.. आता धनंजय मुंडेंचे खच्चीकरण का?
फोकस/ पुरुषोत्तम सांगळे
निवासी संपादक, दैनिक जनशक्ति, पुणे
8087861982
ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्व. गोपीनाथ मुंडेसाहेबांच्या जन्मतारखेचा वाद उकरून काढत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राजकारण ढवळले आहे. त्यांच्या पक्षात सद्या धनंजय मुंडे यांचे नेतृत्व बहारण्याचा काळ सुरु आहे. ‘फायर ब्रॅण्ड‘ नेता म्हणून धनंजय यांचे नाव राज्याच्या कानाकोपर्यात पोहोचले आहे. परंतु, आपल्याच पक्षाच्या मोठे होणार्या नेत्याचे खच्चीकरण करायचे ही सवय काही अजितदादांची जात नाही. जन्मतारखेच्या वादात हेतुपुरस्सर धनंजय यांचे नाव गोवून आपला हेतू अजितदादांनी साधला आहे.
--
आपली वाचाळवीरता सोडायला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. अजितदादा पवार हे काही तयार नाहीत, असे एकूण दिसते. राजकारणातील ‘सार्वजनिक काका’ व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दीर्घकाळ राजकारणात काम करताना साधनसुचिता बाळगली, काही पथ्ये पाळली अगदी कपटी राजकारण करतानाही त्यांनी मर्यादा ओलांडली नाही. कुणाविषयी कटू बोलणे तर सोडाच कुणाला चिमटा काढतानाही त्यांनी आपली उंची आणि शालिनता याचे भान ठेवले. पवारसाहेबांच्या सानिध्यात लहानचे मोठे झालेले अजित पवार यांच्यावर पवारसाहेबांचे हे संस्कार कसे काय होऊ शकले नाहीत? हा प्रश्न पडतो. पवारांच्या घरात संस्काराची एवढी कमी कशी? असे आता पंकजा मुंडेंसह संपूर्ण महाराष्ट्राला वाटायला लागले आहे. यापूर्वी ‘धरणात मुतायची‘ भाषा केल्याने लोकांनी अख्खा राष्ट्रवादी काँग्रेस आणि सोबत त्यांचा सहकारी राजकीय पक्ष काँग्रेसलाही घरी बसवले होते. त्या घटनेतून अजितदादा काही बोध घेतील असे वाटले होते; परंतु तसे काही झाले नाही. आतादेखील ऐन निवडणुकांत त्यांनी पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडलेत. भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याविषयी एका खासगी वृत्तवाहिनीवर बोलताना त्यांनी शरद पवार यांच्या वलयामुळे प्रभावित होऊन मुंडेसाहेबांनी आपली जन्मतारीख बदलली, असा दावा केला. हा दावा करताना त्यांनी आपल्याच पक्षाचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा हवाला दिला. मुळात कोणत्याही ऐकीव माहितीवर विश्वास ठेवायचा आणि त्या विषयी जाहीर वाच्यता करायची हे अजितदादांसारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्याला अजिबात शोभणारे नाही. त्यांच्या या वक्तव्यानंतर काही सामाजिक कायकर्त्यांनी स्व. मुंडेसाहेबांचा शाळा सोडण्याचा दाखलाच सोशल मीडियावर टाकला. या दाखल्यावर त्यांची जन्मतारीख ही 12 डिसेंबर हीच असल्याचे प्राकर्षाने दिसून येते. मुळात पवारसाहेबांना मोठे म्हणताना मुंडेसाहेबांना लहान दाखविण्याचा उपद्व्याप करण्याची अजितदादांना गरजच काय होती? आपल्यात नसलेल्या माणसाबद्दल चांगले बोलण्याची रीत असते, माणूस गेला की शत्रूत्व संपून जाते. परंतु, अजित पवारांच्या डोक्यात स्व. मुंडेसाहेबांविषयी इतका द्वेष भरलेला आहे, की मिळेल त्या व्यासपीठावरून तो द्वेष आपोआप त्यांच्या तोंडातून गरळीसारखा बाहेर पडतो. इतकी राजकीय खुन्नस बरी नाही!
स्व. गोपीनाथ मुंडेसाहेबांविषयी बोलताना ते वारंवार विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा आधार घेतात. मराठवाडा आणि एकूणच राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या वंजारी समाजात धनंजय मुंडे यांना ‘घरभेदी’ असे समजले जाते. ‘मला ही माहिती धनंजय मुंडे यांनी सांगितली असे जेव्हा अजितदादा सांगतात, तेव्हा धनंजय मुंडे यांची समाज आणि स्वतःच्याच जिल्ह्यात ते मोठी राजकीय कोंडी करत असतात’, याचेही भान अजितदादांना राहू नये. आता जन्मतारखेच्या वाद प्रकरणांत तर धनंजय मुंडेंना बीड, नगर जिल्ह्यात समाजाच्या संतापाला सामोरे जावे लागत आहे. त्याचे राजकीय भांडवल करण्याची संधी सोडेल त्या पंकजा मुंडे-पालवे कसल्या? त्यांनीही अजितदादांच्या या वक्तव्याआडून धनंजय मुंडेंवर टीकेची झोड उठवली. ‘आमच्या या भावाला मी वैतागले असून, खोटे बोलण्याचे नोबेल पारितोषिक त्यांना द्यायला हवे’, अशी टीका त्यांनी केली. म्हणजेच काय तर मधल्या काळात राजकीयदृष्ट्या स्वक्षमतेने पुढे आलेल्या धनंजय मुंडे यांना पुन्हा दोन पाऊले मागे खेचण्याचे काम अजितदादांनी केले. आम्हाला वाटते की हे काम त्यांनी हेतुपुरस्सर केले असावे. विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते म्हणून धनंजय हे चांगली कामगिरी करत आहेत. त्यांचा अभ्यास, दर्जेदार आणि रोखठोक भाषणे, खास मुंडेशैलीत विरोधकांवर तुटून पडण्याची शैली, आणि ग्रामीण भागाशी जुळलेली नाळ पाहाता धनंजय हे अत्यंत नकारात्मक वातावरणातून आता कुठे बाहेर पडले होते व लोकप्रियतेच्या शिखराकडे सरकले होते. कदाचित हेच अजितदादांना पचनी पडलेले नसावे. पक्षाचा एखादा नेता मोठा होऊ लागला की त्याचे खच्चीकरण करण्याचे काम अजितदादा करत असतात, असे म्हटले जाते. त्यात तो नेता ओबीसी समाजातील असेल तर मग् त्याचे नुसतेच खच्चीकरण होत नाही तर त्याचा ‘भुजबळ’ होतो, असा अनुभव आहे. छगन भुजबळ, मोहिते पाटील, गडाख यांच्यानंतर आता धनंजय मुंडे यांची अशीच राजकीय कोंडी करण्यासाठी अजितदादांनी हा तारखेचा वाद उकरला आणि त्यात धनंजय मुंडे यांचे नाव गोवून त्यांना पुन्हा अडचणीत आणले असावे, असा एक संशय निर्माण झाला आहे, त्याचे स्पष्टीकरणही आता अजितदादांनीच द्यायला हवे.
मुळात मनातील खदखद बाहेर काढण्यासाठी याच्या त्याच्या नावाचा आधार घेण्याची गरजच काय होती? अजितदादांच्या म्हणण्यानुसार, स्व. गोपीनाथ मुंडे यांना प्रभावी व्यक्तींप्रमाणे जन्मतारीख बदलायचीच होती तर त्यांनी शरद पवार यांची जन्मतारीख कशाला घेतली असती? पवारांचा असा काय प्रभाव पडणारा होता? ज्या 80च्या दशकात हा प्रभाव होता असे अजितदादा सांगतात त्या काळात तर शरद पवार हे सर्वाधिक बदनाम झालेले होते. वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची घटना तेव्हा ताजी होती. या उलट राममनोहर लोहिया, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यासारखे जनसंघाचे नेते तेव्हा प्रचंड लोकप्रिय होते. त्यांची जन्मतारीख मुंडेसाहेबांनी उचलली नसती का? शरद पवारांशी स्व. मुंडेसाहेबांनी उभे आयुष्यभर राजकीय वैर पत्कारले. त्यांच्याच वाढदिवशी आपला कौतुक सोहळा घडवून आणणारे स्व. मुंडेसाहेब हे तेवढे नतद्रष्ट कधीच नव्हते, हे अजितदादांनी लक्षात घ्यायला हवे. उगीच आपले उचलली जीभ लावली टाळ्याला असे करणे अजितदादांना शोभणारे नाही. जी व्यक्ती हयात नाहीत, त्यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्ये करू नयेत, हे कळण्यासाठी कौटुंबीक संस्कार लागतात. ज्येष्ठ नेते शरद पवार हे संस्कार वाटत असताना अजितदादा नेमके ‘कुठल्या धरणावर’ गेले होते? मुंडेसाहेबांविषयी निवडणुकीच्या तोंडावर हेतुपुरस्सर वाद उकरून काढत अजितदादांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. पहिले म्हणजे, पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्यात भांडणे लावून गंमत पाहण्याचा त्यांचा इरादा यशस्वी झाला. दुसरे म्हणजे, राज्यात महायुतीचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर कमकुवत विरोधी पक्षात राज्य सरकारला अडचणीत आणू शकतील, अशी जी दोन-चार नावे घेतली जातात त्यात धनंजय मुंडे यांचे स्थान अव्वल आहे. पक्षात धनंजय यांचे नेतृत्व बहारत असून, नेमकी हीच बाब अजितदादांना सलत असावी. त्यामुळे मुद्दामहून हे वक्तव्य करून त्यांनी धनंजय मुंडे यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या वक्तव्याने मराठवाडा व राज्यभरात मुंडेप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून, पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांची ‘खलनायकी‘ प्रतिमा तयार करण्यात अजितदादा यशस्वी झालेेत. आम्ही अजितदादांना एक सांगू इच्छितो, दादा कुरघोडीचे राजकारण हे पक्षाच्या बाहेर करायचे असते. पक्षातच नव्हे! ‘धरणात मुतायची‘ भाषा केल्यानंतर तुम्ही एक दिवस प्रायश्चित्त घेतले होते. आता स्व. मुंडेसाहेबांविषयी निरर्थक वाद उकरून काढत जो असंस्कारीपणा दाखविला त्याबद्दल काय प्रायश्चित्त घेणार आहात?
------------------------------ ----
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा