती तोडा, अंगावर या‘ अशी धमकी भाजपला दिली होती. अर्थात ही धमकी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने देण्यात आली. यदाकदाचित तसे झाले, युती तुटली आणि भाजपने स्वबळावर निवडणूक लढविली तर काय घडू शकते, याचा अंदाज सर्वच पक्षांची इत्यंभूत माहिती ठेवणार्‍या पवारांना नसेल तर मग अन्य दुसर्‍या कुणाला असू शकेल? हा अंदाजही मोदींनी जाणून घेतलेला असावा. दुसरीकडे, राज्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी भगवानगडाच्या पायथ्याशी प्रचंड शक्तिप्रदर्शन केले होते. त्यांच्या जाहीर भाषणात मी माझ्या भावांना लालदिवा दिला, मंत्रिपदे दिली, असा दावा केला गेला. भाजपच्या सहयोगी पक्षांना ज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत, रासपचे महादेव जानकर यांचा समावेश आहे. या मंडळींना जर पंकजाने लालदिवा दिला असेल तर मग् भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय काम केले? दुर्देवाने राज्याचे मुख्यमंत्री हे ब्राम्हण समाजासारख्या अत्यल्प समाजाचे आहेत. ते मास लीडर नाहीत. तर पंकजा मुंडे-पालवे या वंजारी समाजासारख्या बहुसंख्य समाजाच्या आहेत, आणि त्यातही वडिलांच्या पुण्याईमुळे त्या मास लीडरही आहेत. केवळ आणि केवळ मोदींमुळेच फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकलेत. जेव्हा की जनमत हे पंकजांना मुख्यमंत्री करण्याच्या बाजूने होते. यानिमित्ताने ओबीसींत असलेली खदखदही मोदींनी जाणून घेतली असावी. मराठा समाजाचे लाखालाखाने मोर्चे निघत आहेत. मोर्चेकरी आणि समाजाच्या संतप्त भावना पाहाता, फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदावरून दूर करण्याच्या हालचालीही दिल्लीतून झाल्या होत्या. त्याची भनक लागल्यानेच की काय, फडणवीस यांनी मला मुख्यमंत्रिपदावरून दूर करून समस्या सुटणार नाहीत, असे सूचक विधान केले होते. मराठा समाजाच्या भावना राज्याला ब्राम्हण मुख्यमंत्री दिल्याने तीव्र आहेत की काय? हेदेखील कालच्या भेटीत पंतप्रधानांनी जाणून घेतले असावे, त्यानुसार मुख्यमंत्री बदलाचा प्रयोग करावा का? याबाबतही चर्चा झाली असावी? परंतु, या चर्चेबद्दल ना पवार कधी बोलू शकतील ना मोदी!
पंतप्रधानांसोबतच्या भेटीत मराठा आरक्षण, साखर उद्योगांचे प्रश्‍न अशा विषयांवर चर्चा झाल्याचे खुद्द पवारांनीच प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे. ते खरेच असेल. परंतु, केवळ एक-दोन मुद्द्यांपुरती एवढ्या मोठ्या माणसांच्या बैठकीत चर्चा होत नसती. शिवाय, मोदीसारखे नेतृत्व पवारांकडून इतक्याच विषयावर माहिती जाणून घेईल, असेही नाही. अनेक विषयांवर चर्चा झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पवारांसारख्या अत्यंत कुशल, अनुभवी आणि जाणकार नेत्याने दिलेली माहिती ही कधीही पुुरेपूरच असते. ती हजारो गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या तांत्रिक माहितीपेक्षा कधीही अचूक असते, हे न कळण्याइतपत मोदी नक्कीच दुधखुळे नाहीत. महाराष्ट्रासारख्या महत्वपूर्ण राज्याचे हालहवाल माहित करून घेण्यासाठी पवारांसारखा विश्‍वासू नेता नाही, हेही मोदी जाणून आहेत. त्यामुळेच नजीकच्या काळात मराठा आरक्षण असो, किंवा इतर बाबी. काही राजकीय घडामोडी या निश्‍चित घडणार आहेत!
