पंतप्रधानांनी राजीनामा देणेच श्रेयस्कर!

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रतिमा डागाळण्याचे काम सध्या अमेरिकन व ब्रिटनची प्रसारमाध्यमे करत आहेत. डॉ. सिंग यांच्या सत्ताकाळात घोटाळ्यांचा उच्चांक झाला, हे खरे असले तरी त्यांच्या विद्वत्तेवर व प्रामाणिकपणावर संशय घेणे योग्य ठरणार नाही. खरे तर राजकारण हा कधीच डॉ. सिंग यांचा प्रांत नव्हता. ते कुशल नोकरशहा असून, अर्थतज्ज्ञ आहेत. कलंकित होत जाणारी प्रतिमा पाहाता, त्यांनी राजीनामा देऊन कधीही या राजकीय चिखलातून बाहेर पडणे श्रेयस्कर ठरेल.

.....
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर अलिकडे विदेशी प्रसारमाध्यमे फारच तोंडसुख घेत आहेत. भारतीय प्रसारमाध्यमे पंतप्रधानांना लक्ष्य करतात, ही बाब समजण्यासारखी आहे. मोठ्या प्रमाणात उघड होणारे घोटाळे, जनतेत सरकारबद्दल असलेला रोष आणि विरोधी पक्षांनी उघडलेली जोरदार मोहीम यामुळे पंतप्रधानांवर देशी प्रसारमाध्यमे टीका करतात, ही बाब समजण्यासारखी आहे. परंतु, पंतप्रधान निष्क्रीय आहेत, ते मौनी आहेत. कूचकामी आहेत, असा ठपका ठेवून भारतीय पंतप्रधानांची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिमा मलिन करण्याचे काम विदेशी प्रसारमाध्यमे करत असतील तर त्यांच्या कृतीत काही तरी काळेबेरे असावे, असा संशय बळावतो आहे. आठवडाभरापूर्वी अमेरिकेतील ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या दैनिकाने पंतप्रधान मनमोहन सिंग हे मौनी असल्याचा ठपका ठेवत, त्यांना देशातील सर्वात निष्क्रिय पंतप्रधान ठरविण्याचा उपद्व्याप केला. तत्पूर्वी प्रसिद्ध ‘टाईम’ मासिकानेदेखील पंतप्रधानांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत ते कूचकामी असल्याचे प्रमाणपत्र बहाल केले होते. अलिकडच्या काळात ब्रिटन व अमेरिकेतील बर्‍याच दैनिकांनी पंतप्रधानावर टीका करणारे बरेच लेख प्रसिद्ध केले आहेत. भारतीय पंतप्रधान कूचकामी व मौनीबाबा असल्याची एकप्रकारे प्रतिमाच त्यांनी तयार केली. पंतप्रधानांना अशाप्रकारे अवमानित करण्याचे काम मोठ्या प्रमाणात होत असताना, देशी वृत्तपत्रेही पंतप्रधानांच्या प्रतिमेवर चिखलफेक करत असल्याने, आंतरराष्ट्रीयस्तरावर जे छापले जात आहे, ते खरे आहे, अशी एक भावना निर्माण झाली आहे. वास्तविक पाहाता, देशाच्या प्रमुखाची प्रतिमा डागळली जात असताना, तेथे देशाची प्रतिमादेखील डागाळली जात आहे, हे वास्तव फार क्वचित लोकांच्या लक्षात आले असेल. अमेरिका, ब्रिटनसह काही युरोपीय देशांचा पंतप्रधानांवर रोष असणे साहाजिक आहे. विदेशी गुंतवणूकदारांसह देशांतर्गत उद्योगपती घराणेदेखील पंतप्रधानांवर नाराज असून, देशातील औद्योगिक वातावरण या लोकांना सध्या तरी अनुकूल नाही. या गुंतवणूकदारांना असे वाटते, की रातोरात आपल्याला हवे असलेले आर्थिक धोरण अर्थतज्ज्ञ असलेल्या पंतप्रधानांनी स्वीकारावे. बँका व विमा क्षेत्राचे खासगीकरण व्हावे, किरकोळ विक्रीच्या क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणूकीस (एफडीआय) परवानगी देण्यात यावी, उद्योगांना मिळणार्‍या कोट्यवधींच्या सवलती पूर्ववत सुरु व्हाव्यात, यासाठी या देशी - विदेशी उद्योगपतींनी पंतप्रधानांवर दबाव वाढविला आहे. परंतु, देशांतर्गत राजकीय वातावरण आणि आर्थिक अस्थैर्य पाहाता पंतप्रधान या दबावाला बळी पडत नसल्याने त्यांच्या बदनामीची जोरदार मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहीमेला विरोधक जशी उघड हवा देत आहे, त्याचप्रमाणे हे देशी-विदेशी उद्योगपती विदेशी प्रसारमाध्यमांना हाताशी धरुन पंतप्रधानांना डागाळण्याच्या कुरापती करत आहेत, अशी एक शंका बळावते. दुसरे असे, की ब्रिटन व अमेरिकेतील मीडिया सध्या कमालीचा तोट्यात चालला आहे. खासकरुन मुद्रीत माध्यमांवर मोठे आर्थिक गडांतर आले असून, अनेक वृत्तपत्रे बंद पडली. तर काही चालतच नसल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत या वृत्तपत्रांनी विदेशी आवृत्त्या काढल्या किंवा इतर देशातील स्थानिक मीडियांत आपली गुंतवणूक केली. सरकारवर टीका केली, की वृत्तपत्रे चालतात, या भ्रमाप्रमाणे या विदेशी मीडियाचे धोरण असून, त्यानुसारच पंतप्रधानांविरुद्ध लेख प्रकाशित केले जात आहेत. असे केल्याने गुंतवणूकदार उद्योगपतीही खुष होतात. संबंधित वृत्तपत्राची चर्चाही घडून येते, असा दुहेरी उद्देश साध्य होत असल्याने पंतप्रधानांवर टीका करणे हा एककलमी कार्यक्रम या विदेशी वृत्तपत्रांनी हाती घेतल्याचे दिसते. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातील युपीएच्या सरकारने घोटाळ्यांचा उच्चांक गाठला ही बाब खरी आहे. दररोज नवनवे घोटाळे उघडकीस येत आहेत. कोळसा घोटाळ्यात तर स्वतः पंतप्रधान अडकले आहेत. या घोटाळ्यावरुन संसदेचे कामकाज ठप्प पाडले गेले. विरोधक रस्त्यावर उतरून आंदोलन छेडणार असून, पंतप्रधानांच्या राजीनाम्यासाठी प्रचंड दबावदेखील वाढला आहे. या सर्व घडामोडींचे समतोल चित्रण देशी प्रसारमाध्यमे करत असताना पंतप्रधानांच्या प्रामाणिकतेवर संशय घेण्याचे टाळले जात आहे. खरे तर डॉ. मनमोहन सिंग हे काही कसलेले राजकारणी नाहीत. राजकारण हे त्यांचे क्षेत्रही नाही. अर्थतज्ज्ञ असलेले डॉ. सिंग हे कुशल नोकरशहा असून, प्रचंड विद्वान आहेत. त्यांच्या बायोडेटावर नजर टाकली, की त्यांच्या विद्वत्तेची प्रचिती येते. एकेकाळी आर्थिक आरिष्टात अडकलेल्या देशाला सावरण्याचे काम त्यांनी केले असून, आतादेखील ते अत्यंत कुशलतेने देशाचे आर्थिक आरिष्ट दूर करु पाहात आहेत. त्यासाठी त्यांनी देशी - विदेशी गुंतवणूकदार व उद्योगपतींची नाराजीदेखील ओढावून घेतलीच आहे. राहिला घोटाळ्यांचा प्रश्‍न, तो डॉ. सिंग यांच्या अकुशल राजकीय नेतृत्वाचा परिपाक असावा व त्यांचा गैरफायदा घेतला गेला असावा, हे सांगण्यासाठी कुण्या तज्ज्ञाची गरज नसावी. विरोधी पक्ष सध्या पंतप्रधानांचा राजीनामा मागत आहेत. पंतप्रधानांनीसुद्धा राजकारण आपले क्षेत्र नाही, कुठून अवदसा सुचली आणि पंतप्रधानपद स्वीकारले, हा विचार करुन राजीनामा द्यावा व मोकळे व्हावे, हेच कधीही श्रेयस्कर ठरेल. तसेही नजीकच्या काळात कॉंग्रेस पुन्हा सत्तेवर येण्याची शक्यता नाही. उद्या लोकसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या पानिपताचे खापर डोक्यावर फुटण्याआधी पंतप्रधानांनी राजीनामा देणे कधीही शहाणपणाचे ठरेल. आज पंतप्रधानांची प्रतिमा डागाळण्यासाठी टाईम किंवा वॉशिंग्टन पोस्टसारखे विदेशी प्रसारमाध्यमे त्यांना कूचकामी नेता असे म्हणत आहेतच. उद्या त्यांच्या नेतृत्वात लढविल्या गेलेल्या निवडणुकीत पक्षाचे पानिपत झाले तर या कूचकामीत्वावर हेच विदेशी प्रसारमाध्यमे शिक्कामोर्तब केल्याशिवाय राहणार नाहीत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खसखसच्या शेतीचे वास्तव!