या विषमतेतून क्रांती पेटेल!

रतन टाटा हे केवळ उद्योगपती नाहीत. तर भारताचे द्रष्टे शिल्पकार आहेत. मुकेश अंबानींच्या आलिशान राहणीमानावर त्यांनी नुकतेच प्रखड भाष्य केले होते. अब्जावधी रुपये खर्च करून अंबानी यांनी बांधलेल्या ऍण्टिलिया या महालात वीज, पाणी यांची उधळपट्टीतर होतेच. शिवाय, २७ मजली या आलिशान महालात अंबानी कुटुंब एकटे राहते. अंबानी यांनी असे आलिशान जीवन जगताना आजुबाजूचे दारिद्रयही पाहावे, अशी सूचना टाटा यांनी केली होती. टाटा हे स्वतः अब्जाधीश आहेत. परंतु, एका छोट्या घरात राहतात, तसेच साधे जीवन जगतात. मात्र, त्यांनी उद्योगातून कमाविलेला कोट्यवधींचा पैसा देशातील गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी खर्च केला आहे. अंबानी आणि टाटा ही या देशाची दोन टोके मानली तर टाटा यांच्याबद्दल देशवासीयांना जेवढा आदर आहे, तेवढाच तिरस्कार आता अंबानींबद्दल निर्माण झाला आहे. अंबानींच्या आलिशान राहणीमानातून विषमतेचा रोग पसरत चालला असून, या रोगातूनच उद्या क्रांतीच्या ज्वाला पेटतील, या ज्वालांत अंबानींचा आलिशान ऍण्टिलिया जळून खाक होण्यास फार वेळ लागणार नाही. अशी क्रांती यापूर्वी रशिया, चीनने अनुभवली आहे, भारतातदेखील या क्रांतीची वाट मुकेश अंबानी पाहात आहेत का?
....भारत हा एक देश असला तरी या देशाचे दोन तुकडे केव्हाच झाले आहेत. एक श्रीमंतांचा इंडिया झाला तर दुसरा गरिबांचा भारत राहिला आहे. भारताच्या समस्या वेगळ्या आहेत. तर इंडियाचे प्रॉब्लेम वेगळे आहेत. भारतातील लोकांकडे विष घ्यायला पैसे नाहीत, तर इंडियातील मंडळींकडे पैसे ठेवायला जागा नाही. हा विषय येथे चर्चेत घेण्याचे कारण म्हणजे, ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या आलिशान राहणीमानावर केलेले प्रखड भाष्य होय. अंबानी हे इंडियात राहणारे अब्जाधीश आहेत, तर रतन टाटा हे अब्जाधीश असले तरी गरिबांच्या भारतात राहतात. टाटांनी त्यांचे वादग्रस्त विधान ब्रिटनमध्ये केले असले तरी त्यांच्या विधानाने भारतीय समाजजीवनात मंथन सुरु झाले. लंडन येथील वृत्तपत्र दी टाइम्सला दिलेल्या विशेष मुलाखतीत रतन टाटा यांनी भारतामधील गरिबी व श्रीमंती यांच्यात वाढत चाललेली दरी व आर्थिक विषमतेबाबत भाष्य करताना सांगितले होते, की मुकेश अंबानी एवढ्या मोठ्या अब्जावधींच्या आलिशान महालात का राहात असतील? त्यांनी आश्चर्य व्यक्त केले होते, की एखादा अब्जाधीश जेव्हा अशाप्रकारे संपत्तीची उधळपट्टी करत असेल, चैनीचे जीवन जगत असेल, त्याच्या या कृतीतूनच क्रांतीच्या विचारांचा जन्म होत असतो. त्यामुळे जे लोक अशा आलिशान महालात राहत असतील, त्यांनी थोडे आजुबाजूला पाहिले पाहिजेत. त्यांनी थोडा इतरांचाही विचार केला पाहिजेत. भारताला अशा लोकांची गरज आहे, जे त्यांच्या अमाप संपत्तीतील थोडा हिस्सा इतर लोकांच्या समस्यांना, अडचणींना दूर करण्यासाठी खर्च करू शकतील. रतन टाटा यांच्या या वादग्रस्त मुलाखतीने भारतातील उद्योगजगतात खळबळ उडाली असली तरी सर्वसामान्यांच्या भावना टाटांनी व्यक्त केल्यामुळे तमाम देशवासीयांनी त्यांना धन्यवादच दिले. या वक्तव्याने टाटांचे उद्योजकीय प्रतिस्पर्धी असलेले अंबानी यांना तर फार मोठा झटका बसला. लोकांच्या नजरेतून अंबानींची प्रतिमा उतरविण्याचे काम टाटांच्या प्रत्येक वाक्याने केले. भारतामध्ये गरीब, श्रीमंत असा भेदभाव काही आजचा नाही. तो पूर्वपार चालत आलेला आहे. कालही सेठजी, सावकार ही मंडळी होती. आजही ही मंडळी कुठे उद्योगपती, कुठे बँकिंग क्षेत्रात तर कुठे राजकारणी बनून बसली आहे. मृत्यूनंतर स्वर्ग मिळावा म्हणून या सेठजी मंडळींनी मोठ्या प्रमाणावर दान-धर्मही केला. परंतु, दानाचा हा पैसा गोर-गरीबांच्या लुटीतून आलेला होता. याच मंडळींच्या शानशौकिन जगण्याने सर्वसामान्यांच्या मनात त्यांच्याविषयी आपुलकी तर निर्माण झाली नाहीच, उलट त्यांचा तिरस्कार समाज करत आला आहे. गरीबांच्या झोपडीतील दैन्य दूर करण्यासाठी या उच्चभ्रू, गर्भश्रीमंत मंडळींनी कधीही पुढाकार घेतल्याचे दिसून आले नाही. काही समाजाशी नाळ जोडून असलेली मंडळीही असतीलही, परंतु त्यांची संख्या बोटाच्या कांड्यावर मोजण्याइतपतच होती. आमच्याकडे पैसा आहे तर तो आम्ही चैनीवर खर्च केला तर बिघडते कुठे, असा प्रश्न ही मंडळी नेहमीच विचारत आली आहे. समाजातील केवळ दोन टक्के लोकांकडे ९८ टक्के लोकांचा पैसा एकवटला असल्यानेच या मंडळींची ही मानसिकता बनली. रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष व उद्योगपती मुकेश अंबानी यांचीदेखील हिच धारणा झाली असून, त्यांनी त्यांचा ऍण्टिलिया हा महल ज्या भागात बांधला आहे, तो भाग झोपडपट्टी परिसराने वेढलेला असून, धारावी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी त्यांच्या २७ मजली आलिशान घराजवळ आहे. या झोपडपट्टीतील दैन्य या अब्जावधींच्या घरातून अंबानींना दिसत नाही का हाच रोकडा सवाल, ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी उपस्थित केला होता. मुंबई हे एक असे शहर आहे, ज्या शहरात एका खोलीत पाच ते सहा लोकांना त्यांचा संसार चालवावा लागतो. तर दुसरीकडे मुकेश अंबानीसारखा माणूस आपल्या छोट्या कुटुंबाला घेऊन २७ मजली इमारतीत राहतो. याच इमारतीत जलतरण तलाव तसेच हेलिपॅडसह सर्व शानशौकिच्या सुविधा आहेत. अब्जावधी रुपयांच्या या महालाचे सौंदर्य आजुबाजूच्या झोपडपट्टीवासीयांच्या मनात काय भावना निर्माण करत असेल, याचा विचार कधी मुकेश अंबानी यांनी केला नाही. परंतु, हा विचार मात्र रतन टाटा यांनी बोलून दाखवला आहे. भारतातील ८३.२६ कोटी नागरिक दररोज २० रुपयेदेखील कमाई करू शकत नाहीत, असे दुर्देवी चित्र असताना, आणि या नागरिकांच्या जीवनात पाणी, वीज, शिक्षणासारख्या मूलभूत सुविधादेखील पुरवणे शक्य होत नसताना, अंबानीसारख्या पैशाची उधळपट्टी करणार्या मंडळींनी गरिबांच्या किमान प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. अंबानी यांच्या महालाचे महिन्याचे वीज बिल तब्बल ७० लाख रुपये येते, तर देशातील ७ कोटी नागरिकांना अद्यापही विजेची सुविधा मिळू शकलेली नाही. मुंबईला पाणीटंचाईच्या झळा पोहचत असताना, अंबानीच्या ऍण्टिलिया या महालात पाण्याची मोठ्या प्रमाणात उधळपट्टी होत असल्याच्या पार्श्वभूमिवर नुकतेच काही सामाजिक संघटनांनी निदर्शने करून या महालाला पाणी कमी पुरवण्याची मागणी केली होती. मुंबईतील अब्जाधीशांच्या घरात धो धो पाणी वाहत असताना दुसरीकडे मात्र हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. वीज, पाणी यांची सुविधा रोख पैसे मोजून घेणार्या श्रीमंत मंडळींना याच सुविधा गरिबांना प्राप्त करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा वाटत नाही, हेच या देशातील भारत व इंडिया या दोन भागातील फरक ठळकपणे मांडणारे वास्तव आहे. देशातील आर्थिक विषमतेला केवळ अंबानी हेच जबाबदार आहे, असे म्हणता येणार नाही. देशातील तमाम उद्योजकीय घराणे, अब्जाधीश या विषमतेला जबाबदार आहेत. एखादे रतन टाटा, किंवा अजीम प्रेमजीसारखे उद्योगपती त्याला अपवाद असू शकतील. नारायण मूर्ती, टाटा किंवा प्रेमजी या मंडळींनी उत्तम व्यवसाय करून कोट्यवधी रुपये कमावले असतील, परंतु शिक्षण, आरोग्य सुविधा आणि दारिद्रय निर्मूलनासाठी त्यातील लक्षावधी रुपये खर्च करून आपली देशवासीयांप्रती जुळलेली नाळ कायम ठेवली आहे. अंबानी हे अलिकडे श्रीमंत झालेले घराणे आहे. या घराण्याला श्रीमंती ही सेवेसाठी असते उपभोगून माजण्यासाठी नसते, हे कुणी शिकवायचे हा प्रश्न आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान देण्यापासून ते देशाला औद्योगिक क्षेत्रात प्रगतीपथावर ठेवणार्या टाटा, बिर्ला, बजाज या घराण्यांनी समाजसेवेचा, कल्याणकारी कार्याचा वेळोवेळी वास्तुपाठ तर घालविलाच परंतु, आपल्या साध्या राहणीने देशवासीयांना ते कधीही आपल्यापेक्षा वेगळे वाटले नाहीत. मुकेश अंबानी भलेली त्यांच्या पैशाने शानशौक करत असतील, परंतु त्यांच्या या आलिशान राहणीमानातून देशात विषमतेचा रोग पसरत चालला आहे. या रोगातून क्रांतीची बीजे रोवल्या जातील. उद्या क्रांतीच्या ज्वाला पेटल्या तर अंबांनींचा ऍण्टिलिया जळून खाक व्हायला किती वेळ लागेल?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा