हल्ला नव्हे; अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला!

विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे लोकशाहीला बळकट करणारे प्रभावशाली शस्त्र आहे. भारतीय राज्यघटनेने हे स्वातंत्र्य प्रत्येक भारतीयाला दिले. परंतु, काही जहाल गटांना हे स्वातंत्र्य म्हणजे स्वतःच्या मक्तेदारीला धोका वाटतो. प्रशांत भूषण यांच्यावरील दुर्देवी हल्ला हा याच भावनेतून झाला. भूषण यांचे तथाकथित वक्तव्य भलेही चुकीचे असेल. काश्मीर हा भारताचा अविभाज्य अंग आहे, याबाबत कुणाचेही दुमत असू शकत नाही. परंतु, त्यासाठी भूषण यांच्यावर हल्ला करून मानवतेला काळिमा फासने हे कुठल्या न्यायात बसते. विचारांचा विरोध हा विचारानेच झाला पाहिजेत. त्यासाठी हल्ला हा सर्वथा निंदनीय बाब आहे. दुसरे असे, की या हल्ल्यामागे काही तरी शिजतयं. काश्मीरप्रश्नाचा अहवाल गृहमंत्र्यांकडे सुपूर्त करणे आणि त्याच दिवशी हल्ला होणे हा योगायोग कसा जुळला, याचाही विचार व्हावा. काश्मीरप्रश्नाला वेगळे वळण देण्यासाठीचीही जशी खेळी असू शकते, तसेच टीम अण्णाची शक्ती निरर्थक संघर्षाकडे वळविण्याचीही ही खेळी असू शकते. एक मात्र खरे, भगतसिंगांच्या नावाने हल्ला करणारे माथेफिरु तरुण त्यांचे अनुयाई असूच शकत नाही!
...
सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ज्ञ तथा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे सहकारी प्रशांत भूषण यांच्यावर सर्वोच्च न्यायालयातील त्यांच्याच कक्षात भगतसिंग क्रांती सेना या क्षुल्लक संघटनेच्या काही माथेफिरू तरुणांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्याचे कुणीही समर्थन करणे योग्य ठरणार नाही. माथेफिरु तरुणांनी हल्ला केला तेव्हा भूषण हे एका इंग्रजी वृत्तवाहिनीला मुलाखत देत होते. हल्ल्यामागचे कारण भूषण यांचे काश्मीरविषयक तथाकथित वादग्रस्त वक्तव्य असल्याचे सांगितले गेले. प्रशांत भूषण काही दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये जनमत घेण्याबाबत बोलले होते. तसेच, काश्मिरी जनतेला स्वतंत्र होण्याची इच्छा असेल तर तेथून सैन्य मागे घेण्यास काही हरकत नाही, असेही ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून या माथेफिरु तरुणांचे पित्त खवळले आणि हा अमानुष हल्ला झाला असा हा सारा मामला आहे. भूषण यांच्या म्हणण्यानुसार हल्लेखोर हे श्रीराम सेना या हिंदुत्त्ववादी संघटनेचे कार्यकर्ते होते तर संबंधित माथेफिरु तरुणांनी ते भगतसिंग क्रांती सेना या संघटनेचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले. फेसबुकवरदेखील त्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत, कुणी माझा देश तोडण्याचा प्रयत्न केला तर त्याचे डोके फोडण्यात येईल, अशी प्रतिक्रिया नोंदवली होती. भूषण यांच्यावरील या हल्ल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असली तरी काही प्रश्न निर्माण झाले आहेत. काल परवापर्यंत कॉंग्रेस, भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी या हल्ल्याचा निषेध केला. टीम अण्णामध्ये तर या हल्ल्यानंतर दुफळी निर्माण झाल्याचे चित्र होते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काश्मीर हा भारताचा अविभाज्य अंग असल्याचे सांगून, बलिदान गेले तरी बेहत्तर काश्मीर पाकिस्तानला जाऊ देणार नाही, असे ठणकावून सांगितले. तसेच, प्रशांत भूषण यांच्या वक्तव्याशी सहमत नाही, असे नीक्षून सांगितले. दुसरीकडे प्रशांत भूषण हे त्यांच्या वक्तव्यावर ठाम होते. किरण बेदी यांनीदेखील भूषण यांच्यापासून अंतर पाळले. भूषण आता टीम अण्णामध्ये राहणार नाही, अशी अटकळ बांधल्या जात असताना अरविंद केजरीवाल यांनी ही शक्यता फेटाळून लावत भूषण हे टीम अण्णाचे अविभाज्य घटक असल्याचे स्पष्ट केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मात्र या दुफळीचा फायदा घेत, त्यांच्या ठाकरी शैलीत टीम अण्णाचे कान उपटले होते. या हल्ल्याचा ठपका कॉंग्रेस ही भारतीय जनता पक्षावर ठेऊ इच्छित असून, दुसरीकडे भाजपने या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत अशा प्रकारचा हल्ला दुर्देवी असल्याची प्रतिक्रिया दिली. काय योगायोग आहे ते बघा! भूषण यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा मुद्दा त्याच दिवशी गरम झाला ज्या दिवशी केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या पत्रकारांच्या पथकाचा काश्मीरविषयक अहवाल केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम् यांच्याकडे सोपविण्यात आला होता. हा अहवाल अद्याप सार्वजनिकही नाही झाला, की हा हल्ला झाला, आणि वातावरणाला कलाटणी मिळाली. अर्थात, ही कलाटणी कुणी हेतुपुरस्सर देण्याचे काम तर केले नाही ना? हा प्रश्न आता निर्माण होतो. प्रशांत भूषण हे हायप्रोफाईल वकील आहेत. अनेक मोठ्या खटल्यांत ते लढलेले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अण्णा हजारे यांचे सहकारी राहिल्याने ते चर्चेत आले असून, प्रसारमाध्यमांचे केंद्रबिंदू ठरलेले आहेत. त्यांच्याबाबतीत काही लोकांचे मतभेद असू शकतात. परंतु, अशा प्रकारच्या दुर्देवी हल्ल्याची कधी परिस्थिती निर्माण झाली नव्हती. त्यामुळे हा प्रश्न उपस्थित होतो, की भगतसिंग यांचे नाव घेऊन अशा प्रकारचे माथेफिरु कृत्य करून युवकांनी काय हासील केले असेल. या युवकांना भडकविण्यासाठी कोणती राजकीय शक्ती सक्रीय झाली, ही बाबदेखील आता पुढे आली पाहिजेत. माथेफिरु हल्लेखोर नक्कीच डाव्या विचारसरणीचे असावेत. परंतु, भगतसिंग केवळ असेम्बलीमध्ये बॉम्ब फोडणारे क्रांतिकारक नव्हते तर त्यांचे नैतिक बळदेखील इतिहासात सुवर्णक्षरांनी लिखित आहे. अटकेपासून वाचण्यासाठी ते पळून गेले नव्हते, कारागृहवास भोगण्यास ते निधड्या छातीने सामोरे गेले होते. भगतसिंग हे लेनिन व कार्ल मार्क्स यांना वाचून प्रेरित झालेले तरूण होते. त्यांचा कल डाव्या विचारसरणीकडे होता. त्यामुळे केवळ वैचारिक मतभेद आहेत म्हणून हल्ला करणारे माथेफिरु तरूण भगतसिंगांच्या विचाराचे अनुयाई अजिबात होऊ शकत नाहीत. अगदी उघड उघड बाब आहे, की या माथेफिरु तरुणांना कोणत्याही प्रकारे प्रसिद्धीच्या झोतात यायचे होते. त्यामुळेच प्रशांत भूषण यांच्या कक्षात प्रसारमाध्यमांचे कॅमेरे हजर असताना त्यांनी हल्ला केला. भारतासारख्या विविधतेने भरलेल्या देशात विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. वास्तविक पाहाता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे लोकशाहीला बळकट करणारे प्रभावशाली शस्त्र आहे. आपले संविधान देशातील कोणत्याही व्यक्तीला आपले विचार प्रगट करण्याचे स्वातंत्र्य देते, त्यामुळेच अनेकवेळा संवेदनशील मुद्द्यावर सामाजिक संघर्षाची स्थितीही निर्माण झाल्याचा इतिहास फार जुना नाही. परंतु, तर्कवितर्क आणि चर्चेतून मध्यममार्ग काढल्या गेले आहेत. अर्थात, काही जहाल आणि जातीय संघटनांना हा मार्ग नको असतो, हेदेखील जगजाहीर आहे. या जहाल संघटना म्हणतील ते खरे मानणारे हे त्यांचे मित्र तर त्यांना विरोध करणारे हे त्यांचे शत्रू अशी भावना त्यांनी करून घेतलेली असते. लोकशाहीतील उदारभावच असल्या संघटनांना ताकद देत असतो आणि त्याचा नेमका गैरफायदा या संघटना किंवा राजकीय पक्ष घेत असतात. याच कारणामुळे प्रखड मत मांडणारे लेखक, कलाकार, समाजसुधारक, राजकीय नेते यांच्यावर या जहाल संघटनांच्या हल्ल्यांना सामोरे जाण्याची दुर्देवी वेळ अनेकवेळा आली आहे. सर्वात दुर्देवाची बाब ही आहे, की समाजानेदेखील या हल्लेखोरांना एक प्रकारे प्रोत्साहनच दिले. समाज त्यांच्याविरुद्ध पेटून उठण्याऐवजी मूग गिळून बसला. या थंडपणाचेच दुष्परिणाम आज भोगावे लागत आहेत. प्रशांत भूषण यांच्यावरील हल्ला हा त्याचाच परिपाक म्हणावा लागेल. कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राखणे हे पोलिस आणि प्रशासनाचे काम आहे. परंतु, समाजव्यवस्था सुस्थितीत ठेवणे हे समाजाचेच काम असते. ही भूमिका देशामधील प्रत्येक नागरिक जो पर्यंत घेणार नाही. तो पर्यंत असले हल्ले होतच राहतील. आज प्रशांत भूषण यांची वेळ होती, उद्या कुणाचाही नंबर लागू शकतो....!
( प्रकाशन : दैनिक देशदूत, दि.१६ ऑक्टोबर २०११)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा