पोलिसांनी लाज घातली!



महाराष्ट्राचे पोलिस खाते बदनाम झाले आहे. या राज्याच्या गृहमंत्र्यांचा या खात्यावर अजिबात वचक नसून, हे गृहमंत्री करतात तरी काय, हा संतप्त सवाल निर्माण झाला आहे. संपूर्ण पोलिस यंत्रणा सडलेली असून, नगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश प्रसाद किंवा आर.के.सहाय, विश्‍वासराव नागरेसारखे दोन चार प्रामाणिक अधिकारी ही सडलेली यंत्रणा दुरुस्त करू शकत नाहीत. सर्वसामान्य जनतेच्या संरक्षणासाठी निर्माण झालेले हे पोलिस दल सर्वसामान्यांच्या मूळावर उठल्याचे दुर्देवी चित्र असून, लोकांना वखवखलेल्या डोळ्यांच्या पोलिसांची व पोलिस ठाण्याच्या गुंडगर्दीची आता भीती वाटू लागली आहे. अन्याय, अत्याचार सहन करणे परवडेल परंतु, पोलिस ठाण्यात जाऊन आणखी अत्याचार ओढावून घेणे नको, असा विचार गोरगरीब नागरिक करत आहेत. पोलिस गोरगरीब, सामान्य नागरिकांच्या जीवावर उठले आहेत, हे थोडके झाले, की काय कुणास ठाऊक आता ते आपल्याच खात्यातील महिलांच्या इज्जतीवरदेखील टपून बसल्याचे चव्हाट्यावर आले आहे. तसे पोलिस दलात काम करणार्‍या महिलांचे लैंगिक शोषण होणे ही काही नवी बाब राहिली नाही. बहुतांश महिला पोलिस या अन्यायाला वाचा फोडण्याच्या भानगडीत पडत नाहीत. पोलिस दलात नोकरी करायची म्हणजे, हे सहन करणे आलेच, अशी मानसिकता त्यांनी बनवून घेतलेली दिसते. बदली नको असेल, रात्रपाळीची ड्युटी नको असेल, वैद्यकीय बिले किंवा रजा हवी असेल तर महिला पोलिस शिपायांचे लैंगिक शोषण होणे ही नित्याचीच बाब झाली आहे, आणि या प्रकाराला संबंधित महिला शिपाईदेखील नशिबाचा भाग म्हणून सामोरे जात आल्या आहेत. या प्रकाराला वाचा फुटू शकत नाही, कारण याबाबत कुणाला बोलताही येत नाही, अशी महिला शिपायांची अवस्था असते. पुरोगामी महाराष्ट्राची शान असलेल्या कोल्हापूरात जे काही चव्हाट्यावर आले आहे, त्या प्रकाराने महाराष्ट्र पोलिसांचीच नव्हे तर या राज्याच्या स्वच्छ चारित्र्याचे गृहमंत्री म्हणून ओळख असलेल्या आर.आर.पाटलांच्या इज्जतीचे धिंडवडे देशपातळीवर निघाले आहे. महाराष्ट्राची इज्जत घालण्याचे काम पोलिस दलातील काही नरपशुंनी केले. पोलिस खात्यातील तरुणीच सुरक्षित नसतील तर महाराष्ट्रातील इतर तरुणींची सुरक्षितता तरी कशी राहील, असा काळीज चिरणारा सवाल यानिमित्ताने सामोरे आला आहे. कोल्हापूर येथे पोलिस प्रशिक्षण केंद्र आहे. परंतु, हे पोलिस प्रशिक्षण केंद्र अक्षरशः कुंटणखाना म्हणून पोलिस दलात नावाजले गेले. फरक फक्त ऐवढाच की कुंटणखान्यातील महिलांना शरीरविक्रयापोटी पैसा मिळतो, येथील तरुणी मात्र वरिष्ठ अधिकारी फुकट उपभोगत होते. येथे प्रशिक्षण घेतलेल्या तरुणींकडे संशयी नजरेने का पाहिल्या जाते याचे उत्तर आता काल परवा मिळाले आहे. या केंद्रामध्ये दाखल झालेल्या किमान ११ तरुणींना सहकारी हवालदारांपासून ते वरिष्ठ अधिकार्‍यांनी जे प्रशिक्षण दिले त्यामुळे त्या गर्भवती राहिल्या. हे प्रशिक्षण म्हणजे भविष्यात नोकरी कशी करायची याचा नमुना होता की काय, याचे उत्तर आता मिस्टरक्लिन म्हणून ओळख सांगणार्‍या गृहमंत्री आर.आर.पाटलांनी द्यावे. या ११ पैकी चौघींचे गर्भपात जिल्हा रुग्णालयात करण्यात आले असून, तसे अधिकृत पुरावेदेखील कोल्हापूरचे खासदार आणि राज्याचे माजी मंत्री सदाशिवराव मंडलीक यांच्या हाती लागले असल्याची माहिती त्यांनी दिली होती. या प्रकरणी युवराज कांबळे या हवालदाराला प्रारंभी अटक करण्यात आली, त्यानंतर दोन वरिष्ठ अधिकारी निलंबित करण्यात आले. युवराजच्या पत्नीने जाहीरपणे सांगितले, की युवराजला बळीचा बकरा बनविले जात आहे आणि अनेक वरिष्ठ अधिकारी यात गुंतले असून, या तरुणी नियमितपणे त्यांना पाठवल्या जात होत्या. म्हणजे, हे प्रशिक्षण केंद्र वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना तरुणी पुरवण्याचे केंद्र ठरले होते. या प्रशिक्षण केंद्रात सध्या ७१ तरुणी दाखल झालेल्या होत्या. त्या सर्वच तरुणींची तपासणी झाली असता, त्यामध्ये ११ तरुणी या गर्भवती असल्याचे आढळून आले. तसेच, बर्‍याच तरुणींचे कौमार्यभंग असल्याचेही दिसून आले. अर्थात, कौमार्यभंग हा प्रकार तरुणींच्या वैयक्तीक जीवनाचा भाग असला तरी ११ तरुणी गर्भवती राहतात हा प्रकार नक्कीच पोलिसांच्या इज्जतीला काळिमा फासणारा आहे. या ११ तरुणींचे वारंवार लैंगिक शोषण झाले असून, शोषणग्रस्त तरुणींची संख्या किमान ३० ते ४० च्या घरात असावी, असा एक संशय आहे. अशा प्रकारे जर हे पोलिस प्रशिक्षण केंद्र कुंटणखाना बनविल्या गेले असेल तर त्यात एकटा दुकटा अधिकारी सहभागी असू शकत नाही. अनेक वरिष्ठ पोलिस अधिकारी आपल्या लैंगिक तृष्णेसाठी येथील तरुणींचा नियमित वापर करत असावेत, हा संशय पक्का होतो आहे. पोलिस दलात महिलांना हवालदार म्हणून काम करताना अनेकदा सहकारी किंवा अधिकारी यांच्या लैंगिक शोषणाला बळी पडावे लागते. त्यात जर संबंधित तरुणी देखणी असेल तर तिच्यावर अनेकांचा डोळा असतो. ज्येष्ठ आयपीएस अधिकारी एम.एस.गिल हे पंजाबचे पोलिस खात्याचे महासंचालक असताना त्यांनी लैंगिक भावनेने शरीरास स्पर्श केल्याची तक्रार आयएएस अधिकारी महिलेने केली होती. हरियाणाचे वरिष्ठ पोलिस अधिकारी एका तरुणीचा विनयभंग करतात आणि पुढे ही तरुणी आत्महत्या करते, असे प्रकरण नुकतेच देशपातळीवर गाजले होते. ही प्रकरणे म्हणजे हिमनगाचे टोक आहे. अनेक प्रकरणे तर उघडकीसच येऊ दिली जात नाहीत. कोल्हापूरचे वासनाकांडदेखील प्रारंभी दाबून टाकण्याचा प्रयत्न झाला. परंतु, प्रसारमाध्यमांनी व खा. मंडलीक यांनी हा विषय चव्हाट्यावर आणल्यानंतर राज्याच्या गृहमंत्र्यांचे या प्रकरणाकडे लक्ष गेले. आता केंद्रीय महिला आयोगानेदेखील या प्रकरणी महाराष्ट्र सरकारकडे अहवाल मागितला आहे. नाशिकच्या वादग्रस्त आणि भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असलेल्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती मैथिली झा या वासनाकांडाची चौकशी करत असल्या तरी त्यांच्या चौकशीवर संशय घेता येऊ शकतो. प्रकरणाचे गांभीर्य पाहाता, या प्रकरणाची चौकशी श्रीमती मीरा बोरवणकर यांच्यासारख्या कडक आणि ज्येष्ठ महिला अधिकार्‍यांकडेच सोपवायला हवी होती. सध्या झी मराठी वाहिनीवर लज्जा नावाची एक मालिका गाजते आहे. कामाच्या ठिकाणी महिलांचा कसा लैंगिक छळ होतो, आणि त्यातून घरगुती, सामाजिक प्रश्‍न कसे निर्माण होतात, हा विषय या मालिकेत हाताळण्यात आला आहे. या राज्याच्या निष्क्रिय गृहमंत्र्यांनी ही मालिका जरुर पाहावी, किमान या प्रकरणाचे गांभीर्य तरी त्यांना तातडीने कळेल. पुरोगामी महाराष्ट्र अशी उदात्त ओळख असलेल्या महाराष्ट्राला स्त्री सन्मानाचा फार मोठा वारसा आहे. राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले ते अलिकडे राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी महाराष्ट्राचे नाव मोठे केले आहे. देशाला दिशा देण्याचे काम या कर्तृत्त्ववान महिलांकडून राज्यात झाले आहे. अशा राज्याचे मस्तवाल पोलिस अधिकारी जर महिलांच्या इज्जतीवर हात घालत असतील, लोकांच्या तरुण लेकीबाळींवर वाईट डोळा ठेवून असतील तर मिस्टरक्लिन अशी ओळख सांगणार्‍या गृहमंत्री आर.आर.पाटलांनी या पोलिसांचा माज एकदा उतरवलाच पाहिजे. मस्तवाल पोलिस अधिकार्‍यांना वठणीवर आणणारी कारवाईच आता आबांकडून अपेक्षित आहे. जेणेकरून, पोलिस प्रशिक्षण केंद्रे कुंटणखाने न बनता जागृत व चारित्र्यशील महिला पोलिस दल निर्माण करणारे केंद्र बनतील.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खसखसच्या शेतीचे वास्तव!