भगवानगड हे बहुजनांचे शक्तिपीठ आहे, राजकीय आखाडा नाही!
फोकस/ पुरुषोत्तम सांगळे,
निवासी संपादक, जनशक्ति
भगवानगडावरील दसरा मेळाव्यावरून राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे-पालवे अन् गडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री यांच्यात बराच दुरावा निर्माण झालेला आहे. त्यातून गडावर काही जणांची काल-परवा डोकीही फुटली. गड हा तमाम बहुजन समाज आणि खास करून वंजारी समाजाचा प्रेरणास्त्रोत आहे, तो राजकीय आखाडा नाही. स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांची परंपरा पुढे चालविण्याची पंकजांची इच्छा असेल तर महंतांनी तिला खोडा घालू नये. आणि, पंकजांनीही गडाचा राजकीय वापर करावा किंवा नाही याबाबत आता सद्सद्विवेकबुद्धीने निर्णय घ्यायला हवा. भगवानगड हे समाजाचे शक्तिपीठ आहे, त्याचा राजकीय आखाडा करण्याचा अधिकार कुणालाही नाही, हेही ज्यांनी लक्षात घ्यायला हवे त्यांनी लक्षात घ्यावे!
--
बहुजन समाजातील सर्व जातीधर्मातील लोकांमध्ये एकोपा राहावा, संत भगवानबाबांच्या विचारांची समाजात सातत्याने पेरणी होत राहावी अन् त्याद्वारे बहुजन समाजात परिवर्तन घडवून यावे, यासाठी श्रीक्षेत्र भगवानगडाची उभारणी झाली होती. हा गड महाराष्ट्रातील तमाम भाविकांचे श्रद्धास्थान आणि सर्वधर्म समभावाचे प्रतिक आहे. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे गडाला लौकिक प्राप्त झाला, आधीच लाभलेली वैचारिक उंची आणखी उंच झाली. महाराष्ट्राचे लक्ष या गडाकडे वेधले गेले, स्व. मुंडेसाहेबांना या गडाने राजकीय ताकद दिली, त्यांच्या स्वप्नांना पूर्णत्वास जाण्यासाठीची शक्ती या गडावरून समाजबांधवांच्या रुपाने आणि भगवानबाबांच्या आशीर्वादाने मिळत गेली. ऊसतोड मजुरांच्या तीन पिढ्या या गडाच्या वाढीसाठी खपल्यात, तसेच मुंडेसाहेबांनी दिलेल्या सक्रीय योगदानामुळेच शक्तिशाली गड म्हणून हा गड नावारुपाला येऊ शकला. संत भगवानबाबा हे जसे राज्यातील बहुसंख्य अशा वंजारी समाजबांधवांचे दैवत आहे, तसेच ते अठरापगड जाती आणि तमाम बहुजन समाजाचेही दैवत आहे. वारकरी संप्रदायात बाबांचा अधिकार आणि लौकिक मोठा आहे. दसरा मेळावा हा तर गडाचा वर्धापन दिन. गोपीनाथ मुंडेसाहेब जीवंत असेपर्यंत ते या मेळाव्याला हजेरी लावत होते. यानिमित्ताने ते त्यांचे मनोगतही व्यक्त करत होते. त्यातून त्यांची राजकीय दिशा स्पष्ट व्हायची, राज्यालाही राजकीय दिशा मिळायची, अनेकदा राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदूही हा मेळावा राहिलेला आहे. हा उहापोह येथे करण्याचे कारण म्हणजे, सद्या गडावर जे काही सुरु आहे, ते पाहाता गडाची वाटचाल कोणत्या दिशेने चालली ते पाहून वंजारी समाजासह बहुजन समाज चिंताक्रांत झालेला दिसतो. ज्या गडावरुन भगवानबाबांच्या विचारकार्याचा प्रसार होणे अपेक्षित आहे, ज्या गडावरून बहुजनऐक्याची साद घालणे अपेक्षित आहे, वंजारी समाजाला दिशा दाखविण्याचे काम दीपस्तंभासारखे होणे अपेक्षित आहे, त्या गडावर आज एकमेकांची काठ्या-कुर्हाडींनी डोकी फोडली जात असेल, तर ती दुर्देवाची बाब आहे. हा तमाशा बरा नाही. भगवानबाबांना गडावर हे काम अपेक्षित होते का? दसरा मेळाव्यात राज्यातील कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांचे राजकीय भाषण होऊ नये, अशी गडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री यांची भूमिका आहे, ते या भूमिकेवरून हटायला तयार नाहीत. दुसरीकडे, दसरा मेळावा पंकजाताईंच्या उपस्थितीतच होईल आणि त्या राजकीय भाषण करतीलच अशी त्यांच्या समर्थकांची आणि बहुसंख्य समाजबांधवांची भूमिका आहे. त्यासाठी भगवानगड परिसरातील 60 आणि राज्यातील 200 ग्रामपंचायतींनी तसे ठराव केले आहेत. राज्यभर कृती समितीच्या बैठका होत आहेत. त्याद्वारे समाजाचा कौल जाणून घेतला जात आहे, आणि जवळपास 97 टक्के वंजारी समाज हा पंकजाने दसरा मेळाव्याला हजेरी लावावी आणि राजकीय भाषणाची स्व. गोपीनाथ मुंडे यांची परंपरा पुढे चालू ठेवावी, अशा भूमिकेत आहे. खरे तर समाजाची ही भूमिका असेल तर मग् महंत नामदेवशास्त्री यांनी समाजाच्या भूमिकेचे स्वागत करायला हवे. शेवटी गड हा समाजाच्या मालकीचा आहे, तर महंतांची भूमिका ही केवळ राखणदाराऐवढी मर्यादित आहे. महंत अडेलतट्टूसारखे का वागतात? अलिकडचा इतिहास पाहाता, स्व. मुंडेसाहेबांच्या घरात ज्यावेळी मतभेद निर्माण झाले, त्यावेळी भगवानगड आणि स्वतः नामदेवशास्त्री हे गोपीनाथ मुंडे यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले. मुंडेसाहेबांच्या अगदी अनपेक्षित निधनाने (आम्ही वारंवार सांगत आहोत की हा घातपातच आहे) समाज विचलित झाला. त्यावेळीही गड खंबीरपणे पंकजांच्या पाठिशी उभा राहिला. मग् पंकजांच्या राजकीय भाषणाला गडाचा विरोध का असावा, हे काही कळत नाही! गडाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी स्व. मुंडेसाहेबांनी खस्ता खाल्ल्यात, त्यांनीच दसरा मेळाव्याची परंपरा सुरु केली होती. किंबहुना विद्यमान महंत डॉ. नामदेवशास्त्री यांना महंताच्या गादीवर बसविण्यासाठी मुंडेसाहेबांनीच पुढाकार घेतला होता. आता जेव्हा पंकजा स्व. मुंडेसाहेबांचा राजकीय वारसा चालवू इच्छित आहे तेव्हा तिला विरोध करण्याचे काम महंत का करत आहे, ही कृतघ्नता नाही का? असा प्रश्न मला आणि समाजालाही पडतोे. ही परंपरा खंडित करण्याचा घाट रचला जात आहे आणि तो प्रयत्न एकजूट झालेल्या समाजाने उधळून लावलाच पाहिजेत. महंतांनी पंकजांना गडाची कन्या म्हणून घोषित करावे, दुसरीकडे त्यांना विरोधही करावा, हेही काही कळणारे नाही. पंकजांकडून काही चुका झाल्या असतील, त्यांनी स्वतंत्र गोपीनाथगड निर्माण केल्यामुळे आणि त्याबाबत विचारात न घेतल्याबद्दल महंत नाराज आहेत, असेही बोलले जात असते. तसे असेल तर गोपीनाथगड हा भगवानगडाची पायरीच आहे, हेही तमाम बहुजन समाज जाणून आहे, हेही महंतांनी लक्षात घ्यावे. तसेही पंकजा जर भगवानगडाच्या कन्या आहेत, तर या कन्येचे काही चुकले असेल तर त्या चुका पोटात घेण्याइतपतही मोठेपण महंतांकडे नाही का? गड हा खरा तर वारकर्यांचा, कीर्तनकारांचा असल्याचे सर्वमान्य आहेच; ते काही राजकीय केंद्र नाही, हेही समाज जाणून आहे. भगवानबाबांचा पुण्यतिथी महोत्सव, नारळी सप्ताह वा इतर धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांना समाजातील कुणी राजकीय नेता तेथे येतच नसतो. आला तरी तो बाबांचा भक्त म्हणून आलेला असतो. तेव्हा फक्त दसरा मेळाव्याची स्व. मुंडेसाहेबांची परंपरा चालविण्यासाठी पंकजा तेथे येत असतील तर त्यात वावगे काय आहे, वर्षभर महंतांचे धार्मिक कार्यक्रम सुरुच असतात, एका दिवसाने असे काय बिघडते म्हणून महंत एवढे हटवादी बनले आहेत? भगवानगडावर पंकजांनाही एण्ट्री द्या, तशीच ती धनंजय मुंडेंनाही द्या, या दोघांच्या भाऊबंदकीत महंतांनी पडण्याचे तसे कारण नाही, त्यावरून दोन्ही भाऊ-बहिणींच्या समर्थकांची डोकी फोडण्याचेही काही प्रयोजन गडावर उरत नाही. मध्यंतरी पंकजा आणि महंत यांच्यात धुसफूस सुरु असल्याच्या बातम्या कानावर आल्या होत्या. या बातम्यांचे ना पंकजांनी खंडण केले ना महंतांनी! त्यामुळे समाज संभ्रमात पडला. त्यानंतर सोशल मीडियावर तर महंतांची सर्रास बदनामी सुरु झाली. ही बदनामी तर भयानकच होती. आतादेखील महंतांचे काही आक्षेपार्ह छायाचित्रे सोशल मीडियावर फिरवली जात आहेत, तेही भयानक आहे. असले प्रकार पंकजांच्या समर्थकांनी तातडीने थांबवायला हवेत. हे उपद्व्याप करून तुम्ही महंतांची बदनामी करत नाही तर भगवानगडाची बदनामी करत आहात. पंकजांना मानसकन्या जाहीर केल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर गडावरच हल्ल्याचा प्रयत्न झाला होता, हे सर्वश्रुत आहे, अशा वातावरणात गड, महंत आणि पंकजा यांच्यात दुरावा आला आहे, तो वेळीच दूर व्हायला हवा. पंकजांना गड ताब्यात घ्यायचा आहे, महंतांना कुणाचीही लुडबूड नको आहे, अशा चर्चा अलिकडे सोशल मीडियावर पहावयास मिळतात. या चर्चा सुरुच राहतील. परंतु, त्यांचे परिणाम गडाच्या विकासावर आणि कामांवर व्हायला नको. भगवानगड हे वंजारी समाजाचे तद्वतच तमाम बहुजन समाजाचे शक्तिपीठ आहे, स्व. गोपीनाथ मुंडे यांचा राजकारणात दबदबा निर्माण करण्यात गडाचा सिंहाचा वाटा होता, ते भगवानबाबांचेच आशीर्वाद होते. ती ताकद पंकजा असो की धनंजय या दोघांच्या पाठिशीही गडाने निर्माण करायला हवी. पंकजाने दसरा मेळाव्याला गडावर यावे आणि राजकीय भाषण करावे, अशी जर समाजाची भावना असेल तर त्याला आडकाठी घालण्याचे काम महंतांनी करायला नकोच; परंतु पंकजांनीही आता गडाचा वापर आपल्या राजकीय फायद्यासाठी करावा की नाही, याबाबत पुनर्विचार करण्याची गरज आहे. महंतांना नाराज करून तुम्ही गडावर जात असाल आणि राजकीय शक्तिप्रदर्शन करत असाल तर उद्या धनंजय मुंडेंही हाच कित्ता गिरवतील, तुमच्या दोघांच्या भाऊबंदकीत तुम्ही गडाचे पावित्र्य गमावून बसणार आहात का? एकमेकांची जिरविण्यासाठी आणि डोकी फोडण्यासाठी गड नाही, हे आता या दोघांनीही लक्षात घ्यायला हवे. कोणी काहीही म्हणोत, भगवानगडावरून एकदा आदेश मिळाला की, समाज कुणाचेही ऐकत नाही, हा इतिहास आहे, ती समाजाची वज्रमूठ आहे, ती कायमच रहायला हवी. पंकजा यांना समाजाची पूर्ण सहानाभूती आहे, परंतु जेव्हा भगवानगड की पंकजा असे निवडण्याची वेळ येईल तेव्हा समाज भगवानगड निवडेल, हे पंकजानेही लक्षात घ्यायला हवे. महंत डॉ. नामदेवशास्त्री यांनी फार हट्ट न करता पंकजांना दसरा मेळाव्याला यायचे असेल अन् स्व. मुंडेसाहेबांप्रमाणे भाषण करायचे असेल तर करू द्यावे, एका दिवसाच्या कार्यक्रमाने गडावर फारसा असा काय परिणाम होणार आहे?
-------------------------

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा