तीन लाकडे, ११ माकडे आणि आम्ही सारे!
विनाश काय असतो हे पाहायाचे असेल तर जपानकडे पाहावे, नियती किती क्रूर असते याचे दुर्देवी उदाहरण सध्या जपानपेक्षा दुसरे देता येणार नाही. जपानमध्ये काय सुरू आहे, हे आम्हा सर्वांना माहित आहे. तेथील जनतेवर, तेथील माणसांवर काय आपत्ती कोसळली आहे, हेदेखील आम्हाला कळते आहे, परंतु, त्यांच्या वेदनांनी आमच्यापैकी किती जणांच्या डोळ्यात पाणी आले असेल, किती जणांच्या हृदयात तेथील थरकाप पाहून कारुण्य दाटून आले असेल याचे उत्तर बहुतांश मंडळी नकरार्थी देतील. जपानवर एवढी भीषण नैसर्गिक आपदा कोसळून, त्या देशात अक्षरशः मृत्यू थैमान घालत असताना, जपानी माणूस मदतीसाठी दयेची हाक मारत असताना, तथाकथित विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा निलाजरा तमाशा बघण्यात आम्ही सर्व मश्गूल आहोत. या देशद्रोही क्रिकेटने आमच्या संवेदना बोथट केल्या असून, आमच्यातले माणूसपण हरवले आहे काय, असा जीवाला खाणारा सवाल मनात निर्माण होतो आहे. एकाही घरात जपानच्या आपत्तीवर चर्चा होत नाही, मात्र क्रिकेटवर तासंतास गप्पा होतात. गत शनिवारी भारत हरला त्याचे काय म्हणून भारतीयांनी दुःख करून घेतले. आमच्या घरातला बाप किंवा माय मेली, की काय अशी आमची अवस्था झाली होती. परंतु, जपानमध्ये हजारो मेले त्याचे आम्हाला सोयरसूतक नाही, आमच्या या असंवेदनशीलतेला काय म्हणावे? खरे तर जपानवर कोसळलेले हे नैसर्गिक संकट एकटे त्या देशाचे समजता कामा नये, तर सर्व जगाने त्या देशाच्या शोकात सहभागी व्हायला हवे. भारताने तर या देशाचे अर्धे दुःख वाटून घ्यायला हवे. कारण, जपान केवळ भारताचे मित्र राष्ट्रच नाही तर भारताच्या उभारणीत मोलाची साथ देणारे राष्ट्र आहे. रस्ते विकास, पर्यटन आणि औद्योगिक विकासात परतफेडीची अपेक्षा न ठेवता या देशाने भारताला मदतीचा हात दिला. धर्म आणि संस्कृतीच्या बाबतीत तर जपान आपल्या पाठच्या भावासारखा आहे. बुद्ध धर्म आणि बौद्ध तत्त्वज्ञान हे दोन्ही देशांना जोडणारे समान दुवे आहेत. अशा परिस्थितीत जपान आपत्तीने खचला असताना आम्ही विश्वचषक स्पर्धेचा आनंद निर्लज्जपणे घेतो तरी कसे? जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, महावीर जैन आणि महात्मा गांधींसारख्या थोर महापुरूषांना जन्म देणार्या भारताने यावेळी जपानी बांधवाच्या साहाय्याला धावून जात, जगासमोर आदर्श ठेवायला हवा. त्यांच्या मदतीसाठी शाळकरी मुले, महाविद्यालयीन युवक-युवतींपासून ते सर्वच जणांनी मदतफेरी काढून मदत गोळा करायला हवी, त्यांना हवे ते पाठविण्यासाठी गावागावातून मदत जमा करायला हवी, परंतु असे काहीही न करता आम्ही टीव्हीच्या डबड्यात डोके घालून क्रिकेटचा तमाशा पाहात बसलो आहोत. नाही मदत गोळा करणे किमान एखाद्या चौकात एकत्र येऊन आम्ही सामूहिक आदरांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम तरी घेतला आहे का? जपानमधील मृतकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी चौकात गोळा झालो तर तिकडे एखादे षटक तर संपणार नाही, एखादा चेंडू षट्कार तर ठरणार नाही, तो हुकायला नको ना, अशी आमची दळभद्री मानसिकता झाली आहे. खरे तर क्रिकेट हा देशद्रोही खेळ असून, त्याने आमचे श्रम, वेळ आणि संपत्ती यांचा अपव्यय होतो. भारतीयांना माणसुकीपासून, कर्तव्यापासून, देशापासून तोडणारा, सट्टेबाजीच्या नांदाला लावणारा क्रिकेट हा खेळ या देशातून हद्दपार होणे म्हणूनच अत्यंत अवश्य आहे. जी प्रगत राष्ट्रे आहेत, ते असल्या देशद्रोही खेळाला महत्त्व देत नाहीत. अमेरिका, रशिया, जपान, चीन यासारखी राष्ट्रे क्रिकेट खेळत नाहीत. क्रिकेट हा ब्रिटिशांच्या गुलामांचा खेळ आहे. गोर्या साहेबांनी गुलामांना लावलेला तो छंद आहे. या खेळाच्या नांदी लागून प्रतिष्ठीत आणि श्रीमंत राष्ट्रे वेळ आणि पैसाही गमावत नाहीत. तेव्हा क्रिकेटचे भूत डोक्यातून काढून भारतीयांना जपानच्या दुर्घटनेप्रकरणी संवेदनशील करण्यासाठी आता सर्वसामान्य, सुजाण, संवेदनशील नागरिकांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे. ज्यांना तीन लाकडे आणि अकरा माकडांच्या क्रिकेट या खेळातील निरर्थकतेची जाणीव आहे, अशा सर्व भारतीयांनी पुढे होऊन जपानमधील मृत्यूच्या थैमानाच्या पृष्ठभूमीवर सुरु असलेल्या निर्लज्ज तमाशास विरोध करायला हवा आणि आपले जे देशबांधव या तमाशाच्या नशेत चूर झाले आहेत, त्यांना जागे करण्याचा प्रयत्न करायला हवा. दुसर्याच्या दुःखात सहभागी होणे ही आमची संस्कृती आहे. क्रिकेटच्या तमाशापेक्षा एक दिवस एकत्र येऊन आम्ही जपानमधील त्या दुर्देवी मृतकांना किमान श्रद्धांजली तरी वाहू या!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा