पवारांची नाराजी : कॉंग्रेसला किंमत मोजावी लागेल!
मराठ्यांचा अपमान करण्याची दिल्ली दरबाराला खोडच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतही औरंगजेबाने तसा प्रयत्न केला होता. परंतु, आमचा हा राजा केवळ भरदरबारात औरंगजेबाला लाथाडून थांबला नाही; तर कडेकोट नजरकैदेतून सुटून औरंगजेबाचे नाकही कापून टाकले होते. शरद पवारांच्या बाबतीतही कॉंग्रेस असेच काही करु पाहात आहे. परंतु, छत्रपतींचा वारसदार असलेला हा नेता कॉंग्रेसची जिरवण्यास समर्थ आहे. पक्ष लहान आहे म्हणून ज्येष्ठता आणि अनुभव यांचा विचार न करता, कॉंग्रेसमधील काही सडके आंबे पवारांचा ‘नंबर गेम’ करण्यास टपले आहेत. पवारांचे राजकारण आणि पवार नाराज झाले, की काय घडते हे लवकरच कॉंग्रेसवाल्यांना कळेल. पवारांच्या नाराजीची फार मोठी किंमत कॉंग्रेसला चुकवावीच लागेल!.....
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची नाराजी काय असते हे दिल्लीश्वरांना चांगलेच माहित आहे. नाराजीनंतर पवार काय करतात, हे महाराष्ट्रातील राजकीय धुरीण जाणून आहेत. परंतु, दुर्देवाची बाब अशी, की दिल्लीश्वर नेहमीच महाराष्ट्राचा घोर अवमान करत आले आहेत. दिल्लीचे तख्त काबिज करणे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ध्येय होते. दुर्देवाने वेळेअभावी आपला राजा ते तख्त काबीज करु शकला नाही. तरीदेखील एक ना एक दिवस दिल्लीचे तख्त ताब्यात घेऊच हा मराठ्यांचा पण आहे. हा पण शरद पवारांच्या रुपाने पूर्ण होईल, अशी आशा मराठ्यांना आहे. दुर्देवाने अद्यापतरी हे स्वप्न फलद्रूप होऊ शकले नाही. देदिप्यमान इतिहास घडविणारे मराठे हे स्वप्न निश्चितच नजीकच्या काळात पूर्ण करतील, यात काहीही संदेह नाही. हा विषय येथे रेखटण्याचे कारण अत्यंत स्पष्ट आहे. कॉंग्रेस हे जळते घर आहे, असे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. याच जळत्या घराकडून शरद पवारांना डागण्या टोचण्याचे काम केले जात आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठनेते प्रणव मुखर्जी राष्ट्रपती भवनाकडे वाटचाल करु लागताच, त्यांच्याऐवढी ज्येष्ठता असल्याने पवारांना केंद्रीय मंत्रिमंडळात पंतप्रधानांखालोखाल स्थान मिळणे अपेक्षित होते. हे स्थान काही मागून मिळवावे लागत नाही. आघाडीचा धर्म पाळताना ते आदराने आणि सन्मानाने द्यायचे असते. कॉंग्रेसमध्ये अलिकडे काही मग्रूर आणि अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली माणसे बसलेली असल्याने त्यांनी पवार ज्या पक्षाचे आहेत, त्या पक्षाच्या खासदारांची संख्या मोजावयास काढली. हाताच्या कांड्यावर मोजता येईल, एवढेच खासदार असलेल्या पवारांना इतके प्रतिष्ठेचे स्थान कसे द्यावे? अशा प्रश्नाचा किडा त्यांच्या सडक्या डोक्यात वळवळला. प्रणवदांव्यतिरिक्तच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये पवार हे पंतप्रधानांशेजारी दुसर्या स्थानावर बसले होते. हेच स्थान खटकलेली मंडळी कुजबूज करु लागल्यानंतर पंतप्रधानांनी एका पत्राद्वारे ते स्थान संरक्षणमंत्री ए. के. ऍण्टोनी यांना दिले. ही बाब जिव्हारी लागल्याने शरद पवार दुखावले आहेत. पवार दुखावले, की काय होते, हे कॉंग्रेसला ठावूक नाही असे नाही. लवकरच त्याची प्रचितीही कॉंग्रेसवाले निश्चित घेतील. दिल्ली दरबारात अपमान सहन करण्याची सवय मराठ्यांना नाही. यापूर्वी औरंगजेबाने असा प्रयोग छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केला होता. परंतु, आपला हा लाडका राजा औरंगजेबाचा त्याच्याच भरदरबारात अपमान करुन दरबारातून बाहेर पडला होता, त्याची सरदारकी ठोकारून लावली होती. पुढे शिवाजी व संभाजीराजेंना औरंगजेबाने नजरकैदेत टाकले असता, त्याच्या हातावर तुरी देऊन महाराज कसे पसार झाले, याचा इतिहास मराठी माणूस अगदी बालपणापासून घोकत आला आहे. दिल्लीश्वर अद्यापही मराठी माणसाचा अपमान करण्याचा प्रयत्न करत आहेत. तेव्हा औरंगजेब होता आता त्याची मानस अवलाद तेथे राज्य करत असावी, असा संशय येतो. पवारांच ‘नंबर गेम’ करणे आणि शिवरायांना दरबारात मागील रांगेत उभे करणे दोन्ही घटना सारख्याच आहेत. तेव्हा जे शिवाजीराजेंनी केले तेच आता पवार करत आहेत. कॅबिनेटमधून बाहेर पडून युपीए सरकारला बाहेरुन पाठिंबा ते देत आहेत. वेळप्रसंगी हे सरकार पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळविणे पवारांसारख्या धूर्त, मुरब्बी आणि जाणकार नेत्याला कधीच फारसे अवघड जाणारे नाही. सलग सत्तेवर येत गेल्याने कॉंग्रेसच्या नेतृत्वात मग्रुरी आली. त्यामुळे त्यांनी भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजवून अख्खा देश लुटण्याचा सपाटा लावला. खुद्द सोनिया गांधी यांच्या गुपित विदेशवार्या या कशाच्या द्योतक आहेत? स्वच्छ चारित्र्याचे म्हणून ज्यांचा उदोउदो केला जातो, ते पंतप्रधानही नखशिखांत भ्रष्टाचारात डुंबलेले आहेत, असा आरोप अलिकडेच टीम अण्णांने केला आहे. कॉंग्रेसमध्ये असा एकही नेता नाही, की तो कलंकित नाही. गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीत ज्या काही घडामोडी घडत आहेत. त्या मराठी माणसासाठी फारसा समाधानकारक नाहीत. कॉंग्रेसच्या मग्रुरीवर नाराज असलेल्या शरद पवारांसोबत कॉंग्रेस ‘पॉवर प्ले’चा गेम खेळत आहेत. पवारांना नामोहरम करण्यासाठी त्यातील काही धुरीणांनी खुद्द पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग या पुढे सरसावले आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ‘त्रिसदस्यीय’ फिल्डिंग लावण्याचा सल्ला दिला. त्यामुळे पवार मैदान सोडतील, अशी काहींची अटकळ आहे. परंतु, गेल्या चार ते पाच दशकांत पवारांनी मैदान सोडल्याचे उदाहरण नाही. येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कोण मैदान सोडतो, हे पवार दाखवून देतील, हा मराठी माणसाचा विश्वास आहे. राजधानीत रंगलेल्या या ‘पॉवर गेम’चा निकाल आता सोमवारपर्यंत पुढे ढकलला गेला. सोमवारी तो निश्चित लागेल. आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राष्ट्रवादीने आखलेली ही रणनीती असल्याचे मानले जात असले तरी, त्यात तथ्य नाही असे म्हणता येणार नाही. शेवटी पवारांचे राजकारण जाणीले कुणी? त्यामुळेच कदाचित पवारांची नाराजी दूर करण्यासाठी स्वत: पंतप्रधान डॉ. सिंग आणि कॉंग्रेस पक्षाध्यक्षा गांधी यांनी पवारांची गाठभेट घेतली. या भेटीत पवारांनी आपल्या नाराजीचे मुद्दे उपस्थित केल्याचे समजते. त्यामुळेच या भेटीनंतर ‘पवार हे ज्ञानी आणि महत्त्वाचे सहकारी आहेत,’ असे प्रशस्तीपत्र पंतप्रधानांनी देऊन टाकले. खरेतर यासंदर्भात पवारांनी गुरुवारीच पंतप्रधानांना एक पत्र पाठवले होते. त्यात मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचे संकेत दिले होते. कॉंग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार मनमानीपणे कारभार करीत असून, घटक पक्षांना विश्वासात घेतले जात नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. सध्या तरी शरद पवारांसारख्या जाणत्या आणि मुरब्बी नेत्याच्या या नाराजीचे दोन अर्थ काढता येतील. एक तर कॉंग्रेस केवळ जळते घरच नाही तर आता बुडते जहाजदेखील ठरते आहे. तेव्हा जहाज बुडत असताना त्यात थांबणे म्हणजे शुद्ध मुर्खपणा ठरेल. दुसरे असे, की मराठी माणसाला कमी लेखण्याचा जो उपजत गुण कॉंग्रेसमध्ये आहे, ती खोड एकदाची मोडली पाहिजेत, असा विचार पवार करत असले पाहिजेत. पवारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष मजबूत करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच, पवारांचे आगामी राजकारण कोणते असेल याचे संकेत मिळतात. या संकेताच्या आधारेच आम्ही काही भाकित करत आहोत. नजीकच्या काळात महाराष्ट्रातील सत्तेतून कॉंग्रेस हद्दपार झालेली असेल. दिल्लीतही कॉंग्रेसचे तख्त विरोधकांनी फोडून फेकलेले दिसेल. पवार नाराज होतात म्हणजे काय होते, याचा अनुभव लवकरच कॉंग्रेसला येईल!
पूर्वप्रकाशन : दैनिक देशदूत, रविवार दि. २२ जुलै २०१२

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा