संन्यांशांचे बंड!


भारत हा त्यागभूमी, तपोभूमी आहे. म्हणूनच या भूमिवर देवतांनी जन्म घेतला. संपूर्ण विश्‍वाचा ज्ञानबिंदू असलेला हा देश आज भ्रष्टाचार्‍यांचा देश म्हणून ओळखल्या जातो. आज या देशाकडे गरिबांचा देश म्हणून हीनतेने पाहिले जात आहे. या देशाची थोडीथोडकी नव्हे तर तब्बल ४०० लाख कोटी रुपयांची संपत्ती देशातीलच भ्रष्टाचार्‍यांनी लुटून विदेशात दडवून ठेवलेली आहे. हा पैसा परत आला तर या देशातून सोन्याचा धूर पुन्हा निघेल. भ्रष्टाचार हा या देशाला लागलेला कलंक असून, तो मिटविण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नसताना, आणि या देशातील भ्रष्टाचारी राज्यकर्त्यांपुढे सर्वच षंढ बनून गोंडा घोळित असताना, या देशाला सावरण्यासाठी पुन्हा एकदा संन्याशांनीच पुढाकार घेतला आहे. अण्णा हजारे या संन्याशाने जनलोकपाल विधेयकाच्या माध्यमातून भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी विद्यमान सरकारविरुद्ध युद्ध पुकारले असतानाच, आता आणखी एक संन्याशी त्यांच्या वाटेवरून विदेशातील काळा पैसा परत आणण्यासाठी सरकारविरुद्ध बंड पुकारता झाला आहे. आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर या संन्याशानेदेखील देहत्यागाची भूमिका घेतली. रामदेव बाबा हे त्या संन्याशाचे नाव असून, शनिवारपासून त्यांनी राष्ट्रहितासाठी रामलीला मैदानावर आमरण उपोषणाचा सत्याग्रह पुकारला आहे. सरकारला त्यांच्यासमोर झुकावेच लागेल. अन्यथा, या देशातील नव्या क्रांतीला सामोरे जावे लागेल. बाबांचे उपोषण यशस्वी झाले तर या देशात सोन्याचाच धूर निघणार असून, भारत हा गरिबांचा नव्हे तर श्रीमंतांचा देश होईल, या देशाला त्याचे गतवैभव परत मिळणार आहे. हे गतवैभव परत मिळवण्यासाठीच या देशातील काही पिढ्या ही प्रार्थना नित्यनेमाने करत आली आहे.
विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर विधायास्य धर्मस्य संरक्षणम् परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं सर्वथा भवत्वाशिषा ते भृशम्
भ्रष्टाचार ही या देशाला लागलेली कीड असून, ही वाळवी आज लागलेली नाही. इतिहासाच्या खोलात शिरले तर त्याचा उगम भारतीय स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापर्यंत जातो. स्वातंत्र्यांच्या दोन वर्षातच पहिला घोटाळा सामोरे आला होता, तो म्हणजे जीप स्कॅण्डल आणि या घोटाळ्यात दस्तरखुद्द नेहरूंचे विश्‍वासू कृष्णा मेनन यांचा सहभाग होता. या घोटाळ्याने नेहरूंसारख्या व्यक्तीवर पहिल्यांदाच चिखलफेक झाली होती. कॉंग्रेसने खर्‍याअर्थाने घोटाळ्यांची मुहुर्तमेढ या जीप घोटाळ्याच्या रुपाने लावत आज त्याचा कळस गाठला. असेच, खेदाने म्हणावे लागेल. या घोटाळ्यानंतर १९६४ मध्ये पंजाबचे मुख्यमंत्री प्रताप सिंग कैरो यांनी केलेल्या विविध घोटाळ्यांनी खळबळ उडाली होती. त्यांच्या चौकशीसाठी नेमलेल्या दास आयोगाच्या अहवालानंतर त्यांना मुख्यमंत्रिपदावरून पदच्युत करण्यात आले होते. वर्ष १९७१ पर्यंत फारसे मोठे घोटाळे झाल्याचा इतिहास नसला तरी त्यानंतर मात्र मोठ्या प्रमाणात घोटाळे उघडकीस आले आणि भारत हा घोटाळेखोरांचा देश आहे, ही सर्वदूर ओळख पसरली. वर्ष २०१० हे तर सर्वाधिक मोठ्या घोटाळ्यांचे वर्ष सिद्ध झाले आहे. कॉंग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार हे सर्वाधिक घोटाळेबाज सरकार सिद्ध झाले असून, या वर्षातील तीन घोटाळ्यांनी तर अख्खा देश सरकारविरुद्ध संतापाची आग ओकत आहे. उच्चपदस्थ लोकांनी घोटाळे करू नयेत यासाठी १९६९ मध्ये सर्वप्रथम लोकपाल विधेयक पारित करण्यात आले होते. परंतु, हे विधेयक भ्रष्टाचारी राज्यकर्त्यांनी राज्यसभेत मात्र रोखून धरले. राज्यसभेत हे विधेयक अद्यापही पारित होऊ शकले नाही. या विधेयकाला १९७१, १९७७, १९८५, १९८९, १९९६, २०००, २००५ आणि २००८ मध्येदेखील सादर करण्यात आले होते. तब्बल आठवेळा हे विधेयक संसदेत सादर होऊनही त्याला मंजूर करण्यास टाळाटाळ करण्यात आली असून, राजकारण्यांच्या या कृतीने त्यांचा विशुद्ध हेतू चव्हाट्यावर आला आहे. तरीदेखील हे लोकपाल विधेयक म्हणजे, दात नसलेले वाघ आहे, अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केल्यानंतर अधिक कठोरात कठोर विधेयक आणण्यासाठी त्यांनी जनलोकपाल विधेयक ही संकल्पना पुढे आणली आहे. भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी हजारे यांनी ५ एप्रिलरोजी नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे आमरण उपोषणदेखील केले होते. चार दिवसांच्या कडकडीत उपोषणानंतर त्यांची केंद्र सरकारने दखल घेतली व आता प्रभावी अशा जनलोकपाल विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी हजारेंच्या उपस्थितीतील मसुदा समिती कार्यरत झाली आहे. आता ही समिती ३० जूनपर्यंत मसुदा तयार करणार असून, १५ ऑगस्टपूर्वी हे विधेयक पारित करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. एकीकडे, भ्रष्टाचाराचा समूळ नायनाट करण्यासाठी कठोरात कठोर जनलोकपाल विधेयक तयार करण्यासाठी कसरत सुरु असताना, दुसरीकडे, अण्णा हजारे यांच्यापासून प्रेरणा घेऊन योगगुरू रामदेव बाबा यांनीदेखील व्यवस्था परिवर्तनाच्या लढाईत सामील होऊन, शनिवारपासून आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे. रामदेव बाबांनी केलेल्या मागण्या मात्र खरोखर क्रांतीकारक असून, या देशाचा इतिहास बदलणार्‍या तसेच भविष्य सुधारविणार्‍या आहेत. बाबांच्या मागण्यांवर लक्ष्य् टाकल्यास त्या पुढीलप्रमाणे, १) देशातील भ्रष्टाचार्‍यांनी विदेशात लपविलेला ४०० लाख कोटी रुपयांचा काळा पैसा परत आणल्या जावा. २) हा पैसा राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर करावा. ३) देशाचे हे धन विदेशात दडवून ठेवणार्‍यांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी. ४) भ्रष्टाचाराचा समूळ नायनाट करण्यासाठी कठोरात कठोर लोकपाल विधेयक पारित करण्यात यावे. ५) भ्रष्टाचारी लोकांची संपत्ती जप्त करण्यात येऊन त्यांना जन्मठेप अथवा फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी. ६) भ्रष्टाचाराचे खटले द्रूतगती न्यायालयात निकाली काढण्यात यावेत. ७) भ्रष्टाचार रोखण्यासाठी व्यवस्था परिवर्तन करण्यात यावे. ८) पब्लिक सर्व्हिस गॅरण्टी कायदा बनविण्यात यावा. ९) मतदान अनिवार्य करण्यात यावे. तसेच, १०) पंतप्रधानांची निवड सरळ जनतेतून करण्यात यावी, या मागण्यांसाठी रामदेव बाबा आता रामलीला मैदानावर आमरण उपोषणास बसले आहेत. रामदेव बाबांचे उपोषण मागे घेण्यासाठी केंद्र सरकारने त्यांचे मन वळविण्याचे अटोकाट प्रयत्न केले होते. बुधवारी बाबांचे विमान दिल्ली विमानतळावर पोहोचण्यापूर्वी केंद्रातील चार वरिष्ठ मंत्री त्यांना भेटण्यासाठी विमानतळावर पोहोचले होते. प्रणव मुखर्जी, कपिल सिब्बल, सुबोधकांत सहाय, पवनकुमार बन्सल यासारख्या दिग्गज मंत्र्यांनी बाबांचे मन वळविण्यासाठी चांगलाच द्रविडी प्राणायाम केला. परंतु, त्यात त्यांना यश लाभले नाही. शुक्रवारीदेखील बाबांची गाठभेट या मंत्र्यांनी घेतली. पंचतारांकित हॉटेलमध्ये कपिल सिब्बल, पवनकुमार बन्सल आणि सुबोधकांत सहाय या मंत्र्यांनी तब्बल सहा तास मॅरेथॉन चर्चा करून रामदेव बाबांचे मन वळविण्याचे प्रयत्न केले. काही मुद्द्यांवर सरकार व बाबा यांच्यात मतौक्य झाले असले तरी काही मुद्द्यांवर मतभेद कायम असल्याने आणि, सरकार बाबांच्या सर्वच्या सर्व मागण्या मान्य करण्यास तयार नसल्याने अखेर रामदेव बाबांनी त्यांचा उपोषणाचा निर्धार कायम ठेवला व शनिवारपासून त्यांनी उपोषण सुरुदेखील केले आहे. या उपोषणाचा शेवट काय होणार हे आता काळच ठरवेल. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रामदेव बाबांना अनुभवाचा सल्ला दिलाच आहे. सरकारवर विश्‍वास ठेवू नका, कारण सरकार विश्‍वासघातकी आहे. मला धोका दिला तसा तुम्हालाही धोका देऊ शकते, असे हजारे यांनी बाबांना सांगितले होते. हजारेंचा हा सल्ला बाबा निश्‍चितच ऐकतील यात दुमत नाही. असे झाले तर बाबांचे उपोषण निश्‍चितच यशस्वी होईल. आणि, हे उपोषण यशस्वी झाले तर या देशात एका नव्या क्रांतीचा अध्याय लिहिल्या जाईल. अण्णा हजारे असोत किंवा रामदेव बाबा किंवा स्वामी अग्निवेश. या संन्याशांनीच आता या देशातील भ्रष्टाचार मनावर घेतला आहे. तसेही, या देशाच्या प्रगतीशील वाटचालीत संन्यांशांचे योगदान फार मोठे आहे. जेव्हा जेव्हा या देशावर अरिष्ट कोसळले तेव्हा तेव्हा संन्याशीच पुढे सरसावले. त्यांच्या विवेकाने, त्यागाने त्यांनी हा देश सावरला, या देशातील समाज सावरला, हा इतिहास आहे. आतादेखील या देशाला वाचविण्यासाठी रामदेव बाबासारख्या योगगुरु संन्याशालाच पुढाकार घ्यावा लागला आहे. त्यांच्या आंदोलनास सर्व देशवासीयांनी पाठिंबा देणे ही काळाची गरज आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खसखसच्या शेतीचे वास्तव!