देशाचे नाक कापले!





पाकिस्तान पोशित दहशतवाद ही भारतासमोरची सर्वात मोठी समस्या आहे. भारतात देशद्रोही कृत्येकरून दाऊद इब्राहिम आणि त्याची पिलावळ पाकिस्तानात सुखनैव जगते. भारतीय राज्यकर्ते मात्र त्यांना पकडून आणण्याची घोषणा करत, मते लाटण्याचे काम करत आले आहेत. अमेरिकेने पाकिस्तानात घुसून, त्यांच्या सार्वभौमत्त्वाची ऐशीतैशी करत ओसामा बिन लादेनचा खातमा केला. अशी हिंमत भारत हा दाऊद किंवा हाफिज सईदच्या बाबतीत दाखवेल काय? या प्रश्‍नाचे उत्तर नकरार्थी येत असतानाच, मोठा गाजावाजा करत ५० मोस्ट वॉण्टेड गुन्हेगारांची यादी भारताने पाकिस्तानला सोपावली होती. या यादीतील तिघे भारतातच निघाले असून, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नाक कापल्या गेले आहे. या देशातील सुरक्षा यंत्रणा, गुप्तचर आणि पोलिस दल यांच्यातील असमन्वयामुळे भारत दहशतवाद रोखण्यासाठी किती तत्पर आहे, याचा जगाला प्रत्यय आला. या यंत्रणांच्या देशद्रोहामुळे भारताच्या प्रतिमेला बट्टा लागला असल्याने त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून देशाचे गृहमंत्री पी. चिदंबरम् आणि राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील हे राजीनामा देतील का?..


ओसामा बिन लादेन याच्या खातम्यानंतर पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढत आहे. हा देश दहशतवाद्यांसाठी नंदनवन झाला असून, पाकने आता तरी दहशतवाद पोसणे सक्तीने थांबवावे, अशा इशारा नुकताच अमेरिकेने दिला होता. या पार्श्‍वभूमिवर भारतानेदेखील पाकला दम भरत ५० मोस्ट वॉण्टेड गुन्हेगारांची यादी सोपावित, हे गुन्हेगार ताब्यात द्या, असा इशारा पाकिस्तानला दिला. भारत हा भित्रा आणि दुबळा देश असल्याचे चांगलेच माहित असल्याने पाकिस्तानने मात्र या यादीकडे नेहमीप्रमाणे कानाडोळा केला. अमेरिकेने पाकिस्तानात घुसून लादेन मारल्यानंतर, भारताला असे काही करायची खुमखुमी आली नाही तर नवल! तेव्हा, भारताच्या लष्करप्रमुखांनीदेखील दाऊद किंवा २६/११ हल्ल्यातील दहशतवाद्यांना पकडण्यासाठी आम्हीही पाकिस्तानवर हल्ला करू शकतो, अशी मुर्दुमकी गाजविली. परंतु, तिकडून येऊन तर पाहा, फार महागात पडेल, असा दम देत आम्हीच भारतात हल्ल्याची तयारी पूर्ण केली आहे, असा इशारा आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचे प्रमुख शुजा पाशा यांनी देताच, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना तातडीने सुरक्षा यंत्रणांची बैठक घ्यावी लागली. मुंबईवरील साखळी बॉम्बस्फोट आणि इतर गुन्ह्यांत कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम हा भारताला हवा आहे. शिवाय, लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेने मुंबईवर २६/११ चा हल्ला केल्यानंतर या संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद यासह अनेक गुन्हेगार भारताला हवे आहेत. हव्या असलेल्यांपैकी ५० गुन्हेगार हे पाकिस्तानात दडलेले असल्याचा भारताचा आरोप असून, त्यांना तातडीने भारताच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी भारताने सचिवस्तरीय बैठकीत पाकिस्तानकडे केली होती. शिवाय, लादेनच्या खातम्यानंतर ही यादी पुन्हा एकदा पाकिस्तानकडे सोपावित; हे गुन्हेगार ताब्यात द्या, अन्यथा परिणामांना सामोरे जा, असा इशारा पाकिस्तानला दिला होता. आता या यादीवरूनच भारत हा पाकिस्तानसमोर सपशेल तोंडघसी पडला आहे. शिवाय, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या गुप्तचर तसेच तपास यंत्रणांची अक्षरशः छी थू होत आहे. ज्या ५० गुन्हेगारांची यादी भारताने पाकिस्तानला दिली होती, त्यामध्ये ४१ वे नाव हे वझहुल कमर खान या गुन्हेगाराचे होते. २००३ मधील मुलुंड येथील रेल्वे बॉम्बस्फोट आणि मुंबईतील इतर बॉम्बस्फोटात तो आरोपी आहे. यापूर्वी त्याला अटक झाली होती. परंतु, जामीनावर सुटल्यानंतर तो ठाणे येथे कुटुंबासह राहात आहे. तेथे तो अंड्याचे दुकानदेखील चालवत असून, महाराष्ट्रातील दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) त्याचा पत्ता माहित आहे. तसेच, या पथकाची त्याच्या हालचालीवर बारिक नजरदेखील आहे. रेल्वे बॉम्बस्फोटानंतर वझहुल हा फरार झाला होता. परंतु, तो पाकिस्तानात गेला नव्हता. मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशात तो विविध ठिकाणी लपत राहिला. २०१० मध्ये एटीएसने अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याला अटक केली व त्याच्यावर खटलादेखील भरला. सध्या तो या खटल्याला सामोरे जात आहे. वेळोवेळी तो न्यायालयात हजर राहत असून, या प्रकरणातून बाहेर पडू, असे त्याला वाटते. परंतु, केंद्रीय गृहमंत्रालयाने त्याला जेव्हा फरार घोषित केले, तेव्हा त्याच्यासह त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला. पाकिस्तानला दिलेल्या मोस्ट वॉण्टेड यादीत वझहुल याचे नाव असल्याने त्याने प्रसारमाध्यमांसमोर येऊन, आपण पाकिस्तानात नाही तर भारताच आहोत, आणि कधीही पाकिस्तानात गेलो नाही, असा खुलासा केला. त्याच्या या खुलाशाने देशाचे गृहमंत्रालय तोंडावर आदळले. तसेच, या देशातील गुप्तचर यंत्रणा (आयबी), विशेष तपास पथक (सीबीआय), राष्ट्रीय तपास एजन्सी (एनआयए) आणि महाराष्ट्र पोलिस दल यांच्या गलथान कारभाराचासुद्धा पर्दाफाश झाला. या यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याने भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर छी थू झाली. पाकिस्तानला तर भारतावर आरोप करण्यास आयतेच कोलित मिळाले. भारताच्या दमबाजीतील आयतीच हवा निघाल्याने पाकिस्तान मनोमन खुश झाला असेल. वझहुल भारतातच सापडल्यानंतर देशाचे गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी मोठ्या आवेशात घोषणा केली, की एक नाव चुकीचे निघाले असले तरी इतर ४९ नावे बरोबर आहेत. तेव्हा उर्वरित ४९ गुन्हेगारांना पाकने भारताच्या ताब्यात द्यावे. चिदंबरम् यांची ही घोषणा शिळी होत नाही तोच आणखी दोन नावे अशी निघाली, की ते भारतात आहेत. फिरोज अब्दुल खान ऊर्फ हामजा हा आरोपी तर १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात ऑर्थर रोड कारागृहात शिक्षा भोगत आहे. आणखी एक आरोपी राजकुमार मेघेन हा राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीच्या (एनएआय) ताब्यात आहे. काखेत कळसा आणि गावाला वळसा म्हणतात, तो प्रकार चिदंबरम् यांच्या बाबतीत घडला. पोरकट बयाणबाजी करणार्‍या गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी केवळ स्वतःचीच लाज घातली नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचेसुद्धा नाक कापून घेतले आहे. प्रसारमाध्यमांनी आणि विरोधी पक्षांनी याप्रश्‍नी जोरदार आवाज उठविल्यानंतर, सीबीआय तसेच केंद्रीय गृहमंत्रालयाने मोस्ट वॉण्टेड यादीच रद्द करून या आरोपींची नावे हटविली आहे. दहशतवादाप्रती भारत किती गंभीर आहे, याची प्रचिती यानिमित्ताने आंतरराष्ट्रीय समुहाला आली असून, दहशतवाद रोखण्यासाठी काय करावे, याचा शहाणपणा जगाला शिकवणार्‍या भारताचेच पाय मातीचे निघाले. मुंबईवरील २६/११ चा दहशतवादी हल्ला जसा आपल्या गुप्तचर, सुरक्षा यंत्रणा व पोलिसांचे अपयश होते, त्याचप्रमाणे चुकीची यादी पाकिस्तानला सोपावून या यंत्रणांनी देशद्रोहाचेच पाप केले आहे. केवळ एक दोन अधिकारी घरी पाठविण्यापेक्षा काहीतरी ठोस कारवाई करून या यंत्रणांच्या देशद्रोहाची कोणती शिक्षा केंद्र सरकार त्यांना देणार आहे? किमानपक्षी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे तोंड काळे करण्याची शिक्षा म्हणून, गृहमंत्री पी. चिदंबरम् व राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील आपल्या पदाचा राजीनामा देण्याची नैतिकता तरी दाखवतील काय?, हा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खसखसच्या शेतीचे वास्तव!