पेरते व्हा! पेरते व्हा!!



पावसाची अवघी दोन नक्षत्रे वाया गेल्याने हतबल झालेल्या बळीराजाला आता काल परवाच्या पुनर्वसूने दिलासा दिला. हा पाऊस आठवडाभर चांगला पडेल, अशी दिलासादायक बातमीही हवामानतज्ज्ञांनी दिली आहे. शेतकरी आजकाल कमालीचा हळवा झाला आहे. जागतिक हवामान बदलाचे कृषिव्यवस्थेवर काय परिणाम होत आहेत, याकडे त्याचे लक्ष नाही. मृग नक्षत्रावर हजेरी लावलेल्या पावसाने नंतर उघडीप दिल्याने तो हतबल झाला. पेरण्या खोळंबल्या म्हणून तो चिंताग्रस्त झाला. ही हतबलता, ही चिंता समजता येण्यासारखी आहे. परंतु, हवामान बदलामुळे पावसाळा पुढे सरकला हे बदलही आता लक्षात घेऊन मनाची तशी तयारी करण्याची दृष्टी आमच्या या सुजाण शेतकर्‍यांना कधी येईल, ते देव जाणे. बरे प्रसारमाध्यमांनी अशा परिस्थितीत प्रबोधन करण्याची गरज असताना, त्यांनीही या गोंधळात भर घालण्याचेच काम केले. त्यामुळे आता कोरडा दुष्काळ पडतो, की काय असे वातावरण राज्यात आणि एकूणच नगर जिल्ह्यात तयार झाले. हमखास पावसाची नऊ नक्षत्रे आहेत. त्यापैकी केवळ दोनच नक्षत्रे वाया गेली. आता परवापासून पुनर्वसू सुरु झाले असून, आणखी सात नक्षत्रे हातात आहेत. पुढचे पुष्य, आश्‍लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा आणि हस्त हे नक्षत्र हमखास पाऊस पाडतातच, असा पूर्वानुभव आहे. पेरण्यांना उशीर झाला असे म्हटले तर कडधान्यांची थोडीफार पिके सोडली तर इतर पिके चांगल्या प्रकारे घेता येऊ शकतात, त्यामुळे खरीप वाया गेला, असा ग्रह शेतकर्‍यांनी करून घेण्याची आवश्यकता नाही. हवामान खात्याने यावर्षी सरासरीइतका पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला आहे, याचा अर्थ पुढील सर्व नक्षत्रे व्यवस्थित बरसणार आहेत. शिवाय, रब्बी हंगामाचीदेखील पूर्तता होईल, असे शुभवर्तमान आहे. आजकाल मोसमी पाऊस हा बेभरवशाचा झाला. त्याला मानवीवंशांची पापे कारणीभूत आहेत. अर्थात, ही पापे म्हणजे आमची दैनंदिन पापे नाहीत तर निसर्गावर कुर्‍हाड उगारण्याचे ते पाप होय. इतर पापांना गंगास्नान हा पर्याय असू शकतो. परंतु, निसर्गावर कुर्‍हाड चालविण्याचा पापाला आता वृक्षरोपणाने, आणि वृक्षसंवर्धनानेच पापमुक्त होता येते. हा बोध घेऊन आता वृक्षारोपणाचा पुण्ययज्ञही हाती घ्यावा लागेल. नगर जिल्ह्यामध्ये तीन टक्केपेक्षा अधिक पेरण्या झाल्या नाहीत. सरासरी ६५ मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नये, असा सल्ला तज्ज्ञ देत असतात. आता तेवढा पाऊस झाला असल्याने, आणि पुढेही चांगल्या पावसाचे संकेत असल्याने विनाविलंब पेरण्यांना सुरुवात करणे हेच बळीराजासाठी शहाणपणाचे ठरेल. पूर्वी पावसाचे संकेत देण्यासाठी चातक नावाचा पक्षी बळीराजांची साथ करत होता. आता हा पक्षीच रानाशिवारातून गायब झाला आहे. तेव्हा, पुढील चांगल्या पावसाचे संकेत पाहाता आम्हीच बळीराजाला पेरते व्हा, असा संदेश देत आहोत. या संदेशासह चांगल्या खरीपासाठी आमच्या शुभेच्छाही देत आहोत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खसखसच्या शेतीचे वास्तव!