शरद पवार यांच्यासारख्या नेत्याला दिल्लीत बोलावून घेऊन बंदखोलीत दीर्घ चर्चा करण्यामागे मोठे कारण आहे. किंबहुना, काही राजकीय घडामोडींचे ते पूर्वसंकेतच आहेत. अल्पमतात असतानाही राज्यातील भाजपचे सरकार विधिमंडळात बहुमत सिद्ध करू शकले होते. संसदीय लोकशाहीत अशाप्रकारचा चमत्कार भाजप केवळ पवारांमुळेच करून दाखवू शकला होता. आजही हे सरकार सत्तेवर आहे, यामागेही पवारांचेच डोके आहे. दिल्लीत बसलेल्या नेत्यांना याची जाणिव नाही असे नाही. महादेव जानकर यांच्यासारखे छोट्या पक्षाचे नेते जेव्हा अजित पवारांना शिविगाळ करत होते, तेव्हा पवार हे दिल्लीत बसून राज्यातील राजकीय घडामोडींचे सूत्रसंचलन करत होते. मोदी आणि पवारांमध्ये काय चर्चा झाली याची कुणालाही कानोकान खबर नाही. खुद्द मुख्यमंत्र्यांनाही खबर नाही. परंतु, काही बाबतीत थेट कृती आता मुख्यमंत्र्यांकडून सुरु होईल. कदाचित मुख्यमंत्रीही खुर्चीवर राहतील की नाही, हे सांगता येत नाही. तसे झाले तर त्या मोदी इफेक्टमागे पुन्हा एकदा पवार पॉवरचा हात असेल. राज्याच्या राजकारणात शरद पवारांच्या पॉवरची कल्पना कधीही कुणाला आलेली नाही! पवारांचे सहकारी तुरुंगात घातले म्हणजे पवार आटोक्यात येतील, असा अंदाज बांधणार्‍या मुख्यमंत्र्यांनाही ही पॉवर अद्याप कळलेली नाही. इतकेच कशाला अनेक दशकांपासून महाराष्ट्र पवारांना ओळखतो; परंतु या महाराष्ट्रालाही पवारांची पॉवर पूर्णतः ओळखता आली नाही. पवार जेव्हा शांत भासतात तेव्हाच ते मोठ्या वेगाने काम करत असतात. राज्यात लाखो मराठे जेव्हा रस्त्यावर उतरले तेव्हा पवार कुठेच नव्हते. ते शांत होते. सत्ताधारीवर्गाने तेव्हाच ओळखायला पाहिजे होते, पवारांचे काम सुरु आहे!
--------------------



शरद पवारांचे ‘सुप्रिया’ अस्त्र!



- फोकस/ पुरुषोत्तम सांगळे
निवासी संपादक, दैनिक जनशक्ति


राज्यातील राजकीय वारे कोणत्या दिशेने वाहात आहेत, याचा अंदाज वेळेआधी येणार नाहीत ते शरद पवार कसले? अलिकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खा. सुप्रिया सुळे या प्रचंड सक्रीय झाल्या आहेत. त्यांच्या सक्रीयतेमुळे पक्षाला ऊर्जितावस्थादेखील आली. पक्षाचे इतर शिलेदार जेव्हा या ना त्या कारणाने कलंकित झालेले दिसतात, तेव्हा लोकांपुढे करण्यासाठी सुप्रियांव्यतिरिक्त एकही चेहरा पवारांना आपल्याच पक्षात दिसत नाही. सुप्रिया या महाराष्ट्राला चालणार्‍या नेत्या आहेत. राज्यात भाजपला सद्या प्रचंड ‘सेटबॅक’ बसलेला असून, त्याचा अचूक फायदा घेण्यासाठी पवारांनी सुप्रियांचे अस्त्र आपल्या भात्यातून बाहेर काढले. त्याला शह देण्यासाठी आता भाजपकडून पंकजा मुंडे-पालवे यांचे अस्त्र पुढे केले जाईल. राज्याच्या राजकारणात पवार-मुंडे हा सर्वाधिक काळ चाललेला राजकीय संघर्ष आहे. इतिहासाची पुनर्रावृत्ती होते असे म्हणतात, नजीकच्या काळात सुप्रिया-पंकजा यांच्यानिमित्ताने ती पुन्हा पहावयास मिळणार आहे.
----------

गेल्या काही महिन्यांपासून प्रचार सभा, मेळावे, सोशल मीडिया, पक्ष संघटनेच्या माध्यमातून खासदार सुप्रिया सुळे या कमालीच्या सक्रीय झाल्या आहेत. भविष्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा चेहरा म्हणून पक्षनेते शरद पवार यांच्याकडूनच त्यांना समोर आणले जात आहे. कदाचित बदललेल्या राजकीय परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांना महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री करण्याचेही ‘जाणत्या राज्यांच्या‘ मनात घोळत असावे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ नेते अजित पवार यांना बाजूला सारून सुप्रिया यांना अतियश नियोजितबद्धपणे पुढे आणले जात आहे. सद्या अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांवर भ्रष्टाचाराचे उदंड आरोप झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केलेल्या ‘विरोधकांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत’ या वक्तव्यानंतर तर या मंडळींची झोप उडालेली दिसते. तसेही पक्षाचे बहुजन नेते छगन भुजबळ यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सावध झाला असून, आता पवारांनी नवा पत्ता खेळला. गेल्या काही दिवसांपासून कोपर्डी प्रकरण, मराठा आरक्षणासह अन्य काही राजकीय मुद्द्यांंसाठी राष्ट्रवादीची मुलुखमैदान तोफ म्हणून सुप्रिया सुळे या राज्यात काम करत असल्याचे महाराष्ट्राने बघितले आहे. अगदी अजित पवारांना ठरवून मागे ठेवण्यात आल्याचे चित्र दिसते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाताना सुप्रिया या राष्ट्रवादीचा मुख्य चेहरा असतील, असे संकेत यानिमित्ताने मिळत आहेत. अजित पवार तसेच सुनील तटकरे यांच्यावर सिंचन भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचारात हे दोन चेहरे जनता स्वीकारणार की नाही, याविषयी खुद्द शरद पवारांना शंका येत असावी. ही शंका चुकीचीही नाही. दुसरीकडे, अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याचे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच वेळोवेळी सूचित केले असल्याने राष्ट्रवादी सद्या ‘सर्जिकल स्ट्राईक‘ होण्याच्या धास्तीत आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीकडे सुप्रिया सोडून नेतृत्व करणारा आणि सर्वांना चालणारा चेहरा नसल्याने गेल्या काही महिन्यांपासून सुप्रियांना ठरवून जनतेसमोर आणले जात आहे.
दिवंगत नेते आर. आर. पाटील हे राष्ट्रवादीचा सर्वमान्य चेहरा होते. त्यांच्या नेतृत्वाचा एक करिष्मा राज्यात होता. परंतु, त्यांच्या निधनाने पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली. ती भरून काढणे पक्षाला तूर्त तरी शक्य नाही. जयंत पाटील व दिलीप वळसे पाटील हे पहिल्या फळीतील नेते असले तरी हे दोन चेहरे सर्वमान्य होऊ शकत नाहीत. छगन भुजबळ हे पक्षाचे एकेकाळचे आक्रमक नेते होते. मात्र, सावकारी प्रकरणात सध्या ते तुरुंगात खितपत पडलेले असल्याने राष्ट्रवादीची बहुजन बाजू लुळीपांगळी झाली आहे. नाही म्हटले तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना पुढे करण्यासाठी पवारांनी संधी देऊन पाहिली; परंतु अद्याप तरी ते आपली छाप राज्यावर पाडू शकले नाहीत. तीच गत जितेंद्र आव्हाड यांचीही झाली आहे. आव्हाड आणि मुंडे हे बहुसंख्य अशा वंजारी समाजातील नेतृत्व आहे. परंतु, वंजारी समाजच पूर्ण क्षमतेने या नेत्यांच्या पाठिशी एकवटलेला नाही. हा समाज अद्यापही स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर वारसा म्हणून पंकजा मुंडे-पालवेंकडे पाहतो. त्यामुळेच शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचा प्रमुख चेहरा कोण, अशी चर्चा कायम होत राहिली अन् या चर्चेला योग्यवेळी पूर्णविराम देण्यासाठी पवारांनीच पाऊल उचलले असावे, अशी एक शक्यता राज्यात अलिकडे बोलली जात आहे. केंद्रात तसेच राज्यात सत्ता जाईपर्यंत शरद पवारांचे राजकीय वारस म्हणून अजितदादा यांचेच नाव घेतले जात होते. विशेष म्हणजे, सुप्रिया यांनीही, ‘दादा मला ज्येष्ठ असून तेच आमचे नेते आहेत. मी दिल्लीला आनंदी असून, दादांकडे महाराष्ट्र सोपवण्यात आला आहे’, असे जाहीरपणे कबुली दिली होती. मात्र, केंद्रात तसेच राज्यात सत्ता गेल्यानंतर गेल्या दोन वर्षांत राष्ट्रवादीच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेे. पक्षाचे नेतृत्व अजितदादांकडे सोपविणे म्हणजे तूर्त तरी आत्मघात ठरेल, याची जाणिव कदाचित शरद पवारांना झाली असावी. दुसरी महत्वाची बाब अशी आहे, की एकवेळ मासा पाण्याशिवाय जीवंत राहू शकेल परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष सत्तेशिवाय राहूच शकत नाही. त्यामुळेच आता तोंडावर आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राज्यात प्रथम स्थान मिळवून भविष्यात राज्याची सत्ता काबिज करण्यासाठी प्रयत्न करणे हे या पक्षाला क्रमप्राप्त आहे. त्यामुळेच पक्षाची धुरा सुप्रियांच्या खांद्यावर देण्याचा पक्ष विचार करत असल्याचे अगदी स्पष्ट होत आहे. त्यामुळेच सभा, मेळावे तसेच पक्ष संघटनांच्या बैठकांचा धडाका लावत राष्ट्रवादीला उभारी देण्यासाठी सुप्रिया सुळे या कमालीच्या सक्रीय झाल्या आहेत. मुख्य म्हणजे बारामतीमधून खासदार झाल्यानंतर पक्षाच्या मुख्य प्रवाहात कधीही सामील न झालेल्या सुप्रियांनीही सध्याचा पक्षाचा प्रमुख चेहरा असल्याचे मान्य केले आहे. सुप्रियांना पुढे करण्याचे आणखीही एक महत्वाचे कारण पुढे येते ते म्हणजे, लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरलेल्या मराठा समाजाने आपल्या मोर्चाचे नेतृत्व समाजातील सर्वसामान्य पाच तरुणींना दिले होते. याच तरुणींनी मोर्चाची मागणी जिल्हाधिकार्‍यांमार्फत राज्य सरकारकडे पोहोचवली होती. प्रत्येक जिल्ह्यात निघालेल्या अतिविराट मोर्चात हा शिरस्ता राबविण्यात आला. त्यामुळे सुप्रिया सुळेंकडे राष्ट्रवादीचे नेतृत्व सोपविले तर समाजाची जी मानसिकता निर्माण झाली आहे, ती पक्षाकडे वळविता येईल, असा एक दुसरा कयास पवारांच्या डोक्यात असावा. खा. सुळे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अक्षरशः तुटून पडल्या आहेत. मुख्यमंत्र्यांची संभावना तर त्यांनी नळावर भांडणार्‍या बायकांसारखी करून मोठा अपमान केला. परंतु, खा. सुळेंना मुख्यमंत्र्यांनी प्रतिउत्तर देण्यास टाळले. सुप्रियांवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही, दुसरीकडे त्या आक्रमक आणि संयमी अशा नेत्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाला राजकीय वारसा आहे. त्या कधीही सत्तेत सहभागी झालेल्या नसल्याने त्यांची सत्तेतून येणारी नकारात्मक प्रतिमा समाजात निर्माण झालेली नाही. दुसरे, आता पक्षाला सावरायचे असेल तर सुप्रियांना मैदानात उतरविल्याशिवाय राष्ट्रवादीकडे अन्य पर्यायही दिसत नाही. त्यामुळे पक्षाची धुरा सुप्रियांच्या खांद्यावर देण्यामागे सत्तेचे मोठे गणित शरद पवारांनी मांडले असून, पक्षाची शिस्त पाहाता, त्याला कुणी मोडीत काढेल ही शक्यता दूरदूरपर्यंत नाही. राहिला प्रश्‍न अजित पवारांचा! अजितदादा यांनी कधीही सुप्रियांना विरोध केला नाही, जो काही मतभेदाचा प्रश्‍न निर्माण होतो तो कार्यकर्ता पातळीवरचा असतो. पवारांच्या घरात शरद पवार सांगतील तेच ब्रम्हवाक्य असते. त्यामुळेच राज्यातील सर्वात मोठे कुटुंब असलेले पवार घराणे आजही एकसंघ आहे, भाऊबंदकीची कीड या घराला लागू शकली नाही. भलेही एकवेळ सुप्रियांचा चेहरा पुढे करून सत्ता मिळवता येईल आणि बहुमत मिळालेच तर अजित पवारांनाही मुख्यमंत्री करता येईल, असा विचार शरद पवार ऐनवेळी करू शकतात. शेवटी सत्य एकच आहे, सुप्रिया अचानक सक्रीय झाल्यात, यामागे पवारांचे राजकीय नियोजन आहे. अजित पवारांनी पक्षात सक्रीय झाले असते तर त्याचा फायदा भाजप, शिवसेना आणि कदाचित काँग्रेसला झाला असता, परंतु सुप्रियांच्या सक्रियतेमुळे विरोधकांची मोठी कोंडी करण्यात पवार यशस्वी झाले आहेत. राज्याच्या राजकारणात नजीकच्या काळात दोन महिलांमध्ये जोरदार राजकीय संघर्ष पहावयास मिळेल. त्या महिला म्हणजे, सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे! स्व. गोपीनाथ मुंडे यांनी जीवंत असेपर्यंत शरद पवारांना राजकीय विरोध केला, तोच राजकीय वारसा यापुढे पंकजा मुंडे चालवतील. सुप्रियांना शह देण्यासाठी भाजपकडे असलेले ते एकमेव नेतृत्व आहे. त्यामुळे सुप्रियांमुळे राष्ट्रवादीला कमालीची ऊर्जितावस्था प्राप्त होणार असली तरी त्यांची वाटचाल पक्ष आणि खुद्द पवार समजतात तेवढी सोपी नक्कीच नाही!
--------------------------------



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खसखसच्या शेतीचे वास्तव!