दुष्काळाच्या पापाचे मूळ ऊसातच!
‘‘साखर कारखान्यांसाठी पाणी पळविण्याचे काम कॉंग्रेसच्या नेत्यांनी केले. ज्या-ज्या देशात ऊस पिकविला जातो, तेथे पावसाचे पाणी वापरले जाते. केवळ भारतातच कालव्याने पाणी देऊन ऊस जगविला जातो. कोकणात अथवा ईशान्य भारतात ऊस पिकविला गेला असता तर वाईट वाटले नसते. पण ज्या भागात पाण्याचे आधीच दुर्भिक्ष्य आहे, तेथे ऊस घेतला जातो. हे चुकीचे असल्याने पीकरचनेत बदल करण्याच्या अनुषंगाने शेतकरी संघटना आंदोलन करेल’’, अशी हाक शेतकरी संघटनेचे नेते खा. शरद जोशी यांनी दिली आहे. जोशी जे बोलले त्यात चुकीचे काहीही नाही. राज्यातील एकूण प्रकल्प साठ्यांपैकी १७ टक्के पाणी जर केवळ ऊसासाठी वापरले जात असेल तर सिंचन, दैनंदिन वापर, आणि उद्योगासाठी पाणी आणायचे कोठून? हा खरा सवाल आहे. सध्या १९७२ पेक्षाही भीषण असा दुष्काळ पडला. राज्यातील ११ हजार गावे तहानेने व्याकूळ असताना तब्बल दोन हजार छोट्या-मोठ्या प्रकल्पांतील पाण्याने तळ गाठला आहे. एप्रिलमध्ये ही परिस्थिती असताना आणखी दोन महिन्यांत काय होईल, याची कल्पना करता येत नाही. आजच्या अभूतपूर्व दुष्काळाला सरळसरळ राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच जबाबदार आहे. ऊसासाठी पाण्यावर दरोडे घातले गेले, पाणी अडविण्याऐवजी तब्बल ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा करुन ६७० प् रकल्प अर्ध्यावरच सोडण्यात आले. ऊसाने पाणी पळवले नसते तर कदाचित दुष्काळाचे चित्र वेगळे असते. तेव्हा, या दुष्काळाच्या पापाचे मूळ या ऊसातच दडून आहे!.......
औरंगाबाद येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना शेतकरी संघटनेचे नेते खा. शरद जोशी म्हणाले होते, की पश्चिम घाटातून पाणी पळविले जाते. नेत्यांनी हे पाणी उसाला अधिक मिळावे, असे प्रयत्न केले. त्यामुळे ज्या भागात पाणीटंचाई आहे तेथे ऊस कारखाने आहेत. ऊस व पाणी यांचा परस्पर संबंध लक्षात घेऊन पीकरचनेत बदल व्हावा, यासाठी शेतकरी संघटना आंदोलन करेल. जमिनीत पाणी मुरू दिले नाही, त्यामुळे दुष्काळ निर्माण झाला. नद्या कोरड्या पडल्या. साखर कारखान्यांसाठी पाणी पळविण्याचे काम कॉंग्रेसच्या नेत्यांनी केले. ज्या-ज्या देशात ऊस पिकविला जातो, तेथे पावसाचे पाणी वापरले जाते. केवळ भारतातच कालव्याने पाणी देऊन ऊस जगविला जातो. ज्या भागात पाण्याचे आधीच दुर्भिक्ष्य आहे, तेथे ऊस घेतला जातो. दुष्काळी परिस्थितीला ऊसपीकदेखील कारणीभूत असल्याचे विश्लेषण खा. जोशी यांनी केले होते. खा. जोशींनी जे मुद्दे उपस्थित केले ते एकदम बरोबर आहेत. नगर आणि शेजारील सोलापूर जिल्ह्यात सध्या भीषण दुष्काळाचे संकट कोसळलेले आहे. या संकटाची कारणमिमांसा केली तर त्याला ऊस पीकच जबाबदार धरावे लागेल. दुष्काळ ही नैसर्गिक आपत्ती आहे. कोणतीही नैसर्गिक आपत्ती यायची असेल तर ती पूर्वसंकेत देऊन येते. दुष्काळही चोर पावलाने येतो, परंतु त्याचे संकेत मिळतच असतात. या वर्षीचा दुष्काळ हा राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या नेत्यांची देण आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्या सिंचन घोटाळ्याचा मुद्दा सध्या गाजतो आहे. हा सिंचन घोटाळा तब्बल ७० हजार कोटी रुपयांचा असल्याचे सांगितले जाते. ‘धरणात पाणी नाही तर मुतू काय’? असा सवाल करणार्या आणि नंतर काका शरद पवार यांनी खडेबोल सुनावल्यानंतर आत्मक्लेष करुन घेणार्या अजित पवारांनी जलसंपदामंत्री असताना काय दिवे लावले याचा लेखोजोखा मीडियाने चव्हाट्यावर आणलाच आहे. हा लेखाजोखा आगामी निवडणुकांत निश्चितच दिसून येईल. राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे लोकं त्यांना मतं देतील, की मूत हेही स्पष्ट होईल! कृषिखात्याच्या माहितीनुसार, सिंचन प्रकल्पांसाठी गत दहा वर्षात ७० हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. परंतु, केवळ ०.१ टक्केच सिंचनाचे उद्दीष्ट साध्य झाले. आजही तब्बल ६७० प्रकल्प अर्धवट असून, त्यावर ७८ हजार ४५१ कोटींचा खर्च आजवर झाला. भारताचे नियंत्रण व लेखा परीक्षक (कॅग)ने नुकत्याच सादर केलेल्या अहवालात राज्यातील २४२ अपूर्ण प्रकल्पांचा खर्च २६ हजार ६१७ कोटींनी वाढविल्या गेल्याचा निष्कर्ष काढलाच आहे. राज्यात १९७२ मध्ये पडलेला दुष्काळ हा अन्नधान्य टंचाईचा होता. यावर्षीचा दुष्काळ हा पाणी व चाराटंचाईचा आहे. पाणीच नाही तर चारा कोठून येणार आणि या पाणीटंचाईसाठी सिंचनांच्या सुविधांचा अभाव हे एक प्रमुख कारण द्यावे लागेल. त्यासाठी अजित पवार यांनाच आरोपीच्या कठड्यात उभे करावे लागणार आहे. पाण्याचे दीर्घकालिन नियोजन नसणे, जमिनीत पाणी न जिरवले जाणे आणि पिण्याच्या पाण्यासाठी योग्य ती तरतूदच न होणे, ही या दुष्काळाची प्रमुख कारणे आहेत. या कारणांचा विचार केला तर या दुष्काळाला ऊस पीकच प्रामुख्याने जबाबदार धरावे लागेल. राज्यात सरासरी १७.३० दशलक्ष हेक्टरवर हे पीक घेतले जाते. त्यात पुणे, अहमदनगर, सांगली-सातारा, सोलापूर या पट्ट्यासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांचा भाग येतो. राज्यात २०२ साखर कारखाने असून, ६८ कारखाने खासगी आहेत. यातील बहुतांश कारखाने हे कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांचे आहेत. या कारखान्यांतून दररोज २५००-१०,००० टन गाळप होते. साखर, उपपदार्थ आणि इतर सहउत्पादनांपोटी सुमारे ३० हजार कोटींची गुंतवणूक या क्षेत्रात असून, वर्षाकाठी २० हजार कोटी रुपयांची उलाढाल साखर उद्योग करतो. हा साखर उद्योगच कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची राजकीय शक्तिस्थाने आहेत. त्यामुळे साखर उद्योगासाठी वारेमाप पाण्याचा वापर केला जातो. ज्या देशांत ऊस पीकाचे उत्पादन घेतले जाते, त्या देशात पावसाचे पाणी वापरले जाते. पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन अथवा इतर साधनांचा वापर केला जातो. पाण्याची बचत करण्याचे धोरण राबविले जाते. परंतु, केवळ महाराष्ट्रात ऊसासाठी पारंपरिक पद्धतीच्या ‘डुबूक सिंचन’ पद्धतीचा वापर केला जातो. त्यासाठी पाण्यावर सर्रास दरोडे घातले जातात. कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु झाला, की दररोज १.५० ते तीन लाख लीटर पाणी वापरले जाते. सरकारच्या अनुमानानुसार किलोभर साखरनिर्मितीसाठी ऊस लागवड ते उत्पादनापर्यंत ३५०० लीटर पाणी लागते. राज्यातील एकूण प्रकल्पसाठ्यांपैकी १७ टक्के पाणी केवळ ऊसासाठी वापरले जाते. एकूण पिकांच्या ७० टक्के पाणी केवळ ऊस हे एकटे पीक घेते. ऊसाऐवजी तेलबिया आणि तृण व भरड धान्यांचे उत्पादन घेतले तर ४.५० टक्केच पाणी लागेल. शिवाय, चारा व अन्नधान्याचे उत्पादनही होईल. परंतु, राजकारणात टिकायचे असेल तर ऊसाशिवाय पर्याय नाही. आणि ऊस हवा असेल तर पाण्यावर दरोडे घालावेच लागेल, असा एककलमी कार्यक्रम कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आखला आहे. एकीकडे प्रकल्प अर्धवट ठेवून सिंचनच होऊ द्यायचे नाही, दुसरीकडे ऊसासाठी उपलब्ध पाण्यावर दरोडे घालायचे, त्यामुळेच यंदाचा भीषण दुष्काळ निर्माण झाला. या दुष्काळामुळे ११ हजार गावे तहानेने व्याकूळ झालेली आहेत. ३९०५ गावांची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली. तर राज्यातील छोट्या-मोठ्या दोन हजार प्रकल्पांत २७ हजार ८२१ क्युबिक मीटर्स पाणीसाठा हवा असताना तो आजरोजी केवळ ८ हजार ३९९ क्युबिक मीटर्स एवढा आहे. म्हणजेच, पुढील काळात लवकर पाऊस झाला नाही तर दुष्काळग्रस्त भागातील जनतेच्या नरकयातनांचा विचारही करता येणार नाही, अशी परिस्थिती आहे. ऊसासाठी पाण्यावर दरोडे घातले गेले नसते आणि सिंचन घोटाळा झाला नसता तर आज कदाचित दुष्काळेच चित्र दिसले नसते. केवळ ऊस पिकाचा हव्यास हेच या दुष्काळाचे इतर कारणांपैकी प्रमुख कारण आहे. आता शेतकरी संघटना पीक बदलांसाठी आंदोलन छेडणार असल्याची घोषणा खा. शरद जोशी यांनी केलीच आहे. त्यांच्या या आंदोलनाची सफल फलनिष्पत्ती हाती येवो, अशी अपेक्षा बाळगू या!
........
साखर उत्पादनालाही दुष्काळाचा फटका!
या हंगामात १७० कारखान्यांनी गाळप केले. तर १२५ कारखाने बंद होते. नगर, सोलापूर, पुणेसारख्या ज्या भागात दुष्काळ भीषण आहे त्या भागात ऊस उत्पादनालाही मोठा फटका बसला. दुष्काळामुळे सरासरी १८ टक्के साखर उत्पादन घटेल, अशी शक्यता आहे. असे झाले तर यावर्षी १०.४३ मेट्रिक टन साखर उत्पादन होईल, असा अंदाज आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा