पवारांच्या राजकारणाला फडणवीसांचे वेसन!


फोकस/ पुरुषोत्तम सांगळे

शरद पवार म्हणजे महाराष्ट्रातील कमालीचे धूर्त अन् मातब्बर नेते. परंतु, पवारांकडूनही काही राजकीय चुका झाल्यात. स्व. गोपीनाथ मुंडे यांना ‘अंडर एस्टीमेट‘ करून पवारांनी राजकारणात मात खाल्ली होती. तशीच मात आता ते ‘कालचा बच्चा‘ समजून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खात आहेत. पवारांच्या जातीय समीकरणाला फडणवीसांनी जातीय समीकरणांनीच प्रत्युत्तर दिले. फडणवीसांची प्रत्येक राजकीय खेळी ही पवारांच्या राज्यातील राजकारणाला चांगलेच वेसन घालणारी ठरत असल्याने, पवारांना सांगताही येईना अन् सहनही होईना, असे झाले असेल!
--------------------


देशाच्या राजकारणात आपल्या चाणाक्ष अन् धूर्त राजकारणामुळे ओळखले जाणारे; परंतु पंतप्रधानपदाचा घास हाता-तोंडाशी येऊनही तोंडात न जाऊ शकलेले नेते म्हणजे शरद पवार होय! देशाचे सर्वोच्चपद भूषविण्यात पवार कमनशिबी ठरले असले तरी, राज्यात मात्र त्यांची राजकीय पकड मजबूत होती आणि आहे. किंबहुना सर्वच राजकीय पक्ष पवारच चालवितात, असे जे गमतीने म्हटले जाते, ते खरेही आहे. अशा शरद पवार यांच्याकडूनही काही राजकीय चुका होऊ शकतात, असे कुणाला म्हटले तर ते हास्यास्पद ठरेल. परंतु, मुरब्बी पवारांकडून राजकीय चुका झाल्या आहेत, अन् त्याचे राजकीय परिणाम सद्या पवार भोगत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार जे बोलतात ते गांभिर्याने घेतले जाते. कारण, त्यांच्या बोलण्याला अनेक कांगोरे असतात. तेवढेच महत्व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यालाही आलेले दिसते. सद्या मराठी प्रसारमाध्यमे फडणवीसांना गांभिर्याने घेतात, ही बाब कदाचित पवारांना पचनी पडणारी नसेल. स्व. गोपीनाथ मुंडे यांना ‘अंडर एस्टीमेट‘ करण्याचे काम एकेकाळी पवारांनी केले होते. परंतु, शरद पवार यांच्या मराठा-महार-माळी या जातीय समीकरणाला मुंडे यांनी माळी-धनगर-वंजारी-मराठा असे ‘माधवंम‘ने प्रत्युत्तर देत राज्याच्या राजकारणात शरद पवारपर्व संपविले. राज्यात सत्तेचा एकछत्री अमल करणार्‍या पवारांना मुंडेंच्या या सोशल इंजिनिअरिंगने जोरदार धक्का दिला होता. त्या धक्क्यातून पवार अद्यापही सावरलेले दिसत नाहीत. मुंडेंना शह देण्यासाठी माळी समाजातील नेते छगन भुजबळ यांचे प्यादे पवारांनी पुढे केले. त्यांना राजकीय ताकद दिली. परंतु, मुंडेंना शह देण्याऐवजी भुजबळ हे पवारांनाच राजकीय आव्हान ठरले. भुजबळ इतके मोठे झाले की पवारांना त्यांना सत्तेच्या उच्चपदापासून दूर ठेवणे शक्य झाले नाही. एखादा सारिपाट मांडताना त्यात हुकमी पान स्वतःकडे ठेवणारे पवार हे भुजबळांच्या प्रकरणात मात्र कमालीचे हतबल दिसले. दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश तत्कालिन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिले होते. त्यानंतर भुजबळांच्या मागे चौकशीचे शुक्लकाष्ठ लागले. आर. आर. पाटील उपाख्य आबा हे प्रत्येक गोष्ट पवारांना विचारल्याशिवाय करत नव्हते. आपल्याच पक्षाच्या नेत्यामागे चौकशीचा भुंगा लावण्याचा निर्णय ते पवारांना विचारल्याशिवाय घेऊ शकतील का? हा प्रश्‍न आहे. भुजबळांची उंची कमी करण्यासाठी गेलेल्या शरद पवारांना आता भाजप सरकारच्या काळात भुजबळ गजाआड गेलेले पहावे लागत आहे, यामागचे कारण हे पवारांच्या फसलेल्या राजकीय गणिताचा परिपाक नव्हे; तर वरचढ ठरलेल्या भुजबळांचा काट्या ने काटा काढण्यात पवारांना आलेले यश आहे, अशी जी राजकीय चर्चा रंगत असतेे, ती खरी असावी का? भुजबळ जसे स्व. गोपीनाथ मुंडे यांना शह देऊ शकले नाहीत. तसेच गोपीनाथरावांच्या समाजाला राष्ट्रवादीकडे वळविण्यासाठी धनंजय मुंडे आणि जितेंद्र आव्हाड या दोन वंजारी नेत्यांना पुढे करूनही पवारांना फारसा काही राजकीय फायदा झाला नाही. महाराष्ट्रातील वंजारी हा मोठा समाज पवारांच्या पाठीमागे येऊ शकला नाही, ही पवारांची खंत असावी. मुंडेविरुद्ध भुजबळ ही पवारनीती वापरताना भुजबळ हे हुशार निघाले, ते पवारांनाच आव्हान ठरले. तसे धनंजय मुंडे किंवा जितेंद्र आव्हाड ठरले नाहीत. त्यामुळे तूर्त तरी हे नेते पवारांची मर्जी राखून आहेत. पवार जे राजकारण कोळून पिलेत, तेच राजकारण आता कालपर्यंत पवारांना ‘बच्चा‘ वाटणारे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खेळत आहेत. मराठा-महार-माळी ही पवारांची रणनीती होती. त्याच रणनीतीला छेद देण्यात फडणवीस यशस्वी झालेत. फडणवीसांनी मराठा-महार-धनगर-वंजारी ही खेळी खेळली आहे. छत्रपती संभाजीराजेंना सन्मानाने त्यांनी राज्यसभेवर पाठविले; जे काम शरद पवारांनी कधीच केले नाही. रामदास आठवलेंना केंद्रात मंत्रिपद दिले; तेही काम पवारांनी केले नव्हते. अन् महादेव जानकर यांच्यासारख्या धनगर समाजातील लढवय्या नेत्याला त्यांनी राज्यात थेट कॅबिनेट मंत्रिपद देऊन या समाजाची हक्काची व्होटबँक स्वतःकडे वळवली आहे. पंकजा मुंडेंच्यानिमित्ताने वंजारी समाजाला त्यांनी पक्षासोबत ठेवलेच आहे. म्हणजे, पवारांच्या जातीय समीकरणांना फडणवीस यांनी तेवढ्याच चाणाक्षपणे चोख प्रत्युत्तर देत, राज्यातील राजकीय समीकरणे भाजपला पूर्णतः अनुकूल करून घेतलीत. त्याचा फटका पुढील निवडणुकांत पवारांना बसणार आहे, हे सांगण्यासाठी कुण्या ज्योतिष्याची गरज नसावी. दुसरे असे, की शिक्षण-सहकार, बँका आणि बाजार समित्या हे शरद पवारांची बलस्थाने आहेत. या बलस्थानांवर घाव घातला की पवार गळितगात्र होतात, हे फडणवीस चांगले जाणून आहेत. त्याचमुळे शिक्षणमंत्री विनोद तावडे (पुन्हा मराठा!) अन् सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील (पुन्हा मराठाच!) या मंत्र्यांच्या माध्यमातून ते राष्ट्रवादीच्या शक्तिस्थळांना धक्के देण्याचे काम करत आहेत. खासगीकरणामुळे सहकारातील मराठा शिक्षणाक्षेत्राकडे वळला. परंतु, फडणवीसांनी तावडेंच्या माध्यमातून नव्या शैक्षणिक धोरणांद्वारे पवारांच्या ताब्यातील या संस्थांची मुस्कटदाबी सुरु केली. नवा शैक्षणिक कायदा आणून खासगी शिक्षणसंस्थांतील प्रवेशांवर सरकारचे नियंत्रण आले, सरकारच्या संमतीशिवाय शुल्कवाढ न करण्याचा आदेश झाला आणि या नियमांचे उल्लंघन केल्यास दंड व शिक्षेची तरतूद करण्यात आली. सहकारी संस्थांत गैरव्यवहार करणार्‍या संचालकांना दहा वर्षे निवडणूक लढविणे, मतदानास बंदी घालून सहकारक्षेत्रातील पवारांच्या ‘टग्यां‘नाही फडवीसांनी वेसन घातले. कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मक्तेदारीही संपुष्ट आणली. त्यामुळे तावडे-चंद्रकांतदादा यांच्या माध्यमातून ‘लोहा लोहे को काटता है‘ या उक्तीप्रमाणे फडणवीस यांनी पवारांची गत सांगता येईना अन् सहनही होईना अशी करून टाकली आहे. ज्या राजकीय, सामाजिक समीकरणांचा आधार घेत शरद पवार हे राज्यातील ‘वजनदार‘ नेते ठरलेत, त्याच जातीय समीकरणांच्या आधारे देवेंद्र फडणवीस या ‘कालच्या बच्चा‘ असे उपहासाने म्हटल्या गेलेल्या नेत्याने
पवारांच्या एकएक शक्तिस्थळाला सुरुंग लावण्यास सुरुवात केली. शरद पवार हे असल्या राजकीय चक्रव्युहांना भेदण्यास सक्षम आहेत, परंतु आधी गोपीनाथ मुंडे आणि आता देवेंद्र फडणवीस या नेत्यांना ‘एंडर एस्टीमेट‘ करण्याची राजकीय चूक मात्र पवारांना महागात पडत गेली आहे; अन् हे वास्तव पवार नाकारू शकणार नाहीत!
---------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खसखसच्या शेतीचे वास्तव!