सोनई हत्याकांड : पुरोगामी महाराष्ट्राला बट्टा!
सोनईतील नृशंस हत्याकांड हे पुरोगामी महाराष्ट्राला मोठा बट्टा आहे. समाजपुरुषाच्या मनातून आजही जातीचे अवडंबर गेले नाही, याची प्रचिती देणारे हे हत्याकांड आहे. या हत्याकांडातील दोषींना न्यायसंस्थेने कठोरात कठोर शिक्षा द्यावीच; परंतु भविष्यात अशा घटना पुन्हा होणार नाहीत, यासाठी जनजागृतीची गरज निर्माण झाली आहे.
..........
‘‘मराठ्याच्या पोरीसंगं प्रेम करुन माझ्या पोरानं गुन्हा केल्ता का?’’ हा सवाल सोनई हत्याकांडातील मृत सचिन घारू याची आई कलाबाई घारू यांनी केला, अन् फुले-शाहू-आंबेडकरांच्या या पुरोगामी महाराष्ट्रात जात अद्यापही कशी मानगुटीवर पक्की पाय खोचून उभी आहे, याचा प्रत्यय आला. भारतीय संस्कृतीत जातीने मानवी भेद निर्माण केले. हे भेद अद्यापही प्रत्येकाच्या मनावर पक्के आहेत. भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकारांनी समाजातून जात नाहिशी करण्याचा प्रयत्न केला. कायद्याने जातीभेद पाळणे हा गुन्हा आहे. परंतु, राज्यघटनेच्या चौकटीलाच उद्ध्वस्त करणारी जात नावाचा मनुवादी राक्षस आजही समाजात नंगानाच घालत असून, त्या राक्षशी प्रवृत्तीनेच मेहतर समाजातील तीन युवकांचा निर्घृण बळी घेतल्याचे वास्तव पुरोगामी महाराष्ट्राला बट्टा लावणारे आहे. या हत्याकांडातील मृत सचिन घारू या युवकाच्या आईला भेटण्याचा योग नुकताच आला. ही माऊली बोलताना म्हणाली, ‘‘पोराचे तुकडे या डोळ्यानी पाहले. मराठ्याच्या पोरीसंग प्रेम करून माझ्या पोरान गुन्हा केल्ता का? ते दोघ बी लगीन करणार होते, पर त्या लोकांनी तेला मारून टाकल, ती माणस नायीत हैवान हायीत’’!! कलाबाई घारू या माऊलीच्या डोळ्यात येणारे अश्रू पोटचा गोळा कोयत्याने तोडला गेल्याचा संताप अक्षरशः ओकत होते. लोकशाहीचा डिंगोरा पिटणार्या राजकारण्यांना आणि सत्ताधार्यांना या अश्रूचे मोल कळणारे नाही. हे अश्रू पेट्रोलबॉम्ब होऊन पेटण्याची अपेक्षा हे सरकार करते का? हा सवाल निर्माण होत आहे. सोनई हत्याकांडामागची पार्श्वभूमी तरी काय? म्हणून काही माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, अत्यंत धक्कादायक वास्तव चव्हाट्यावर आले. सोनई येथे नववर्षाच्या सुरुवातीलाच संदीप थनवर, सचिन घारू आणि राहुल कंधारे या तीन मेहतर जातीच्या तरुणांची निर्घृण हत्या झाली होती. या हत्याकांडप्रकरणी रमेश, पोपट, प्रकाश, गणेश हे सर्व दरंदले आणि अशोक नवगिरे, दरंदले यांचा भाचा संदीप कुर्हे व अशोक फलके यांना अद्यापपर्यंत अटक करण्यात आली आहे. या हत्याकांडामागचे कारण जे कानावर आले ते असे आहे, मृतक सचिन घारू व दरंदलेतील एका मुलीचे एकमेकांवर प्रेम होते, परंतु सचिन हा दलित मेहतर जातीचा आणि ही मुलगी उच्च जातीची असल्याने हे प्रेमसंबंध या उच्चजातीच्या तिच्या आई-वडिलांना मान्य होण्याचा प्रश्नच नव्हता. हे प्रेमप्रकरण जेथे फुलले ती संस्थादेखील एका मोठ्या नेत्याची आहे. नेवासा फाटा येथील या संस्थेत संदीप, सचिन आणि राहुल हे तीनही युवक रोजीरोटीसाठी सफाईचे काम करीत होते. पैकी संदीप थनवर हा अनेक वर्षापासून या संस्थेत सफाईचे काम करीत होता व त्याचा आंतरजातीय विवाह झाल्यानंतर पत्नी व एक वर्षाच्या मुलासह तो कर्मचारी निवासात राहत होता. संदीपने दीड वर्षापूर्वीच सचिनलादेखील याच संस्थेत कामाला लावले व त्यालादेखील कर्मचारी निवासात घर मिळाले होते, त्याची आई व तो तिथे राहत होते. राहुल कंधारे हा मात्र हत्येच्या पाच दिवसापूर्वीच नवीन कर्मचारी म्हणून संस्थेत लागला होता व त्याला होस्टेलवर एक छोटी रूम मिळाली होती. याच महाविद्यालयात उच्चवर्णीय समाजातील संबंधित मुलगी शिकत होती व तेथेच सचिन आणि तिचे प्रेमसंबंध निर्माण झाले, ते दोघेही एकमेकांना भेटत असल्याची माहिती मुलीच्या कुटुंबीयांना मिळाली होती. त्यावरुन तिच्या कुटुंबीयांनी सचिनला ‘तिचा नाद सोडून दे नाहीतर जीवानिशी जाशील’ अशी धमकी दिली होती. ही माहिती कलाबाई घारू यांनीच दिली. या धमकीने सचिन घाबरलेला होता, तरीही त्याने लग्न करण्याचे ठरवले होते. प्रकरण हाताबाहेर गेल्यानंतरच मुलीच्या कुटुंबीयांनी सचिन धारू यांचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच मुलीच्या कुटुंबीयांनी अशोक नवगिरे याच्यामार्फत संदीप थनवर याला सचिनसह येण्याचा निरोप पाठवला. संदीप, सचिन आणि राहुल हे मिळालेल्या निरोपानुसार दरंदले यांना भेटायला गेले अन् पुढे हा नृशंस प्रकार घडला. एक जानेवारीला दुपारी चार वाजेपर्यंत दोघांचे फोन लागत होते. परंतु, नंतर त्यांचे फोन लागणे बंद झाले. याचा अर्थ हे हत्याकांड चार वाजेच्या सुमारास घडविले असावे. खरे तर या हत्याकांडाचा तपासदेखील संशयास्पदच म्हणावा लागेल. आरोपी रमेश आणि प्रकाश दरंदले यांनी स्वतःहून पोलिस ठाण्यात जाऊन सेफ्टीटँक साफ करताना संदीपचा बुडून मृत्यू झाल्याची खबर दिली होती. पोलिस तपासासाठी आले तेव्हा, दोन फुटाच्या सेफ्टीटँकमधून सहा फुट उंची असलेल्या संदीपचा मृतदेह बाहेर काढला. हा प्रकार संशयास्पदच होता. कारण, सहा फुटाचा व्यक्ती दोन फुटाच्या टँकमध्ये कसा बुडून मरणार? या मुद्द्याभोवती पोलिसांचा संशय बळावल्याने दरंदले यांनी संदीपबरोबर आलेल्या सचिन आणि राहुलने त्याला मारून त्यात टाकून पळून गेल्याचे कथानक रचले. पोलिसांनी आजूबाजूचा परिसर तपासला तेव्हा कोरड्या विहिरीत डोकं, हात आणि पाय नसलेले मृत शरीर पोलिसांना सापडले. बाजूलाच त्यांचे इतर अवयवदेखील सापडले. मृतक सचिनच्या छातीवर संबंधित मुलीचे नाव गोंदलेले होते, त्यामुळे त्याचा मृतदेह ओळखता आला. हे खून अक्षरशः कडबा कापण्याच्या विळ्याने तुकडे करुन झाले असल्याचे पोलिस तपासांत स्पष्ट झालेच आहे. प्रारंभी पोलिसांनी हे हत्याकांड भारतीय दंडविधानाच्या कलम ३०२ नुसार नोंदवले. परंतु, दलित अत्याचारविरोधी कायद्यान्वये गुन्हा नोंदवायला तब्बल पाच दिवस का लागले? याचे उत्तर पोलिसांनी द्यायला हवे. दुसरीबाब अशी, की मृत सचिनच्या छातीवर संबंधित मुलीचे नाव गोंदलेले होते; पण मृतदेहाच्या पंचनाम्यात पोलिसांनी त्याचा उल्लेख का टाळला, हेही कळत नाही. हे हत्याकांड घडल्यानंतर दलित कुटुंबातील बायाबापड्यांनी नातेवाईकांचे घर गाठले. कारण, गावात तेवढी दहशतच होती. भीतीमुळे संदीपचे कुटुंबीय हे त्यांच्या नातेवाईकांकडे मालेगाव व सचिनची आई त्यांच्या मुलीकडे एरंडोल येथे निघून गेली होती. दैनिक देशदूतसह प्रसारमाध्यमांनी या हत्याकांडाला वाचा फोडल्यानंतर या हत्याकांडाची माहिती गृहमंत्र्यांना मिळाली होती. पालकमंत्र्यांनीदेखील मुख्यमंत्र्यांना या प्रकरणाची माहिती पुरवली होती किंवा नाही हा प्रश्नच आहे. महिनाभर तर या प्रकरणातील तपासात कोणतीही प्रगती झाली नाही. दि. ७ फेब्रुवारीरोजी गणेश दरंदले आणि अशोक फलके यांना अटक झाली. मानव हक्क चळवळीच्या कार्यकर्त्या मनीषा टोकले यांनी कलम ४ नुसार कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पोलिसांवर कारवाई केली जावी, अशी मागणी केली आहे. ही मागणीही या हत्याकांडाच्या तपासातील उणिवा पाहता, योग्य वाटते. मीडियाने हे प्रकरण उचलले नसते तर कदाचित नंतर घटनास्थळी भेट देण्यासाठी दलित नेत्यांची जी रिघ लागली तीही दिसली नसते. आयबीएन - लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी या हत्याकांडाबाबत अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. देशदूतनेही अत्यंत सडेतोड भूमिका घेतली. त्यानंतरच हे प्रकरण महाराष्ट्राला आणि देशाला कळू शकले. केवळ मीडियाच्या प्रभावी भूमिकेमुळेच गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी त्यात लक्ष घातले. तसेच, निवृत्त न्यायाधीश व राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य सी. एल. थूल यांनीदेखील येथे भेट देऊन हत्येच्या कारणाला केंद्र करून तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले. आता या प्रकरणाचा तपास सीआयडी ही तपास यंत्रणा करत आहे. हे हत्याकांड जातीय तेढ वाढविणारे असले तरी, जिल्ह्यातील उच्चवर्णीय समाज पुरोगामी विचारधारा मानणारा आहे. केवळ जातीच्या घातकी मानसिकतेमुळे दरंदले कुटुंबीयांनी हा नृशंस प्रकार केला असल्याचा आरोप असला तरी, ही जातीय मानसिकता पुरोगामी महाराष्ट्राला कलंकच ठरते. फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेऊन राजकारण करणार्यांनी ही मानसिकता दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी खतपाणी घालण्याचेच पाप केल्याने आज तीन युवकांचा हकनाक क्रूर बळी गेला. महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला कायमचा बट्टा लावणारे हे हत्याकांड ठरले आहे.
...
पूर्वप्रकाशन : १६ फेब्रुवारी २०१३, दैनिक देशदूत

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा