सरसंघचालक काय चुकीचे बोलले!
संस्कार आणि मानवता हरपल्याने महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. इंडियामध्ये जे घडत आहे, ते भारतात मात्र होत नाही. कारण भारताने परंपरेतून आलेले संस्कार अजूनही टिकवून ठेवले आहेत, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शुक्रवारी केले अन् पत्रकारितेत स्वत:ला पुरोगामी भासविण्याचा अनाठायी प्रयत्न करताना, मीडियाने भलतेच ताळतंत्र सोडल्याचे दिसून आले. त्यांचा विरोध या वक्तव्याला कमी आणि सरसंघचालकांवर टीका करण्याच्या हेतुने अधिक होता. सरसंघचालक काय चुकीचे बोलले, या प्रश्नाचे उत्तर माध्यमे काय देऊ शकतील?
....
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या एका विधानावरून मीडियामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे. आसामच्या सिल्चर येथे नागरिकांसोबत डॉ. भागवत यांचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात उपस्थित एका नागरिकाने डॉ. मोहन भागवत यांना एक प्रश्न केला, की आजकाल इंडियात महिलांच्या विरोधात गुन्हे वाढत आहेत. बलात्कार, विनयभंगाच्या घटना वाढत आहेत. यात हिंदूंवरच मोठ्या प्रमाणात अत्याचार होताना दिसत आहेत. हिंदूंचे मनोबल खच्ची करण्याचा हा प्रयत्न दिसून येतो. यासंदर्भात आपल्याला काय वाटते? या प्रश्नाच्या उत्तरात सरसंघचालक म्हणाले, ‘इंडियात ज्या घटना घडत आहेत, त्या अतिशय गंभीर आणि अश्लाघ्य आहेत. पण, असे भारतात मात्र होत नाही. जेथे इंडिया नाही, केवळ भारत आहे, तेथे अशा घटना होत नाहीत. ज्याने भारताशी नाते तोडले, तेथे अशा घटना होतात. असे होण्याला अनेक कारणे आहेत. त्यातील प्रमुख कारण सांगायचे तर आम्ही मानवता विसरलो. संस्कार विसरलो आहोत. मानवता आणि संस्कार हे पुस्तकातून शिकता येत नाहीत. ते परंपरेतून शिकावे लागतात. पालनपोषणातून ते आपोआप शिकता येतात. ते कुटुंबातून मिळतात. आम्ही कुटुंबात काय शिकतो हे महत्त्वाचे आहे. आज संपूर्ण जगाचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. पुरुषासाठी महिला केवळ भोगवस्तू आहे. ते तसे म्हणणार तर नाहीत, बोलले तर गदारोळ होईल. पण, त्यांचे आचरण महिला भोगवस्तू म्हणूनच असते. महिला स्वतंत्र असल्यामुळे तिला समानता प्रदान करण्यात येते. पण, त्याचा भाव उपभोगवादीच असतो. आमच्या देशात असे होत नाही. आम्ही तिला जगज्जननी म्हणतो. त्यामुळेच आम्ही कन्याभोजन करतो. उत्तर भारतात अनेक ठिकाणी मुलींना कुणाला नमस्कार करण्याची अनुमती दिली जात नाही. कारण, ती जगज्जननीचे रूप आहे. उलट तिलाच नमस्कार केला जातो. अनेक मोठे नेतेही असेच करतात. त्यांना कुणी नमस्कार करायला आले तर ते नकार देतात. उलट त्या कन्येलाच नमस्कार करण्यासाठी खाली वाकतात. ते हिंदुत्त्ववादी नाहीत, तरीही असे करतात. कारण, त्यांच्या परिवाराकडून त्यांना तसे संस्कार मिळालेले आहेत. आज करिअरचा जमाना आहे. त्यामुळे जो तो पैसा कमाविण्याच्या मागे लागला. त्यामुळे संस्कारासारख्या गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी त्यांना वेळच नाही. सरसंघचालकांचे हे मूळ वक्तव्य आहे. आता प्रश्न असा पडतो, की सरसंघचालकांचे हे मूळ वक्तव्य त्यांच्यावर दिवसभर रटाळ टीका करणार्या किती प्रसारमाध्यमांनी जसेच्या तसे दाखवले. त्यांच्या एकूण वक्तव्यापैकी अर्धवट वाक्ये मोडून तोडून दाखवायची. दोन-चार टवाळक्यांना कॅमेर्यासमोर उभे करून त्यांच्याकडून सरसंघचालकांवर टीका वदवून घ्यायची. रेड्यामुखी वेद वदविण्याची ही कला ज्ञानोबापेक्षा मीडियाला चांगलीच अवगत झालेली आहेच! परंतु, त्याचा समाजजीवनावर किती परिणाम होतो. आपण पत्रकारितेच्या मूल्यांना कसे पायदळी तुडवत आहोत, याचा विचार मात्र ही माध्यमे करत नाहीत. ही खेदाची आणि संतापजनकच बाब म्हणावी लागेल. खरे तर सरसंघचालकांचा हा वार्तालाप राष्ट्रीय चिंतन होते. या वार्तालापात ते फार महत्वाचे बोलले. संघचालक म्हणाले होते, कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत चालायची असेल तर माणूस पापभिरू असावा लागतो. त्यासाठी संस्कार आवश्यक असतात. आमच्या संस्कृतीतून आलेल्या संस्काराला आम्हाला शक्य तितक्या लवकर जागे करावे लागेल. याचा समावेश शिक्षणात करता आला तर परिस्थिती बदलणे शक्य होईल. तोवर कठोर कायदे आणि कठोर शिक्षेची तरतूद आवश्यक आहे. शासनाच्या हाती दंडाचे अधिकार असायलाच हवेत. त्याचा वापरही नीट व्हायला हवा. पण, विरोध करणार्यांवर केवळ कायद्याचा बडगा उगारून चालणार नाही. संस्कार म्हणूनच आवश्यक आहेत. ते वातावरणातून मिळतात. ते वातावरण आज दुर्दैवाने नाही. आम्ही प्रयत्न केले, तर या समस्येवर तोडगा निश्चितपणे शोधता येऊ शकतो. आम्ही महिलांकडे मातृशक्ती म्हणूनच पाहतो. ती भोगवस्तू नाही, तर देवी आहे. प्रकृतीची ती निर्माती आहे. आमच्या सर्वांच्या प्रेरणेची ती प्रेरकशक्ती आहे. आम्हाला सर्वकाही प्रदान करणारी ती माता आहे. हीच दृष्टी आम्ही सर्वांमध्ये आणत नाही, तोवर या गोष्टी थांबणार नाहीत. केवळ कायदे करून चालणार नाही. ते व्हावेतच, पण सोबतच संस्कारसुद्धा असायला हवेत, असे सरसंघचालक सांगत होते. संघचालकांच्या या वक्तव्यात त्यांनी महिलांचा कुठे उपमर्द केला असे वाटत नाही. ज्यांनी सरसंघचालकांचे भाषण ऐकले असेल, त्यांनाही त्यांच्या भाषणात वादग्रस्त असे काही आढळत नाही. असे असताना मीडियाने सरसंघचालकांच्या भाषणाला मोडून तोडून दाखवून काय हाशील केले असेल, हे देव जाणे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या संघटनेकडे पाहण्याचा काहींचा दृष्टिकोन पूर्वग्रहदूषित आहेच. परंतु, निष्पक्ष पत्रकारितेचा वसा ज्यांनी स्वीकारला आहे, अशा मीडियानेदेखील हा पूर्वग्रहदूषितपणा जोपासावा का, हा खरा यक्षप्रश्न आहे. सरसंघचालकांचे मूळ वक्तव्य वाचल्यानंतर त्यांनी कोणत्या दृष्टिकोनातून इंडिया आणि भारत या शब्दाचा उच्चार केला, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. पण, वाहिन्यांनी दिवसभर अकारणच गरळ ओकण्यात आपला वेळ घातला. या गरळ ओकणीतून टीआरपी वाढेल, असे काही नव्हते. तरीदेखील ही गरळ ओकली गेली. कदाचित, त्यांचा उद्देश सरसंघचालकांच्या वक्तव्याला कमी आणि संघावर टीका करण्याच्या हेतूने अधिक असावा, असे वाटते. पत्रकारितेत स्वत:ला पुरोगामी भासविण्याचा अनाठायी प्रयत्न करताना माध्यमांनी स्वतःची नैतिक लक्ष्मणरेखा ओलांडली, असेच खेदाने म्हणावे लागेल. सरसंघचालकांचे मूळ भाषण ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट न्यूजभारती डॉट कॉम’ या संकेस्तस्थळावर उपलब्ध आहे. हे संपूर्ण भाषण तेथे व्हीडिओ रूपात असल्याने ते पाहाताही येते आणि ऐकताही येते. नागरिकांनी ते स्वतःच्या डोळ्याने पाहिले आणि कानाने ऐकले तर मीडियाचा सरसंघचालकांविषयी असलेला पूर्वग्रहदूषितपणा ठसठसीतपणे समोर येईल. संघद्वेषाची काविळ झालेल्या मीडियाला सदबुद्धी येवो, हीच सध्या देवाकडे प्रार्थना करावी लागेल!

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा