
अणूऊर्जा ही काळाची गरज आहे. काही बाबी काळाची पाऊले ओळखून स्वीकारायच्या असतात. इंधनाचे सर्व पर्याय जेव्हा काळाच्या ओघात संपणार आहेत, तेव्हा अणूऊर्जा हाच पर्याय सक्षम ठरेल. परंतु, प्रस्तावित जैतापूर प्रकल्पाला विरोध करून शिवसेना विकासाला आडकाठी घालत आहे. बरे, यानिमित्ताने शिवसेना नेतृत्त्वाच्या खंबीर की काय त्या नेतृत्त्वाचीदेखील परीक्षा झाली. या परीक्षेत उद्धव ठाकरे काठावरदेखील उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. जैतापुरातील स्थानिकांचा कळवळा असल्याचा डिंडोरा पिटणारे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव हे जैतापुरात पोलिसांच्या गोळीबारात ठार झालेल्या तरुणांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करतील, जखमींची विचारपूस करून त्यांना मदत मिळवून देतील, त्यांच्या दु:खात सहभागी होतील, अशी भाबडी अपेक्षा शिवसैनिकांना होती. मात्र, शिवसेनेसारख्या आक्रमक संघटनेचे हे खंबीर नेतृत्त्व तिकडे फिरकलेही नाहीत. उलटपक्षी जैतापूर पेटले असताना कार्याध्यक्ष मध्य प्रदेशातील कान्हा-केसली या राष्ट्रीय उद्यानात जंगल सफारीचा आनंद लुटत होते. तसेही राज्यात शिवसेनेचे ढाण्या वाघ फारच मोजके शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे कान्हा अभयारण्यातील वाघांना पाहून आपले दु:ख हलके करण्याचा पर्याय तर ठाकरे यांनी निवडलेला नाही ना, अशी राजकीय चर्चा यानिमित्ताने सुरु झाली होती.
एक ऐतिहासिक भयानक वास्तव आहे. म्हणे, रोम जळत असताना, नीरो फिडल वाजवित होता. शिवसेनेचे हे नीरोदेखील जैतापूर पेटवून जंगल सफारीचा आनंद लुटत होते. त्यामुळेच कदाचित, भविष्यात जैतापूर जळत असताना, उद्धव कॅमेर्याने छायाचित्रे टिपत होते, अशा वाक्याने शिवसेनेच्या असंवेदनशीलपणाचे वर्णन केले जाईल. मुंबईवर जेव्हा २६/११ चा अतिरेकी हल्ला झाला होता. तेव्हा कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी स्वत: मुंबईत येऊन शहिदांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. मालेगाव येथील बॉम्बस्फोटात जखमी झालेल्यांचीदेखील त्यांनी तातडीने भेट घेऊन त्यांना मदतीचा हात दिला होता. एकीकडे सोनिया गांधी यांना शिव्यांची लाखोली वाहणार्या शिवसेनेने श्रीमती गांधी यांच्यापासून नेतृत्त्व गुण घेण्याची गरज निर्माण झाली आहे, असे वाटते. सोमवारी शिवसैनिक प्रस्तावित अणूप्रकल्पावर चालून गेले. त्यांनी पोलिसांवरदेखील हल्लाबोल करत, पोलिस ठाणे जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. दीर्घ कालावधीनंतर अशा प्रकारचे शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्रवासीयांना पाहावयास मिळाले असेल. यावेळी झालेल्या पोलिस गोळीबारात नाटे येथील तरबेज सेहकर हा मुस्लिम तरुण ठार झाला. हा तरुण शिवसैनिक होता, की नव्हता हा वादाचा मुद्दा असला तरी तो आंदोलक मात्र होता. त्याच्या मृत्यूचा मुद्दा शिवसेनेच्यावतीने विधिमंडळात उपस्थित करून सरकारचा निषेधही नोंदवण्यात आला. सरकार जनतेवर अत्याचार, दडपशाही करत असल्याचा आरोप करणार्या शिवसेनेचे कार्याध्यक्ष ठाकरे थेट जैतापुरात पोहोचून तेथील जनतेसोबत उभे राहतील, पोलिसी गोळीबारात बळी गेलेल्या किंवा जखमींच्या कुटुंबीयांचे सांत्वन करतील, अशी स्थानिकांची अपेक्षा होती. मात्र, एकीकडे शिवसेनेचे खालच्या फळीतील नेते, कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरले असताना उद्धव ठाकरे मात्र सोमवारी रात्री नागपूरला पोहोचले. किमान तेथे तरी ते माध्यमांशी बोलून जैतापूरच्या घटनेचा निषेध नोंदवतील, असे वाटत होते. सोमवारी सायंकाळी आठच्या सुमारास नागपूरच्या हॉटेल प्राईडमध्ये त्यांनी पत्रकारांना भेटही नाकारली. त्यांचे स्वीय साहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी पत्रकारांना मंगळवारी सकाळी यायला सांगितले. मात्र, पत्रकार पोहोचण्यापूर्वीच ठाकरे, त्यांचे पुत्र व नार्वेकर विमानाने कान्हा केसली अभयारण्याकडे रवाना झाले होते. मंगळवारी सकाळी त्यांचे विमानतळावर चित्रीकरण करणार्या काही वाहिन्यांच्या पत्रकारांना हटकून चित्रिकरण थांबवण्यास सांगण्यात आले. विधिमंडळातही या जंगल सफारीचा उल्लेख आमदारांनी केला. विधानसभेत राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी एका कार्यकर्त्यांचा बळी गेला, त्याचा मृतदेह तेथे पडले असताना उद्धव ठाकरे कुठे आहेत, कान्हात ते काय करत आहेत, असा सवाल विचारला. विधान परिषदेत किरण पावसकर यांनीही शिवसेनेवर अशीच टीका केली होती. आंदोलने अशी लढविली जातात काय?, हा सवाल उद्धव यांना कोण विचारणार हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सेनापती जंगल सफारीवर जाऊन सैनिक जैतापुरात लढत असतील तर त्याचे या सैनिकांच्या मनोध्यैर्यावर काय परिणाम होतात, याचा विचार तरी त्यांनी करायला हवा होता. शिवसेनेची एकहाती कमान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांभाळली तेव्हा ते शिवसैनिकांसोबत असायचे. स्वतः आंदोलनात उभे ठाकायचे, एक झंझावात निर्माण व्हायचा हा इतिहास आहे. म्हणूनच, त्यांच्या आदेशावरून शिवसैनिक शीर हातावर घेऊन लढायला उभे ठाकत. शिवसेना म्हणजे आक्रमक पक्ष अशी ख्याती निर्माण झाली, ती बाळासाहेबांच्या कणखर नेतृत्त्वाने. वडिलांचे हे गुण उद्धव कधी स्वीकारणार आहेत!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यामध्ये बाळासाहेब पाहाण्याची सवय या महाराष्ट्राला का झाली, याचे उत्तरदेखील उद्धव यांच्या कृतीतूनच मिळते. कार्यकर्ते लढत असताना राज ठाकरे कधी जंगल सफारीला गेले नाहीत. किंवा, आपल्या आलिशान बंगल्यातून त्यांनी कधी आदेशही दिले नाहीत. कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहिले म्हणजे, कार्यकर्त्याला बळ मिळते, आंदोलनाला धार येते आणि नेत्यासाठी जीव देणारे कार्यकर्तेही निर्माण होतात. मुंबई पाण्यात बुडाली असताना म्हणे, उद्धव ठाकरे पंचतारांकित हॉटेलात मुक्काम ठोकून होते, असे नेतृत्त्व पक्षावर फारकाळ पकड ठेवून राहू शकत नाही. जैतापूर पेटवले ना, तर मग या आंदोलनाच्या बरेवाईट परिणामांची फळेदेखील स्वतः भोगण्याची तयारी ठेवावी लागते. बळी जाणार्या कार्यकर्त्यांचे संसारही उभे करावे लागतील. एका मृतकाला केवळ दोन लाख रुपये देऊन त्याचे कुटुंब सावरणार नाही, हे उद्धव यांनी लक्षात घ्यायला हवे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा