एण्डोसल्फान : बंदीच हवी!




जगातील बहुतांश देशांनी एण्डोसल्फानला त्यांच्या देशाची दारे बंद केली आहेत. पर्यावरण, जैवविविधता आणि मानवी आरोग्य यांना अत्यंत घातक साबीत झालेले हे कीटकनाशक शेजारच्या पाकिस्तान व श्रीलंकेतही फवारले जात नाही. परंतु, भारतीय शेतीला दूषित करणारे हे कीटकनाशक येथील राज्यकर्त्यांच्या देशद्रोही भूमिकेमुळे देशात विकले जात आहे. शेतकर्‍यांना या औषधाच्या दुष्परिणामाची माहिती दिली जात नाही, परंतु वापराचे प्रोत्साहन दिले जाते. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे खिशे भरताना भारतीय शेती उद्ध्वस्त होत असून, शेतकरी शारीरिक, आर्थिकदृष्ट्या कंगाल केल्या जात आहे, हे येथील राज्यकर्ते व एण्डोसल्फानच्या जाहिरातींवर पोसले जाणारे प्रसारमाध्यमे विसरले आहेत. भारतीय शेतीची एण्डोसल्फान ही कधीच गरज नव्हती. येथील पिढीजात सेंद्रीय व नैसर्गिक शेतीच्या प्रयोगांनी चांगली शेती करता येते, त्याचे ज्ञानही शेतकर्‍यांना वडिलोपार्जित आहे. म्हणूनच, केंद्र सरकारने या घातक कीटकनाशकावर तातडीने बंदी आणावी, व ते या देशातून हद्दपार करावे.






मानवी शरीर व पर्यावरणासाठी अत्यंत घातक असलेल्या एण्डोसल्फान या कीटकनाशकावर केंद्राने देशपातळीवर तातडीने बंदी घालावी, या मागणीसाठी तब्बल सात दिवस उपोषणास बसलेले केरळचे मुख्यमंत्री व्ही.एस.अच्युतानंदन यांच्या आंदोलनामुळे या विषयाची गंभीरता आता चव्हाट्यावर आली आहे. बंदीसाठी केरळ सरकारने सर्वोच्च न्यायालयातदेखील याचिका दाखल केली असून, न्यायालयाने केंद्र सरकारला त्यांचे म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे. दक्षिणेतील काही राज्यांसह केरळमध्ये या कीटकनाशकावर अगोदरच बंदी असून, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या दबावाला बळी पडून केंद्र सरकार मात्र या घातक कीटकनाशकावर बंदी घालत नसल्याचे वास्तव आहे. एका राज्याचा मुख्यमंत्री स्वतः उपोषण करतो, असे हे काय प्रकरण आहे, याबाबत सर्वसामान्य शेतकर्‍यांना मात्र फारशी कल्पना नाही, प्रसारमाध्यमेदेखील एण्डोसल्फानचीच बाजू घेत असल्याने लोकांची दिशाभूल होत आहे. एण्डोसल्फान हे अत्यंत घातक असे रसायनिक कीटकनाशक असून, १९५० मध्ये त्याचा सर्वप्रथम शोध लागला. भाजीपाला, फळे, भात, कपाशी, तंबाखू, या पिकांवर हे कीटकनाशक फवारले जाते. फळ व भाजीपाला पिकांत या औषधाचा अंश कायम राहात असल्याने ते मानवी शरीरात जात असून, त्यामुळे असंख्य समस्या निर्माण झाल्या आहेत. सुमारे १५० मानवी आजार या औषधाच्या सेवनामुळे मानवास होत असल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे. मानवी आरोग्य, पर्यावरण, जैवविविधता या सर्वांच्या र्‍हासास अत्यंत घातक असलेल्या एण्डोसल्फानवर जगातील बहुतांश देशांत यापूर्वीच बंदी घालण्यात आलेली असून, त्यामध्ये प्रामुख्याने सिंगापूर, बेल्जिअम, टोंगा, सीरिया, जर्मनी, स्वीडन, फिलिपीन्स, नेदरलॅण्ड, कुवैत, ओमान, कतार, सौदी अरेबिया, आखाती देश, श्रीलंका आणि पाकिस्तान या विकसनशील देशांसह, अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, रशिया यासारख्या विकसित देशांचादेखील समावेश आहे. या कीटकनाशकाचे मानवी शरीरावर नेमके परिणाम तरी काय होतात, हा प्रश्‍न नेहमीच शेतकरी विचारत असतात. मानवाच्या प्रजोत्पादनाच्या संस्थांसह, मानवी मेंदू, यकृत, मज्जासंस्था, मूत्रपिंड या अवयवांवर प्रामुख्याने या औषधाचे दुष्परिणाम दिसून आले असून, सेक्सुअल हार्मोन्स सिस्टिमवर त्याचा सर्वाधिक घातक परिणाम होत असल्याचे प्रामुख्याने सामोरे आले आहे. या घातक परिणामांची कोणत्याही प्रसारमाध्यमांनी किंवा एण्डोसल्फानचा बचाव करणार्‍या तज्ज्ञांनी शेतकर्‍यांना कधीही माहिती दिली नसून, उलटपक्षी ही माहिती त्यांच्यापासून लपवून ठेवण्याचा प्रयत्न झाला आहे. परिणामी, आज आमचे लाखो शेतकरी किडके शरीर घेऊन जगत आहेत. त्यांच्या प्रकृतीवर या कीटकनाशकाचे गंभीर परिणाम उघडपणे दिसून येत आहेत. एण्डोसल्फान फवारलेले औषध भाजीपाला व फळांद्वारे किंवा अन्नधान्यांद्वारे शरीरात जाऊन छातीचा कर्करोग होण्याच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, महिलांना अनेक लैंगिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, या समस्यांचे उत्तर या कीटकनाशकाच्या अतिवापरात दडलेले आहे. एण्डोसल्फान हे दीर्घकाळ जीवंत राहणारे रसायन असल्याने माती, पाणी आणि हवेद्वारे त्याचा प्रसार होतो. अन्नपदार्थातही त्याचे अंश दीर्घकाळ टिकून राहतात. याबाबतच्या काही घटना गत दीड दशकामध्ये जगाने अनुभवल्या आहेत. पहिली घटना उघडकीस आली ती, १९८८ मध्ये इंडोनेशियामध्ये. या कीटकनाशकाचे पिंप वाहत्या पाण्यात धुतले गेल्याने असंख्य मासे मेले व हे पाणी पिण्यात आल्याने तिघे ठार झाले होते. या औषधाच्या घातकपणाकडे या घटनेनंतर जगाचे लक्ष वेधले गेले होते. परत १९९१ मध्ये इंडोनेशियात ३२ माणसे या औषधाने दगावल्याच्या घटना घडल्या. कोलंबियात १९९४ मध्ये सर्वाधिक १५५ माणसे दगावली. १९९३ मध्ये ६० माणसे मेली. याच काळात उत्तर भारतात १९९५ ते १९९७ मध्ये १८ प्रकरणे घडली होती. एण्डोसल्फानच्या घातकतेची लक्षणे दृष्टीपथात येताच अमेरिकेने या कीटकनाशकाच्या दुष्परिणामाबाबत अमेरिकन पर्यावरण सुरक्षा संस्था (इपीए) ला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, हे सर्वाधिक घातक कीटकनाशक असल्याचा सविस्तर अहवाल इपीएने अमेरिकन सरकारला सादर केला होता. त्यावरून नंतरच्या काळात अमेरिकेने या औषधावर बंदी घातली. जागतिक आरोग्य संघटना (डब्लूएचओ)नेदेखील एण्डोसल्फान हे घातक रसायन असल्याचे जाहीर केले आहे. नुकत्याच झालेल्या पर्यावरण विषयक स्टॉकहोम परिषदेतही एण्डोसल्फानवर चर्चा घडून आली व मानवी आरोग्य, पर्यावरण व जैवविविधतेसाठी अत्यंत घातक साबीत झालेल्या या कीटकनाशकावर त्वरित बंदी घालण्याची मागणी झाली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर या कीटकनाशकाबद्दल चिंतेचे वातावरण असताना भारतात मात्र हे कीटकनाशक खुलेआम विकल्या जात आहे. केंद्र सरकार या औषधाला सर्वाधिक पसंती देत असून, येथील शेतकर्‍यांना या औषधाच्या दुष्परिणामाची माहिती न देता, मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देत आहे. १९९५ ते २००० या पाच वर्षात एण्डोसल्फानची १२१८० मेट्रीक टन आयात झाली होती. याच काळात देशात ३५९९ मेट्रीक टन प्रति एकर त्याचा वापर झाला होता. गेल्या ११ वर्षाच्या काळात या कीटकनाशकाचा दुप्पटीने वापर वाढला असून, कीटकांच्या नाशासाठी शेतकर्‍यांची या औषधाला सर्वाधिक पसंती आहे. परंतु, या औषधामुळे होणारे घातक दुष्परिणाम शेतकर्‍यांना माहित नाहीत.



रोगापेक्षा इलाज....



शेतकरी पिकांवरील किडींच्या समुळ नाशासाठी एण्डोसल्फानचा वापर करतात. परंतु, शेतकरी बांधवांना रसायनिक कीटकनाशकांपेक्षा नैसर्गिक व सेंद्रीय पर्याय उपलब्ध करून देण्यात सरकार नेहमीच टाळाटाळ करत असते. हे पर्याय दिले तर कमी खर्चाची शेती शेतकरी करतील. पर्यायाने बहुराष्ट्रीय कंपन्यांचे उत्पन्न बुडेल व निवडणुका लढविण्यासाठी विविध राजकीय पक्षांना मिळणारा काळा पैसा बुडेल, असे यामागचे आर्थिक गणित आहे. वास्तविक पाहाता, झाडांमध्ये नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली तर कोणत्याही कीटकनाशकाची गरज पडत नाही. यासंदर्भात झीरो बजेट शेतीचे प्रणेते सुभाष पाळेकर यांचे मागदर्शन अत्यंत प्रभावी असे आहे. एण्डोसल्फानपेक्षा दशपर्णी अर्क किंवा अग्निअस्त्र ही नैसर्गिक कीटकनाशके अत्यंत प्रभावी आहेत, असे पाळेकर सांगतात. शिवाय, ही कीटकनाशके तयार करण्यासाठी कोणताही खर्च येत नाही. शेण, गोमूत्र आणि शेताच्या बांधावरील वनस्पतींच्या साहाय्याने ही कीटकनाशके तयार करता येतात. शिवाय, रोगकारक किडींच्या नाशासासाठी मित्र किडींचा वापर करणे, कामांध सापळे लावणे यासारखे सोपे उपाय केल्यास पर्यावरण पुरक व कमी खर्चाची शेती करता येते. भारतातून दरवर्षी ५४ लाख कोटी रुपये रसायनिक खते, कीटकनाशके, शेती तंत्रज्ञान व रसायनिक शेतीतून निर्माण झालेल्या १५० आजारांच्या ऍलोपॅथिक औषधांपोटी विदेशात जात असतात. नैसर्गिक व सेंद्रीय शेती केल्यास देशातला हा पैसा देशातच राहिल, व प्रगतीसाठी वापरता येईल, असे निरीक्षणही पाळेकर हे नोंदवतात. भारतीय शेतीसाठी एण्डोसल्फान हा कधीच पर्याय नव्हता. मानवी आरोग्यासह पर्यावरणास घातक असलेले हे कीटकनाशक रोगापेक्षा इलाज भयंकर असे आहे. म्हणूनच, केंद्र सरकारने या कीटकनाशकावर तातडीने बंदी आणलीच पाहिजेत, त्यासाठी आता जनआंदोलन उभे झाले पाहिजे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खसखसच्या शेतीचे वास्तव!