सत्तेच्या हनीमूनसाठी पुन्हा बोहल्यावर!


फोकस/पुरुषोत्तम सांगळे
निवासी संपादक/दैनिक जनशक्ति


निवडणुकीचा मांडव सजलेला असताना, दुसर्‍यांदा बोहल्यावर चढण्यावरून शिवसेना-भाजपात पुन्हा मानापान झाले. दोघेही तसे सत्तेसाठी मोहातूर असताना
त्यांचा हा दुसर्‍यांदाचा घरोबा तसा महाराष्ट्रासाठी अनोखा नाही. या दोघांची नाटकं सगळ्यांना कळून चुकली आहेत. या दोघांनीही संसार मोडण्याची एकमेकांना धमकी देऊन पुन्हा पुन्हा सत्तेचा हनीमून साजरा करण्याबाबतचे आता कुणालाही नवल वाटत नाही. ‘कामातुराणां न भयं न लज्जा’ असा एक संस्कृत श्‍लोक आहे; त्यात थोडा बदल करून ‘सत्तांतुराणां न भयं न लज्जा’ असे या दोघांकडे पाहून म्हणावे लागेल. मुंबईसह राज्यातील 212 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत तुम्हाला युती करायचीच होती तर एकमेकांविरुद्ध गरळ ओकून कुणाला काय मिळाले? फुकटात महाराष्ट्राला राजकीय तमाशा का दाखविला?
--
राज्यातील नगरपरिषद, जिल्हा परिषद, महापालिका यांच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून शिवसेनेने स्वबळाची भाषा करत, दंडबैठका सुरु केल्या होत्या. केंद्रात आणि राज्यात सत्तेची उब चाखायची आणि निवडणुकांच्या मोसमात मात्र स्वबळाचा घोषा लावत सत्ताधारी भाजपवर दबाव निर्माण करायचा असा काहीसा नवा पायंडा शिवसेनेत पडायला लागला आहे. असला काही प्रकार शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात नव्हता. भाजपच्या काही नेत्यांनी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराविरुद्ध जोरदार मोहीम उघडलेली आहे. त्याच्या मिरच्या अर्थात शिवसेनेला झोंबल्या. त्यामुळेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप हा नेहमीच मित्र पक्षांच्या मुळावर उठतो असे सांगत स्वबळाची भाषा केली. नवीन पटनाईक, नितीश कुमार, ममता बॅनर्जी यांचे दाखले त्यांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना दिले होते. या नेत्यांनी भाजपची चाल ओळखून वेळीच फारकत घेतल्याने त्या त्या राज्यात हे पक्ष स्वबळावर सत्तेत आल्याकडेही उद्धव ठाकरेंनी आपल्या नेत्यांचे लक्ष वेधले होते. भविष्यात याच वाटेने जावे लागेल, असेही त्यांनी सांगितले होते. आठवडा उलटत नाही तोच ठाकरे यांनी आपली भूमिका बदलली. नगरपरिषदांच्या पहिल्या टप्प्यात 165 ठिकाणचे उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे दोन दिवस उरले असताना, समझोत्याची भाषा दोघांकडूनही सुरु झाली. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, मंत्री दिवाकर रावते यांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांची भेट घेऊन युतीचा प्रस्ताव भाजपपुढे ठेवला. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एकमेकांशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि युतीचे घोडे गंगेत न्हाहले. याचाच अर्थ काय तर युती होणारच होती. तत्पूर्वी नुसती आदळआपट दोघांकडून करण्यात आली आणि महाराष्ट्राचे चांगले राजकीय मनोरंजन झाले.
केवळ हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांची युती 1990 पासून महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात आहे. या दोघांनाही स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या करिश्माई नेतृत्वामुळे 1995 मध्ये सत्ता मिळाली. गोडीगुलाबीने दोघांचा संसार सुरु होता. किमानपक्षी बाळासाहेब आणि प्रमोद महाजन असेपर्यंत तरी या संसारात भांडणतंटा होत नव्हता. काही कुरबूर झालीच आणि भांड्याला भांडे लागले तरी समोपचाराने ते मिटवले जात असे. नंतरच्या काळात सत्ता गेल्यानंतर 2014 पर्यंत या दोन्ही पक्षांची सत्तेविना चांगलीच उपासमार झाली. नेते हतबल तर कार्यकर्ते सैरभैर झाले. 2014च्या निवडणुकीत जागावाटपावरून या दोघांचा 25 वर्षांचा संसार मोडला. कुणी कोणाला किती जागा सोडायच्या या कारणांवरून या दोघांचा काडीमोड झाल्याने तेव्हाही महाराष्ट्राला आश्‍चर्य वाटले होते. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांचे गैरव्यवहार आणि त्यामुळे राज्यासह देशभरात संयुक्त पुरोगामी आघाडी (युपीए)विरुद्ध असलेली जनमताची लाट व नरेंद्र मोदी नावाच्या वादळाने देशवासीयांवर केलेले गारूड यामुळे या दोघांना पुन्हा सत्तेची संधी मिळाली. मोदींच्या लाटेत भाजपला महाराष्ट्रात 122 जागा मिळाल्यात, शिवसेनेचा वारू 63 जागांवर रोखला गेला. पुन्हा एकत्र येण्याशिवाय पर्याय नव्हता कारण सत्ता ही भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची कमजोरी आहे. खास करून ही कमजोरी शिवसेनेला लपविता आली नाही. त्यामुळे उशीरा का होईना शिवसेनेने सत्तेत सहभाग घेतला आणि पदरात पडतील ती मंत्रिपदे घेत सत्ता गोड माणून घेतली. सत्तेत असली तरी शिवसेनाच प्रमुख विरोधकांची भूमिका बजावत आहे. सत्तेतही राहायचे आणि विरोधक म्हणून सत्ताधार्‍यांवर टीकाही करायची अशी दुतोंडी भूमिका या पक्षाने घेतल्याने प्रारंभी वाटणारे आश्‍चर्यही आता लोप पावले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महापालिकेतील शिवसेनेचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्याचे कामच आता भाजपचे नेते करत आहेत. त्यामुळे हा पक्ष तेथे प्रचंड बॅकफुटवर गेला. दुसरीकडे, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगूल वाजला. ग्रामीण भाग आणि राज्यातील नगरपरिषदांच्या शहरी भागात भाजपचे चांगले नेटवर्क निर्माण झालेले आहे. यापैकी बहुतांश भागात भाजपचे आमदार आहेत. या निवडणुका स्वबळावर लढल्या तर तेल अन् तुप दोन्ही जाण्याची भाती कदाचित शिवसेनेच्या नेतृत्वाला सतावून गेली असावी. त्यामुळेच त्यांनी प्रारंभी भाजपवर दबाव आणण्यासाठी स्वबळाचे शंख फुंकले; परंतु झाले काय? आज त्यांनीच युतीसाठी भाजपपुढे हात केला. राज्यातील सर्व नगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक एकत्र लढविण्याबाबत या दोघांतही मतौक्य झाले असले तरी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड या महत्वाच्या महापालिकांतील युतीबाबत अद्याप तरी काहीही निर्णय झालेला नाही. तथापि, महापालिका निवडणुकांतही युती होईल याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. राज्यातील शिवसेना-भाजप हे असे जोडपे आहे, ते वारंवार फारकत घेतात आणि सत्तेचा हनीमून जवळ आला की पुन्हा बोहल्यावर चढतात. त्यांच्या अशा वागण्याचे आता कुणालाही नवल वाटत नाही. निवडणुका या जिंकण्यासाठीच लढाव्या लागतात. स्वतंत्र लढलो तर पराभवाची शक्यता दाट आहे. राज्यातील राजकीय समीकरणे बदललेली आहेत. जातीय ध्रुवीकरण झालेले आहे; आणि सत्ताधारी भाजपसह शिवसेनेलाही फारसे अनुकूल मत कुठेच राहिले नाही. अशा परिस्थितीत स्वबळावर लढणे म्हणजे दोघांनीही पायावर धोंडा पाडून घेणे होय, याची जाणिव भाजप अन् सेनेच्या नेतृत्वाला नसावी इतके ते नेते नक्कीच दुधखुळे नाहीत. त्यामुळे काडीमोड घेऊनही पुन्हा सत्तेचा हनीमून साजरा करता येईल का? या सुखद विचारानेच हे दोघे पुन्हा निवडणुकीच्या मांडवात बोहल्यावर चढले आहेत. ठीक आहे, वारंवार घटस्फोट घेऊन पुन्हा पुन्हा एकत्र येणार्‍या या जोडप्याला निवडणुकीसाठी आमच्या शुभेच्छा!!
--------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खसखसच्या शेतीचे वास्तव!