खडसेंनंतर आता पंकजा मुंडे का?


- फोकस/ पुरुषोत्तम सांगळे

स्व. गोपीनाथ मुंडे यांचा संघर्षाचा राजकीय वारसा लाभलेल्या पंकजा मुंडे-पालवे यांना राजकीयदृष्ट्या संपविण्यासाठी मुंबई व नागपुरात सद्या कुटील डावपेच आखले जात आहेत. कारण, त्यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्र्यांचे जाळलेले पुतळे कदाचित नागपुरी चाणक्यांना आवडलेले नसावेत. परंतु, ज्यांच्यामागे स्वतःचा मतदार नाही, त्या लोकांनी पंकजांबाबत आरोपांची ‘मीडिया ट्रायल’ सुरु करण्यापूर्वी दहावेळा विचार करायला हवा; कारण एकनाथ खडसेंचे झाले ते पंकजांबाबत बहुजन समाज कदापिही सहन करणार नाही!

--------
प्रचंड जनाधार आणि स्वतःचा मतदारसंघ असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या व राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांना लक्ष्य करण्याचे काम सुरु आहे. पंकजांचेही खडसे करावेत, अशी राजकीय खेळी पक्षातूनच खेळली जात असल्याचे प्राथमिक चित्र दिसतेे. विलासराव देशमुख यांच्याजागी अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर संतप्त झालेल्या नारायण राणे यांनी काँग्रेस नेतृत्वावर तोफ डागली होती. पक्षाचे नेते राहुल गांधी, सोनियांचे विश्‍वासू आणि राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्यावर त्यांनी आरोप केले होते. त्याचा परिणाम असा झाला, की नजीकच्या काळात राणे यांना त्याची मोठी राजकीय किंमत चुकवावी लागली. आतादेखील पंकजा यांचे जलसंधारण खाते काढून घेण्यात आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षरित्या नाराजी व्यक्त केली. त्यांच्या कार्यकर्ते व समर्थकांची तर मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्यापर्यंत मजल गेली. त्यामुळे पंकजा या भाजप धुरिणांच्या डोक्यात बसलेल्या दिसतात. काँग्रेसच्या तुलनेत भाजपमध्ये पक्षशिस्त मोठी मानली जाते. त्यामुळे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर केवळ आरोप झाले अन् तेही घरभेद्यांच्या मदतीने झाले तर पक्षनेतृत्वाने त्यांचा राजीनामा घेतला. तोच न्याय पंकजांनाही लावावा, अशी काहीशी रणनीती पक्षातील चाणक्यांच्या डोक्यात घोळते आहे. तसेही पंकजा या मुख्यमंत्रिपदाच्या प्रबळ दावेदार आहेत. त्यांच्यासारखी प्रबळ नेता 
भाजपमध्ये तूर्त तरी दुसरी नाही. त्यामुळे वारंवार त्यांचे पंख छाटण्याचे काम झालेच आहे. अन् या कामात नागपुरी चाणक्य पुरते यशस्वीही झाले आहेत. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील पहिले असे नेते आहेत. ज्यांच्यामागे स्वतःचा मतदार नाही. जाती-पातीचा विचार करता त्यांची स्वतःची अर्धाटक्काही मते नाहीत. स्व. गोपीनाथ मुंडे यांनी राबविलेले सोशल इंजिनिअरिंग आणि निर्माण करण्यात आलेली मोदी लाट या जोरावर पक्षाला बहुमताच्या जवळ जाता आले आणि नागपुरी चाणक्यांच्या आशीर्वादाने त्यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळाली. या उलट पंकजा यांचे आहे. त्यांना स्वतःचा असा मतदारसंघ आहे. किमान 40 आमदार निवडून आणू शकतील एवढी त्यांच्या हक्काच्या मतांत राजकीय ताकद आहे. 1994-95 मध्ये स्व. गोपीनाथ मुंडे यांनी संघर्ष यात्रा काढली होती. त्याच धर्तीवर स्व. मुंडेसाहेबांच्या घातपाती निधनानंतर त्यांनी संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या राजकीय खेळीमुळे भाजपमध्ये खळबळ उडाली होती. खरे तर निवडणुकीपूर्वी निघत असलेल्या या संघर्ष यात्रेचा भाजपलाच फायदा झाला असता. परंतु, संपूर्ण महाराष्ट्रातून जी संघर्षयात्रा निघणार होती, ती फक्त मराठवाड्यापुरती मर्यादित करण्यात आली. एकप्रकारे हा पंकजा यांच्या पायात बेड्या ठोकण्याचाच प्रकार होता. तरीही सर्व राजकीय कुरघोड्यांवर मात करत 29 ऑगस्ट 2014 रोजी राजमाता जिजाऊ मॉसाहेबांच्या जन्मस्थान सिंदखेडराजापासून संघर्ष यात्रेला सुरुवात झाली. 21 जिल्ह्यांमधून तीन हजार किलोमीटरचा प्रवास करून या संघर्षयात्रेने राजकीय चमत्कार घडविला. ज्या भागात ही संघर्ष यात्रा गेली होती. त्या भागात सर्वाधिक भाजपचे कमळ फुललेले आहेत. त्यामुळेच राजकारणात पंकजा मुंडे यांचा दबदबा निर्माण झाला. त्यांची लोकप्रियता ऐवढी वाढली, की त्या आपोआप मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आल्या. पंकजा यांनी कधीही स्वतःला मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आणले नाही; त्या मुख्यमंत्री व्हाव्यात ही लोकभावना आहे. अन् याच लोकभावनेकडे दुर्लक्ष करून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनविले गेले आहेत. जे जलसंधारण खाते काढून घेण्यात आल्यामुळे पंकजा नाराज झाल्या आहेत, त्या खात्याचे काम त्यांच्याइतके कुणीही प्रभावीपणे करू शकले नसते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीतील कामांतून प्रेरणा घेऊन पंकजा यांनी जलसंधारणाची कामे राबविली. एक मिशन म्हणून त्यांनी पाणलोटाचे काम हाती घेतले. आज पहिल्याच पावसांत भूगर्भातील पाण्याची पातळी वाढलेली दिसते, त्याचे श्रेयही पंकजा यांच्या प्रामाणिक कामाला द्यावे लागेल. परंतु, या त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष करून महिला व बाल कल्याण खात्यातील अनागोंदीकडे प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधले जाते. खरे तर महिला व बाल कल्याण खातेच असे आहे, ही तिथे धुतल्या तांदळाचा माणूस जरी मंत्री केला तरी त्याच्यावर शिंतोडे हे उडतीलच! उद्या अण्णा हजारे यांना जरी या खात्याचे मंत्री केले तरी, कोणता ना कोणता आरोप अण्णांवर होईल. सर्वाधिक योजना, किचकट नियमावली, केंद्र व राज्य सरकार यांच्याकडे झालेली कामांची विभागणी, अधिकारी, कर्मचार्‍यांची मानसिकता आणि व्यवस्थेला लागलेली गळती यामुळे कोणत्या ना कोणत्या तरी पातळीवर गैरप्रकार, नियमांची अनागोंदी होतेच आणि नेमकी त्याबाबतचे आरोप हे मंत्र्यांवर होत राहतात. चिक्की असो की, पौष्टिक आहार वाटप निविदा रद्द करण्याचे न्यायालयीन आदेश असो, पंकजा मुंडेवर आरोप झालेत अन् ते जसे विरोधकांच्या पथ्यावर पडले, तसेच त्यांचा राजकीय गैरफायदा घेण्याचा प्रयत्न भाजप पक्षांतर्गतही झाला आहे. जलसंधारण मंत्री म्हणून नियुक्ती होऊनही प्रा. राम शिंदे यांनी या खात्याचा कारभार हाती घेण्यास विलंब केला होता. त्यामागचे खरे कारण हे पंकजा यांची नाराजी टाळणे हाच होता. ना. शिंदे ज्या कर्जत- जामखेड मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात, त्या मतदारसंघात वंजारी समाज हा बहुसंख्येने आहे. अन् पंकजा यांचे जलसंधारण खाते काढण्यास शिंदे यांचाच हातभार असावा, असा एक समज या समाजात आहे. त्यामुळे वंजारी समाजाची नाराजी ओढवून घेण्याऐवजी पंकजा देशात परत आल्यानंतरच त्यांनी खात्याचा पदभार स्वीकारण्याचा निर्णय घेतला. महादेव जानकर आणि सदाभाऊ खोत यांनी मंत्रिपदाची शपथ घेताना स्व. गोपीनाथ मुंडे यांना स्मरून शपथ घेतली होती. यावरून पंकजा यांचे प्राबल्य दिसून येईल. फडणवीस यांची खुर्ची शाबुत ठेवण्यासाठी नागपुरी चाणक्य कितीही राजकीय खेळी करत असले तरी, पंकजा मुंडे असो, किंवा एकनाथ खडसे असो हे नेते मास लीडर आहेत, त्यामुळेच ते बेडर आहेत. ज्यांच्यामागे जनता नाही त्यांना मास लीडर नेत्यांची भीती वाटते, या नेत्यांना आपल्या मार्गातून हटविण्यासाठी ते कुटील खेळी करतात. आता पंकजा यांच्याबाबतीत नजीकच्या काळात मीडियाला हाताशी धरून अशा खेळ्या होतील. परंतु, खडसेंच्या अपमानानंतर खान्देशी समाज शांत बसला. पंकजांबाबत असा प्रयोग या नागपुरी चाणक्यांनी करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या पाठीमागे असलेला बहुजन समाज शांत बसणार नाही, हा इशारा आम्ही या निमित्ताने देत आहोत. 
---------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खसखसच्या शेतीचे वास्तव!