पूनम पांडे नावाची मोकाटी


भारतीय क्रिकेट संघाच्या विश्‍वचषक विजयानंतरही एक बातमी सातत्याने चर्चेत राहात आली आहे. ही बातमी आहे, मॉडेल तथा अभिनेत्री पूनम पांडे हिला म्हणे, नग्न व्हायचे आहे. भारतीय संघ जिंकला तर आपण क्रिकेटच्या मैदानात नग्न (गावरान भाषेत ज्याला भोंगळे) होऊ अशी घोषणा या पूनमबाईने केली होती. केवळ नग्नच होणार नाही तर नग्न होऊन मुंबईच्या वानखेडे स्टेडिअममध्ये फेरी मारू, अशी वल्गनाही या बाईने केली होती. साहजिकच आहे, की तिची ही वल्गना वृत्तपत्रांत ठळकपणे छापल्या गेली. वृत्तवाहिन्यांवर ती चवीने चघळल्या गेली. म्हणे, आता तू कधी नग्न होणार आहेस, असा सवाल या बाईला तिचे काही रंगेल चाहते विचारत आहेत. तिची ही घोषणा सवंग प्रसिद्धीसाठी होती, असा विचार केला तर ही बाई अद्यापही आपण नग्न होणारच असे वारंवार सांगत आहे. तिची ही खुमखुमी कधी जिरेल ते देव जाणे. सध्या चित्रपट व मॉडेलिंगच्या क्षेत्रात अभिनेत्रींचे अंगप्रदर्शन ही काही नवी बाब नाही. जे खपते ते विकावे, या व्यापारी न्यायाने या अभिनेत्री त्यांच्या कमनीय शरीराचे उत्तान प्रदर्शन मांडत असतात. त्यामुळे या अभिनेत्री अनेकवेळा वादाच्या भोवर्‍यातदेखील अडकलेल्या आहेत. अनेक प्रकरणे तर न्यायालयातदेखील पोहोचलेली आहेत. अभिनेत्री आणि मॉडेल त्यांचे अंगप्रदर्शन कसे योग्य होते, चित्रपट किंवा जाहिरातीची गरज म्हणून ते कसे आवश्यक होते, हे पटवून देत असतात. परंतु, पूनमबाईसारखी सार्वजनिक ठिकाणी नग्न होण्याची इच्छा कोणत्याही अभिनेत्रीने किंवा मॉडेलने आजवर जाहीर केली नव्हती. ज्या बाबीपासून त्यांना पैसे मिळत नाहीत तेथे या मॉडेल आपले कपडे उतरवत नाहीत, असा एक अनुभव आहे. परंतु, आपल्या नग्न होण्याला देशभक्तीची किनार देत या पूनमबाईने वानखेडे स्टेडिअममध्ये खुलेआम नग्न होण्याची घोषणा करून खळबळ उडवून दिली. तिचे हे दुःसाहस निश्‍चितच समर्थनीय नसले तरी तिच्या मूर्खपणाची कदर करावी, असे आहे. आपल्या वाचाळपणाचे समर्थन करताना या बाईने एवढेही सांगितले, की आपल्या या कृत्याला तिच्या आई-वडिलांचे समर्थन आहे. स्वतःची तरणीबांड लेक लोकांसमोर नग्न होण्यास परवानगी देणारे तिचे आई-वडील खरेच धन्य म्हटले पाहिजेत. आता जेव्हा भारतीय क्रिकेट संघाने विश्‍वचषक जिंकला आहे, तेव्हा ही पूनमबाई म्हणते, की आपण आजही नग्न होण्यास तयार असून, त्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) तिला परवानगी द्यायला हवी. परंतु, बीसीसीआयच काय, कोणतीही जबाबदार संस्था अशा प्रकाराला परवानगी देत नसते, हे या पूनमबाईला माहीत नसावे, एवढी ही बाई नक्कीच दूधखुळी नाही. पूनम हिचा सार्वजनिक ठिकाणी नग्न होण्याचा हव्यास खरा तर समस्त स्त्री जातीसाठी कलंक आहे. ती स्वतः एक स्त्री असून, आपल्या या कृत्याने स्त्रीजातीवर काय आपत्ती कोसळेल, याचा विचार ही नालायक बाई करत नाही, याचे दुःख वाटते. स्त्रियांच्या अस्मितेसाठी वारंवार कंठशोष करणार्‍या महिला संघटना आता का म्हणून मूग गिळून बसल्या आहेत, हादेखील एक मोठा प्रश्‍न उपस्थित होतो. धर्म व संस्कृतीच्या संरक्षणाचा ज्यांनी ठेका घेतला आहे, ती मंडळीदेखील आता थंड बसलेली आहेत. कदाचित, त्यांनादेखील पूनमबाईला नग्न पाहण्याची उत्सुकता लागून राहिली असावी. पूनम पांडे ही एक अशी तरुणी आहे, जिचे किंगफिशर कॅलेंडरवरील छायाचित्रे पाहिली, की तिला नग्न पाहावे, असे काही उरतच नाही. मॉडलिंग करताना अंगावर इंचभर कपडे वापरणार्‍या या बाईला हे माहीत नसावे, की या देशातील लक्षावधी अबलांच्या इज्जतीवर जेव्हा कोणीतरी अत्याचारी हात घालतो, तेव्हा अंगावरील वस्त्र वाचविण्यासाठी तिचा जीव कसा कासाविस होतो? इज्जत काय असते, हेच जिला माहीत नाही, त्या पूनमबाईने नग्न होणे काय आणि अंगभर कपडे घालणे काय, त्याने फरक तरी असा कोणता पडतो. आमच्या देशात दररोज किती तरी महिला शारीरिक व मानसिकदृष्ट्या कुणाच्या तरी शोषणाच्या बळी ठरत असतात. कधी कधी त्यांच्या अंगावरील कपडेदेखील फेडले जातात. काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेशात एका ग्रामीण परिवारात संपत्तीच्या वादातून झालेल्या भांडणात सुनेला विवस्त्र करून घरातून हाकलून देण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. काही वर्षांपूर्वी गुजरातमधील राजकोटमध्ये हुंडापीडितेला अर्धनग्न करून भररस्त्यावर तिची धिंड काढण्यात आली होती. छत्तीसगडमध्ये जादूटोणा करते या संशयावरून काही महिलांना नग्न करून भररस्त्यावर हिंडवण्यात आले होते. ज्या महिला सार्वजनिक ठिकाणी निर्वस्त्र होण्याच्या वेदना व अपमान झेलून बसल्या आहेत, त्यांनाच अंगावर वस्त्र असण्याची काय किंमत असते हे चांगले कळू शकते. पूनबाईसारख्या बाजारबसवीला ही किंमत कशी कळणार? मॉडलिंगसाठी म्हणा, किंवा श्रीमंतांच्या पार्ट्यात त्यांच्या इच्छेखातर टीचभर कपड्यात अंगप्रत्यांग दाखवत हिंडणारी पूनम पांडे हिला तर तिच्या अंगावरील वस्त्रेही ओझेच वाटत असावे. वांझोटीला बाळंतपणाच्या वेदना कळत नसतात, तसे जिला इज्जत नावाचा काही प्रकारच ठाऊक नाही, तिला स्त्रीच्या इज्जतीचे मोल कसे उमगणार. खरे तर ग्लॅमरच्या भुलभुलैय्यात झुलणार्‍या या पूनमबाईच्या अज्ञानावर किव येते. परंतु, तिच्या मूर्खपणाबद्दल तिला क्षमा करणे योग्य ठरणार नाही. पूनमला हे माहीत होते, की बीसीसीआय तिला नग्न होण्यास परवानगी देणार नाही. तरीदेखील केवळ अन् के़वळ सवंग प्रसिद्धीसाठी ही मूर्खबाई सातत्याने मी नग्न होणारच अशा बढाया मारते आहे. तिला या वाचाळतेने सवंग प्रसिद्धी मिळत असली तरी या देशाच्या उत्तर-पूर्व भागात भारतीय लष्कराच्या लैंगिक अत्याचाराचा निषेध म्हणून विवस्त्र होत, जाहीर निषेध नोंदविणार्‍या महिलांचा मात्र घोर अपमान होत आहे. प्राणी हक्कांसाठी विवस्त्र होत मॉडलिंग करणार्‍या पेटा संस्थेच्या मॉडेलचाही अपमान होत आहे, तसेच कुणाच्यातरी वासनेला बळी पडत देशाच्या कानाकोपर्‍या इज्जत लुटल्या जाणार्‍या व कपडे फेडल्या जाणार्‍या शीलवान नारीचाही घोर घोर अपमान होत आहे. नग्न होण्याची एवढीच खुमखुमी असेल ना, तर पूनमबाईने जरूर नग्न व्हावे, प्राणी वाचविण्यासाठी पेटा संस्थेची एखादी जाहिरात फुकट करून दाखवावी, पूर्वेला जाऊन विवस्त्र आंदोलन छेडणार्‍या त्या महिलांना जाऊन मिळावे. ही हिंमत ही मोकाटी बाई दाखविणार का?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खसखसच्या शेतीचे वास्तव!