पवार काका-पुतण्याचे धक्के!

शरद पवार आणि धक्कातंत्र याबाबी महाराष्ट्रातील राजकारणात नवीन नाहीत। राज्याच्या राजकारणाचा इतिहास पाहाता, सर्वाधिक राजकीय धक्के देण्याची नोंद पवारांच्याच नावावर असेल। आतादेखील आ। धनंजय मुंडे आणि ठाण्याचे खासदार आनंद परांजपे यांना राष्ट्रवादीच्या तंबूत आणून पवारांनी भाजप-शिवसेनेला जोरदार धक्का दिला। महानगरपालिका किंवा जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांत या धक्कातंत्राचा राजकीय फायदा होणार असला तरी आगामी विधानसभा निवडणुकांच्यादृष्टीने हे धक्के फार साहाय्यभूत ठरणारे आहेत. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, या बालेकिल्ल्यात सुरुंग लावून पवारांनी उद्धव ठाकरेंना जसा दणका दिला तसाच परळी या गृहशहरात खा. गोपीनाथ मुंडेंनाही दणका देण्यात पवार काका-पुतणे यशस्वी झाले आहेत. पवारांच्या या फोडाफोडीच्या राजकारणाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसला निश्चितच चांगली फळे लाभतील.......
सध्या राज्यभर निवडणुकांचा मोसम असून, या मोसमात पक्षांतराचे पिक जोरदार आलेले असते. हे पिक घेण्यासाठी पवार काका-पुतण्याने चांगलीच कंबर कसली असल्याचे सध्या तरी राज्यात चित्र आहे. सर्वच पक्षात कुचंबणाग्रस्त आणि स्वाभिमानाला ठेच लागलेल्यांची संख्या काही कमी नाही. एकेकाळी ओबीसींचे नेते म्हणून ओळखले जाणारे भाजपनेते खा. गोपीनाथ मुंडे यांच्याही स्वाभिमानाला ठेच लागली म्हणून, ते पक्षत्याग करायला निघाले होते. परंतु, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कणखर भूमिकेमुळे आणि भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांनी राजधानी दिल्लीत फिरवलेल्या चक्रामुळे त्यांचा इरादा यशस्वी झाला नाही व ते कॉंग्रेसवासी होऊ शकले नाहीत. आपल्याला स्वाभिमान वैगरे असतो, तसा तो इतरांनाही असतो, याचा विसरच सध्या खा. मुंडे यांना पडल्याने दोन दिवसांपूर्वी परळीत मोठे महाभारत घडून गेले. राजकारणात सक्रीय असलेले आजचे तरुण प्रचंड महत्वाकांक्षी आहेत. त्यात हा तरुण जर गोपीनाथ मुंडेंचा पुतण्या असेल तर मग् त्याची महत्वाकांक्षा इतरांपेक्षा पळीभर जास्तच असेल. खा. मुंडेंच्या संस्कारात वाढलेल्या आ. धनंजय मुंडेंना मोठे करण्यात गोपीनाथ मुंडेंचा सिंहाचा वाटा आहे. तसेच, त्यांची महत्त्वाकांक्षा वाढविण्यातही खा. मुंडे यांचीच प्रामुख राजकीय भूमिका आहे. परंतु, जेव्हा राजकारणात त्यांना संधी देण्याची वेळ येते, राजकीय उत्तराधिकारी म्हणून जेव्हा एखाद्याला पुढे करण्याची वेळ येते तेव्हा मात्र खा. मुंडे यांचे कन्याप्रेम उफळून आले आणि सच्चा वारसदार दूर सारून ते मुलीला राजकीय उत्तराधिकारी म्हणून पुढे करण्याची चूक करतात. अशीच चूक एकेकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. ब्लड ईज थिकर दॅन वॉटर (पाण्यापेक्षा रक्त घट्ट असते) या म्हणीप्रमाणे शिवसेनाप्रमुखांनी अप्रभावी पुत्रास उत्तराधिकारी नेमताना प्रभावशाली पुतण्या दूर सारला आणि आज शिवसेनेला ओहोटी लागल्याचे दुर्देवाने राज्यभर चित्र आहे. हीच चूक आजकाल खा. गोपीनाथ मुंडे यांनी केली असून, राष्ट्रीय स्तरावर गेलेले खा. मुंडेंसारखे नेते स्थानिक राजकारणाच्या चक्रव्यूहात अडकले गेले व स्वतःची शोभा करून बसले आहेत. या संधीचा अचूक फायदा पवार काका-पुतण्यांनी घेतला. बीड जिल्ह्याच्या राजकारणात खा. मुंडेंच्या राजकारणाला तशीही उतरती कळा लागलीच होती. ज्येष्ठनेते पंडीतअण्णा मुंडेंना पक्षात घेऊन आणि खा. मुंडेंच्याविरुद्ध पुतण्यास उभे करून पवारांनी अखेरचा घाव घालून, बीड जिल्ह्यातील खा. मुंडेंचे वर्चस्व मोडीत काढले, असेच म्हणावे लागेल. शरद पवार हे महाराष्ट्रातील जाणकार नेते आहेत. धक्कातंत्राचे राजकारण करण्यात पवारांचा हातखंडा असून, उभा महाराष्ट्र साहेबांच्या राजकीय खेळीबाबत अनभिज्ञ राहात आला आहे. बीड जिल्ह्यात धनंजय मुंडेंच्या रुपाने एक तरुण नेता राष्ट्रवादीत आणण्याची किमया अजित पवारांनी केली असताना, दुसरीकडे ठाण्याचा गड एकहाती जिंकणारे शिवसेनेचे खासदार आनंद परांजपे यांना राष्ट्रवादीत आणण्याची यशस्वी खेळीही शरद पवार यांनी खेळली. खा. परांजपे शिवसेनेतून फुटणे हा शिवसेनेसाठी पर्यायाने उद्धव ठाकरे यांच्यासाठी जोरदार धक्का आहे. ठाणे हा शिवसेनेचा परंपरागत बालेकिल्ला असून, या बालेकिल्ल्याचा सुरूग लावणे पवारांसाठी महत्त्वपूर्ण ध्येय होते. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बालेकिल्ल्यास सुरुंग लावण्यात यश आल्याने पवारांनी अर्धी लढाई जिंकली, असेच म्हणावे लागेल. खासदार आनंद परांजपे यांना राजकीय ताकद देण्याचे काम भलेही शिवसेनेने केले असले तरी त्यांच्या स्वाभिमानास ठेच पोहोचविण्याचे कामही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाने केले. असे नाराज नेते शिवसेनेत पायलीला पसाभर असले तरी योग्यवेळी त्यांच्या भावनांचा स्फोट होत असतोच. असे नेते हेरण्यात आणि त्यांना डोळा मारून पक्षात खेचण्यात शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यांचा हात कुणी धरत शकत नाही. बेरजेचे राजकारण करताना या काका - पुतण्यांनी आता अशा नेत्यांवर लक्ष केंद्रीत करुन आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट केली आहे. परळीत मुंडेंना पर्यायाने भाजपला धक्का देताना ठाण्यात उद्धव ठाकरेंना पर्यायाने शिवसेनाला धक्का देणारे पवार काका-पुतणे उद्या कॉंग्रेसलाही खिंडार पाडतील, यात काहीही शंका नाही. अजित पवारांनी पक्षाच्या नेतृत्त्वाची सूत्रे हाती घेतल्यानंतर राज्यात पक्ष बळकटीला प्राध्यान्य दिले आहे. सुदैवाने पृथ्वीराज चव्हाणसारखे जनतेचा पाठिंबा नसलेले नेतृत्त्व राज्यात कॉंग्रेस पक्ष चालवत आहे. त्याचादेखील राजकीय फायदा अजित पवार घेत आहेत. निवडणुकीच्या मोसमात फोडाफोडीचे राजकारण करून पवार काका-पुतणे महाराष्ट्राला धक्कातंत्राची अनुभूती देत असले तरी दीर्घकालिन उद्दिष्टे पाहाता, या धक्कातंत्रातून पवारांना चांगलाच राजकीय फायदा होण्याची सुचिन्हे आहेत.
(प्रकाशन : दैनिक देशदूत, सोमवार, दि. २३ जानेवारी २०१२)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा