प्रभू त्याला क्षमा कर!
अमेरिकेतील प्रख्यात वृत्तपत्र न्यूयॉर्क टाईम्सचा माजी संपादक व पुलित्झर पुरस्कार विजेते लेखक जोसेफ लेलिविल्ड यांनी भारताच्या राष्ट्रपित्यावर अश्लाघ्य चिखलफेक करून त्यांचे चारित्र्यहनन करण्याचा उपदव्याप केला आहे. महात्मा गांधी यांच्यावर टीका केली, त्यांचे चारित्र्यहनन केले, की स्वस्तात आणि भरपूर प्रसिद्धी मिळते, हा निकष या लेखकाने गांधीजींवर चिखलफेक करताना लावला असावा, असे त्याच्या प्रयत्नातून दिसून येते. महात्मा गांधी हे समलैंगिंक होते, हा नवा जावाईशोध या लेलिविल्ड या महाशयांनी लावला असून, तसे त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात नमूद आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी अनावश्यक वादात अडकविण्याचे कुत्सित षडयंत्र पाश्चात्यांनी यापूर्वी अनेकवेळा रचले होते, आणि प्रत्येकवेळी ते तोंडघसी पडले, असा इतिहास आहे. तसे, राष्ट्रपित्याविषयी बदनामीकारक लिखाण करणे हा आजकाल पाश्चात्यातील काही तथाकथीत विद्वानांचा एककलमी कार्यक्रमच झाला आहे. आजही विविध सर्वेक्षण करणार्या संस्था, वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांचे वर्तमानातील राजकीय व प्रभावशाली व्यक्तींविषयक सर्वेक्षण पाहिले तर सर्वाधिक लोकप्रिय, चर्चेतील प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत महात्मा गांधी यांचे नाव अव्वल असते. गांधीजींच्या मृत्यूनंतर सहा दशके उलटली तरीदेखील या व्यक्तीची लोकप्रियता तसूभरही कमी झाली नसून, जग त्यांच्या विचारांना प्रमाण मानते, त्यांच्या विचारांचे अनुकरण करते, हा केवळ महात्मा गांधींचा सन्मान नाही तर भारताचादेखील सन्मान आहे. तरीदेखील गेल्या सहा दशकांपासून काही लोकांना गांधीजींवर टीका करण्यात धन्यता वाटते, विशेष करून भारतावरील ज्यांच्या सम्राज्याचा सूर्य केवळ गांधीजींच्या अहिंसक आंदोलनाने मावळला, त्यांनी अद्यापही गांधीजींना क्षमा केली नसावी, अद्यापही ते १९४७ च्या मानसिकतेतून बाहेर पडले नाहीत, असे दिसून येते आहे. भारताचा हा राष्ट्रपिता देहीकदृष्ट्या मृत्यू पावला असला तरी या देशाच्या अणुरेणूत असलेले त्यांचे विचार जीवंत आहेत. म्हणूनच, भारतीयांना ते अमर वाटतात. त्यांच्या शिकवणुकीतील देशात वापरल्या जाणार्या गांधीगिरी या आयुधावरून हे स्पष्ट होते. गांधीजी आजच्या संदर्भातदेखील किती प्रासंगिक आहेत, यावरून त्यांची मूल्यता दिसून येते. आजही गांधीजींच्या विचारांशिवाय समृद्ध, शांतीपूर्ण आणि प्रगतीशिल राष्ट्राचे स्वप्न साकार होऊ शकत नाही. भगवान श्रीकृष्णाने महाभारतात म्हटले होते, की जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढेल, तेव्हा ते धर्माच्या रक्षणासाठी अवतार घेतील. आता जेव्हा भारतात भ्रष्टाचार, अनाचार, राजनीतिमध्ये नैतिकतेचे पतन आणि मूल्यांची अवहेलना सुरु आहे, तेव्हा प्रत्येकाला वाटते, की महात्मा गांधी असते तर त्यांनी या परिस्थितीत बदल घडविला असता. गांधीजींनी लिहिलेले हिंद स्वराज या पुस्तकाच्या लिखानाला शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सध्या विविध ठिकाणी चर्चासत्रे, व्याख्याने आयोजित करण्यात येऊन त्यांच्या विचारांवर नव्याने चर्चा करण्यात आली. त्यांचे विचार एक पिढी पुन्हा पुन्हा समजून घेत आहे. भारतीय स्वातंत्र्याची एक पिढी संपल्यानंतर दुसर्या पिढीनेही गांधीजींना त्यांचा आदर्श मानले. आता तिसरी पिढीही त्यांनाच आदर्श मानत आहे. नवी पिढीदेखील महात्मा गांधी काय आहे याचा अर्थ व त्यांचे अनन्यासाधारण महत्त्व बालवयातच समजून घेत आहे. प्रसिद्ध लेखक अल्बर्ट आइंस्टाइन म्हणाले होते, की एका पिढीचा विश्वास बसणार नाही, की हाडामांसाचा एक माणूस असा होता, की त्याने हातात शस्त्रही न घेता बलाढ्य ताकद उखडून फेकली. नव्या पिढीला हा चमत्कारच वाटेल. आज जेव्हा रिचर्ड एटनबरो यांचा महान चित्रपट गांधी पाहिल्या जातो तेव्हा गांधी काय आहे, हे कळून येते. महात्मा गांधी यांनी सत्य, अहिंसा, आणि शिस्त यांना प्रमाण मानून केवळ स्वत:चे जीवन बदलवले नाही तर लक्षावधी अनुयायीदेखील घडवले. गांधीजींना मानणारे केवळ भारतातच नाही तर जगभरात आहेत. जगातील सर्वात शक्तिशाली देश अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनादेखील गांधी विचारांनी भुरळ घातली असून, बराक ओबामा हेदेखील राष्ट्रपित्याला आपले आदर्श मानतात. संयुक्त राष्ट्रांनीदेखील गांधी जयंतीला आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस घोषीत केले असून, अशा महान व्यक्तीवर चिखलफेक करून चर्चेत येणे हादेखील काही लोकांचा चलाखीपूर्ण धंदा बनला आहे. त्यामुळेच गांधीजींबद्दल काही मिथ्थक कल्पना पसरवल्या जात असून, अनेक विवादास्पद चर्चा घडवून आणल्या जात आहेत, त्यांच्यावर चिखलफेक करणारे, त्यांचा अवमान करणारे लिखाण केले जात आहे. आपणास आठवत असेल, की काही दिवसांपूर्वी यूट्युब संकेतस्थळावर एक क्लिप प्रसारित झाली होती, त्यात महात्मा गांधी यांना पोलो नृत्य करताना आणि बंदूक चालवताना दाखवले गेले. अहिंसेच्या पुजार्याच्या हातात बंदूक देऊन त्यांची क्लिप बनवणार्याने आपल्या सडक्या मेंदूचे दर्शन घडवले होते. वाईट या बाबीचे वाटते, की अशा सडक्या मानसिकतेच्या लोकांची संख्या जगात कमी नाही. गांधीजींच्या आश्रमापासून ते त्यांचे वैवाहिक जीवन, पती-पत्नी संबंध, त्यांचा अनुनय करणार्या महिलांबाबतदेखील अनेक अभद्र, अश्लिल चर्चा मुद्दामहून केल्या जातात, त्यावर लिखाण केले जाते. परंतु, या चर्चा बुडबुड्यासारख्या पसरतात आणि फुटून जातात. महात्म्याच्या महात्मापणाला कोणताही धक्का लागत नाही, असा अनुभव आहे. आतादेखील न्यूयॉर्क टाईम्सचा माजी संपादक व पुलित्झर पुरस्कार विजेता लेखक जोसेफ लेलिविल्ड याने त्याच्या नव्या पुस्तकात द ग्रेट सोल : महात्मा गांधी ऍण्ड हिज स्ट्रगल विथ इंडिया या पुस्तकात अनेक अश्लाघ्य, अश्लिल लिखाण केले आहे. गांधीजींवर असे लिखाण करण्यामागे या लेखकाची भूमिका स्पष्ट आहे, त्याला जगभर स्वस्तात प्रसिद्धी मिळाली. पुस्तकाच्या समीक्षणानुसार, या पुस्तकात दक्षिण आफ्रिकेतील टॉलस्टॉय आश्रमामध्ये त्यांचे मित्र राहिलेले मूळचे जर्मनवंशीय हरमन केलेनबाख यांच्या मैत्रीबाबत अश्लिल टिपण्णी केलेली आहे. गांधीजींचे आणि केलेनबाख यांचे समलैंगिक संबंध होते, असा दावा लेलिवेल्ड यांनी या पुस्तकात करून महात्म्याचे चारित्र्यहनन करण्याचा उपद्व्याप केला आहे. त्यासाठी काढलेले निष्कर्ष गांधीजींचे पत्र, पुस्तकात लिहिलेल्या वाक्यांवरून काढलेले आहेत, असे या लेलिवेल्ड यांचे म्हणने आहे. महात्मा गांधी यांना ज्यांनी जवळून पाहिले किंवा ज्यांनी गांधीजींच्या विचारांचा, चारित्र्याचा अभ्यास केला असेल त्यांना माहीत आहे, की या महात्म्याचे जीवन किती पारदर्शी होते. खासगी आणि सार्वजनिक जीवन जगताना त्यांनी हा पारदर्शीपणा काळजीपूर्वक जपला. माझे सत्याचे प्रयोग हे पुस्तक लिहण्याचे धाडस केवळ जीवनात स्वच्छ आणि पारदर्शी असलेला व्यक्तीच दाखवू शकतो. गांधीजी सच्चे, निडर नेता होते. एक माणूस म्हणूनही ते तेवढेच काटेकोर आणि साधनसुचितेने वागणारे व्यक्ती होते. म्हणूनच त्यांच्या मृत्यूनंतरही सहा दशकांनी या देशातील तरुण पिढी त्यांना आपला नेता मानते, त्यांचे विचार तरुणांना जीवन जगण्याची दिशा दाखवतात. आता जे वादग्रस्त पुस्तक बाजारात आले आहे, ते खपविण्याच्या उद्देशानेच गांधीजींबद्दल काही तरी अश्लाघ्य लिखाणाचा प्रयत्न लेखकाने केला आहे. महात्मा गांधी हे सूर्यासमान असून, सूर्यावर थुंकण्याचा केलेला प्रयत्न हा स्वत:वरच थुंकून घेण्यासारखा आहे, हे वादग्रस्त लेखक लेलिवेल्ड यांना काळाच्या ओघात कळून येईलच. मृत्यूला सामोरे जात असताना महान आत्मा येशू ख्रिस्त म्हणाले होते, की प्रभू यांना (येशूला सुळावर चढविणार्यांना) क्षमा कर, कारण त्यांना माहीत नाही, आपण काय करतोय ते. हेच वाक्य आता महात्मा गांधी यांच्यावर चिखलफेक करणार्या लेलिवेल्ड या मुर्ख लेखकाबद्दल म्हणावे लागेल, प्रभू त्याला माफ कर. कारण त्याला माहीत नाही, आपण कोणावर चिखलफेक करतोय ते!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा