महाराष्ट्र एवढा दूषित कधीच झाला नव्हता!
फोकस/पुरुषोत्तम सांगळे
निवासी संपादक, जनशक्ति
अलिकडे महाराष्ट्रात जातीय प्रदूषण वाढविण्यात नागपुरी चाणक्यांना यश आले आहे. मराठ्यांच्या क्रांतिकारी मूकमोर्चांना आता कथित बहुजनांच्या प्रतिमोर्चांनी प्रत्युत्तर दिले जात असल्याने राज्यातल्या फडणवीसी सरकारचे साधून गेले. मराठा क्रांतीची धग कमी करण्यात आधुनिक चाणक्यांना यश आलेे. जातीय ध्रुवीकरणाने महाराष्ट्राचे वैचारिक वाटोळे मात्र तेवढे होत आहे. मराठ्यांना मोर्चा काढण्याचा अधिकार राज्यघटनेनेच दिला आहे, त्यांना उत्तर म्हणून प्रतिमोर्चे काढू नका, असे कळकळीचे आवाहन बाबासाहेबांचे नातू अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला भीक न घालता प्रतिमोर्चे निघत आहेत. हे मोर्चे निघावेत, अशी नागपुरी चाणक्यांची इच्छा या निमित्ताने पूर्ण झाली. आज जो राज्यात जातीय दूषितपणा निर्माण झाला; त्याला ‘जय भीम बोलो, किधर भी चलो‘वाली मंडळीच जबाबदार आहेत. एकत्र आलेल्या सकल मराठा समाजाविरोधात प्रतिमोर्चाच्या माध्यमातून दलितवर्गाला पेटविण्यात चाणक्य यशस्वी झाले अन् या पुरोगामी महाराष्ट्राचे आता वैचारिक वाटोळे झाले. इतकी वर्षे ज्या चळवळींनी खास्ता खालल्यात, दलित-बहुजनांची मोट बांधली. त्यातून बहुजन नेतृत्व सत्तेपर्यंत पोहोचू शकले, त्या सर्व चळवळींचे अपयश म्हणजे आज निघत असलेले प्रतिमोर्चे होय!
--
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सांगितले होते, किंचाळून ओरडण्यापेक्षा मौनात मोठे सामर्थ्य आहे. मनात दाटून असलेला आक्रोश व्यक्त करण्यासाठी सकल मराठा समाजाने राज्यात चोहीकडे लाखोंचे मोर्चे काढले. हे मोर्चे मूक होते. मौनातले सामर्थ्य मराठा तरुण-तरुणींनी दाखवून दिले. त्यामुळे राज्यच काय, केंद्र सरकारही हादरले. कोपर्डी येथील तरुणीवरील बलात्कार आणि तिच्या देहाची विटंबना यातून हा आक्रोश निर्माण झाला होता. बलात्कार करणार्यांना जात नसते पण माज असतो. हे नराधम कोणा एका जातीचे किंवा धर्माचे नसतात. या नराधमांना वठणीवर आणण्यासाठी आणि जातीचे कवच-कुंडले धारण करून अपराध करणार्यांना उघडे पाडण्यासाठी हे मोर्चे होते. मराठा एकत्र आलाच आहे तर आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागावा असा सोयीस्कर विचार पुन्हा त्यातून पुढे आला. त्यात वावगे काहीच नाही. तरीही मराठ्यांचे मोर्चे दलितविरोधी असल्याचा सूर नागपुरातील चाणक्यांनी लावला. त्यानंतरही दलित बांधव उचकत नाही म्हणून त्यांनी मराठ्यांविरोधात दलितांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण केले. अॅट्रोसिटी कायदा रद्द करण्यासाठी हे मोर्चे आहेत, असे त्यांना सांगितले गेले. या विखारी वैचारिक पेरणीनेच आत दलितांनी प्रतिमोर्चे काढायला सुरुवात केली आहे. मराठा मोर्चांना एक ठोस कारण आहे, दलितांच्या प्रतिमोर्चांना नेमके कारण तरी काय? या प्रतिमोर्चांच्या माध्यमातून संघ आणि भाजपला महाराष्ट्रात अराजकता माजवायची होती, त्यात ते यशस्वी झालेत. आज या राज्यात दलित आणि मराठा, ओबीसी आणि निम्नसवर्ण यांच्यात प्रचंड वैचारिक दरी निर्माण झाली असून, ही दरी भरून काढण्यासाठी पुढची शंभर वर्षे तरी लागतील. मराठ्यांच्या मोर्चांनी काही तरी साध्य होणार होते, त्यांना नाक खाजवून अपशकून करणार्या प्रतिमोर्चांतून काय साध्य होणार आहे? मराठा समाजाला विरोध म्हणून प्रतिमोर्चा काढण्याचा विचार दलित समाजात कधीही सुरु नव्हता. खरे तर मोर्चा काढण्याचा अधिकार आणि आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांनाच दिलेला आहे. तो अधिकार मराठ्यांनाही आहेच. त्यामुळे मराठे मोर्चे काढत असताना प्रतिमोर्चे काढण्याची भूमिका वैचारिक स्थिरता असलेल्या दलितांनी घेतली नव्हती. परंतु, ज्यांचे वैचारिक बूडच हलते-डुलते आहे, ज्यांना बाबासाहेब आंबेडकरच कळलेले नाहीत, ती मंडळी प्रतिमोर्चाची भाषा करू लागली, आणि मराठ्यांनी लाखोंचे मोर्चे काढले म्हणून ही मंडळीही आता मोर्चे काढून आपली ताकद दाखवत आहेत. जर प्रतिमोर्चाला जातीय स्वरुप दिले तर ते अराजक होईल, हिंसक होईल याची जाणिव वैचारिक बूड ठीक नसलेल्या मंडळींना नाही, असेच दुर्देवाने दिसते. दलितांच्या उद्धारासाठी मला मंत्रिपद हवे असे म्हणणारे आता केंद्रात मंत्री आहेत, तर मला मंत्रिपद मिळाले तर धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटेल असे म्हणणारेही आता मंत्री आहेत. या दोघांना मंत्री केल्याने त्यांच्या समाजाचे प्रश्न सुटलेत काय? की धनगरांना आरक्षण मिळाले? दुर्देवाची बाब अशी की, दलित उद्धारासाठी मंत्रिपद द्या म्हणणारेच आता प्रतिमोर्चांना ताकद देण्याचे काम करत आहेत. जेव्हा की या मोर्चातून काहीही साध्य होणार नाही, याची जाणिव या मंडळींना आहे. दलितांना आरक्षण दिले पाहिजे, त्यांना समान संधी दिली पाहिजे, त्या करिता कायदे करणारे स्व. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार हे नेते मराठाच होते. दलित असो किंवा इतर मागासवर्गीय समाज या समाजाच्या हक्कासाठी या नेत्यांनी तहयात काम केले, वेळप्रसंगी स्वतःच्या जातीकडे दुर्लक्ष केले. प्रतिमोर्चांची आपली खुमखुमी दाखविणार्या दलित नेत्यांना हा इतिहास माहित नाही का? मराठा सेवा संघ असो, बामसेफ असो किंवा इतर परिवर्तनवादी संस्था, संघटना असोत, त्यांनी दलित, ओबीसी आणि मराठा समाजात वैचारिक एकत्रिकरण घडवून आणण्यात मोठा वाटा उचलला होता. या चळवळींच्या कामांमुळेच मराठा तरुण बहुजनवादी भाषा बोलू लागला होता. मराठा समाजाच्या लाखोंच्या मोर्चात केवळ मराठेच सहभागी झालेत असे नाही, त्यात ओबीसी आणि अठरापगड जातीची माणसेही होती. इतकेच काय मुस्लीमांनीदेखील या मोर्चात आपल्या लेकराबाळांसह हजेरी लावली. हे मोर्चे दलितांच्याविरोधात आहेत, असे तर्कट मांडणार्या नागपुरी चाणक्यांच्या विषारी प्रचाराला बळी पडून दलितांनी प्रतिमोर्चे काढण्यास सुरुवात करणे म्हणजे या चाणक्यांना जे साधायचे होते ते साध्यच झाले असे म्हणावे लागेल. मराठा मोर्चांनी सामाजिक ध्रुवीकरण झालेच होते, आता दलितांच्या प्रतिमोर्चांनी सामाजिक भावनाच दूषित झाल्याचे पहावयास मिळत आहे. मराठ्यांच्या मोर्चांनी मुख्यमंत्र्यांची खुर्ची खदाखदा हलली होती. दलितांच्या मोर्चांनी ती स्थीरच नव्हे तर अगदी घट्ट झाली! नुसते ‘जय भीम‘ बोलून कुठेही भटकायचे नसते. आपली वैचारिक दिशा आंबेडकरांनी स्पष्ट केली आहे, त्याच दिशेने जायाचे असते. ‘बहुजन क्रांती‘च्या नावाने प्रतिमोर्चे काढणार्या दलितांना हे कोण समजावून सांगेल? फुले-शाहू-आंबेडकरांच्या या महाराष्ट्राचे वातावरण इतके दूषित कधीच झाले नव्हते, ते आता झाले आहे!!
----------------------

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा