हे तर बहुजनांना राजकारणातून संपविण्याचे षडयंत्र!
फोकस/ पुरुषोत्तम सांगळे
स्वतःचे रक्त आटवून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. परंतु, दुर्देवाने हे स्वराज्य पेशवाईच्या हाती पडले. इतिहास सांगतो, की पेशवे शिवाजी महाराजांच्या जीवावर जगले. त्यांनी महाराजांचे स्वराज्य अक्षरशः विकून खाल्ले, त्यांच्या कायम जातीयवादी धोऱणामुळेच महाराजांचे समतामुलक स्वराज्य परकीयांच्या ताब्यात गेले. हा इतिहास येथे नमूद करण्याचे कारण म्हणजे, आधी छगन भुजबळ आणि आता राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याबाबत जे कुटील राजकारण खेळले गेलेे, त्यांना राजकीय जीवनातून संपविण्याचे षडयंत्र रचले गेलेे, त्यामागची मानसिकता ही पेशवाईच्या वारसदारांचीच आहे. यशवंतराव चव्हाण, शरद पवार, गोपीनाथ मुंडे यासारख्या बहुजनांनी आपल्या अथक परिश्रमाने उभा केलेला हा प्रगतशील महाराष्ट्र दुर्देवाने आज पेशवाईच्याच ताब्यात गेला. त्यामुळे भुजबळ आणि खडसे यांसारख्या मातब्बर बहुजन नेत्यांवर गंडांतर आलेले आहे.
-------नागपुरातील रेशीमबागेच्या पेशवाईचे कटकारस्थान बहुजन नेत्यांना राजकीय जीवनातून संपविण्याचे कुटील षडयंत्रच आहे. वास्तविक पाहाता, या पुरोगामी राज्यात धनगर समाजाची ताकद 72 मतदारसंघात आहे. बंजारा समाजाची ताकद 54 मतदारसंघात तर वंजारी समाजाची ताकद 51 मतदारसंघांत आहे. माळी समाजाची ताकद 60 ते 70 मतदारसंघात आहे. 247 मतदारसंघात ओबीसी आणि इतर मतदारसंघात मराठा समाजाची ताकद असताना रेशीमबागेतून सूचवलेला व्यक्ती मुख्यमंत्री होत असेल तर ते या महाराष्ट्राचे दुर्देव आहे. मोदी लाटेत सत्ता मिळालीच आहे तर ती चांगल्याप्रकारे सांभाळावी. डोक्यात वळवळ करणार्या जातीयवादी किड्यांना आवर घालावा. ते सोडून सत्ता हाती येताच आधी छगन भुजबळ आणि आता नाथाभाऊ खडसे यांना राजकीय जीवनातून संपविण्यासाठी या सत्तेचा गैरवापर होत असल्याचे अख्खा महाराष्ट्र पाहतो आहे. महाराष्ट्राचे राजकारण हे सर्वसमावेश आहे. राजकीय यशापयशाची दीर्घ परंपरा या राज्याला आहे. त्यामुळे आज सत्तेत असलेले आणखी दोन - अडिच वर्षानंतर सत्तेत राहणार नाहीत, हेही खरे आहे. तरीदेखील ज्या प्रकारे ओबीसीनेत्यांच्या बदनामीचे कुटील डाव टाकले जातात, ते पाहाता या सरकारच्या पेशवाई मानसिकतेची कीव येते. भुजबळ कुटुंबीयांना राजकीयदृष्ट्या संपविल्यानंतर आता भाजपचे ज्येष्ठ नेते, राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे या कुरघोडीचे शिकार ठरले आहेत. आधी त्यांच्यावर झालेले गंभीर आरोप आणि आता त्यांचा घेतलेला राजीनामा यावरून
त्यांचा राजकीय बळी घेणारी एक शक्ती कार्यरत होती, हे स्पष्ट होते. ती शक्ती कोण? हे नाथाभाऊ आणि भाजपमधील बहुजन नेत्यांनाही माहीत आहे. तरीही कुणी उघडपणे बोलत नाहीत. आज सत्तेवर आलेल्या भाजपला जेव्हा ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत साधी पन्नास मतेदेखील मिळत नव्हती, तेव्हापासून नाथाभाऊ विधिमंडळात काम करत आहेत. खान्देशसह महाराष्ट्रात मोठा जनाधार असलेले ते लोकप्रिय नेते आहेत. स्व. गोपीनाथ मुंडेंनी जशी कधी रेशीमबागेची चाकरी केली नाही, तशी नाथाभाऊंनीही कधी रेशीमबागेला जुमानले नाही. त्यामुळेच राज्यातील ओबीसी समाज नाथाभाऊंच्या पाठिशी उभा राहिला. रेशीमबागेने मुख्यमंत्रिपदी नवखा व्यक्ती दिला, विधानसभेच्या सभागृहात तिसर्या रांगेतून गळा काढणार्या या नेत्याचा आवाज पहिल्या बाकावरील नाथाभाऊंच्या पुढे कधी गेलाच नाही. हीच रेशीमबागेची सल आहे. त्यातच राज्याचा मुख्यमंत्री बहुजन समाजातील हवा होता, हे उघडपणे विधान केल्यानेच नाथाभाऊ हे रेशीमबागेच्या डोळ्यात सलत गेले.
आता जो बदनामीचे अन् नाथाभाऊंचे राजकारण संपविण्यासाठी आटापिटा चालविला आहे, तो याच भावनेतून! पेशव्यांनी ज्याप्रमाणे छत्रपतींचे स्वराज्य कटकारस्थानांनी बुडविले, त्याचप्रकारे पेशव्यांचेच वंशज बहुजन नेत्यांचे राजकारण बुडविण्यासाठी आता टपले आहेत. बहुजनांना अच्छे दिनाचे गाजर दाखवून या आधुनिक पेशव्यांनी राज्याची सत्ता हस्तगत केली. अच्छे दिन तर आलेच नाही, परंतु बहुजन नेतृत्वाला बदनाम करण्याचे काम होत असल्याने राजकीय बुरे दिन मात्र नक्कीच सुरु झाले आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या रांगेत सर्वात पुढे असलेल्या नाथाभाऊंसह पंकजा मुंडे, विनोद तावडे यांनाही अशाचप्रकारे या ना त्या कारणावरून बदनाम करण्यात आले. सगळे फडके काळे केले म्हणजे आपण लावलेला ठिपका उठून दिसेल, असे रेशीमबागेला वाटत असावे. परंतु, तो भ्रम नजीकच्या काळात बहुजन समाज नक्कीच दूर करेल. लाचखोर गजानन पाटील याच्या अटक प्रकरणानंतर नाथाभाऊंच्या जावयाची आलिशान बेकायदा लिमोझीन, त्यांच्या पत्नीच्या नावे घेतलेली जमीन, दाऊद इब्राहिम यांचा फोन, पुणे एमआयडीसी जमीन खरेदीप्रकरण आणि वारंवार आपच्या नेत्या प्रीती मेनन यांच्याकडून सुरू असलेल्या गंभीर आरोपांच्या जंत्री अचानक बाहेर आल्याने अनेकांना अनेक प्रश्न निर्माण होतात. विशेष म्हणजे, ही सर्व प्रकरणे आणि त्यांचा तपास करणारी एसीबीसारखी यंत्रणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकारात असल्याने संशयाची सुई मुख्यमंत्र्यांवरच जात होती. आपला पक्षांतर्गतचा राजकीय प्रतिस्पर्धी संपविण्यासाठी रेशीमबागेच्या मेंदूने फडणवीस हे कपट पूर्णत्वास नेत असावेत, अशी जनभावना आहे. ती खरेच असावी का? हा प्रश्न आहे. नाथाभाऊंवर इतके गंभीर आरोप होत असताना, भाजपचे इतर मंत्री तोंडावर बोट ठेवून होते. हे मंत्री नेमके घाबरतात कोणाला? याप्रश्नी खुद्द सुधीरभाऊ, पंकजा आणि विनोद तावडे यांनीही मिठाची गुळणी धरलेली आहे. चोराच्या मनात चांदणे असल्याप्रमाणे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे सारवासारव करताना दिसले खरे; परंतु राज्य सरकार नाथाभाऊंच्या पाठिशी आहे, असे त्यांनी ठामपणे कधीच सांगितले नाही. उलट ते संदिग्धच बोलत राहिले. नाथाभाऊंची बदनामी प्रादेशिक प्रसारमाध्यमांपेक्षा राष्ट्रीय माध्यमांत जोरात सुरु होती. जेणे करून हा विषय पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या कानावर जात राहील. नाथाभाऊ ही राष्ट्रीय समस्या व्हावी, यासाठी प्रसारमाध्यमांतील पेशव्यांचे वंशज इमाने इतबारे कामाला लागले होते. सत्ता काय आज आहे, उद्या नाही. छत्रपतींचे स्वराज्य बुडविणार्या पेशवाईचा अस्तही अत्यंत दुर्देवी झाला होता. मुंडे-खडसे-फुंडकर, जानकर, मेटे, आठवले अशा नावांनी मते मागून आणि मोदी लाट निर्माण करून सत्तेवर आलेल्या रेशीमबागेने बहुजन नेत्यांना गजाआड पाहण्याचे दिवास्वप्न पाहू नये. पेशवाई बुडाली तेथे फडणवीसी बुडण्यास कितीसा वेळ लागेल. छगन भुजबळ असोत की नाथाभाऊ खडसे यांना राजकीय जीवनातून संपविण्याचे कुटील कपट अन् कारस्थाने पेशवाई मेंदूने त्वरित थांबविणेच त्यांच्यासाठी हितावह राहील. अन्यथा बहुजन समाजाचा उद्रेक त्यांना पेलवणार नाही!

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा