मुंडेसाहेबांचा खून पचणार का?

मुंडेसाहेबांचा खून पचणार का?

.....
भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, केंद्रीय मंत्री तथा बहुजन समाजातील लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या घातपाती निधनानंतर कोट्यवधी बहुजन समाज पोरका झाला. समाजाच्या मनात जे खदखदत होते ते ऍण्टी करप्शन कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र द्विवेदी यांनी प्रसारमाध्यमांपुढे आणले. तीनवेळा मृत्युला सहर्ष परत पाठविणारे मुंडेसाहेब चौथ्यांदा अगदीच अलगद मृत्युच्या तावडीत कसे सापडले? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आला होता. मुंडेसाहेबांचा खूनच झाला असावा अन्‌ हा खून कुणी केला? हेही तमाम बहुजन समाजाला माहित आहे. आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने या घातपाताचा तपास करण्याचे आदेश मुंबई व दिल्ली पोलिस आयुक्तांना दिल्यानंतर सत्य काय ते बाहेर येईल? अशी भाबडी आशा आहे. सीबीआयचा संशयास्पद अहवाल, तपासात ठेवण्यात आलेले कच्चेदुवे आदी बाबी पाहाता, हा घातपात पचविण्यासाठी वरिष्ठस्तरावर पुरेपूर तयारी झाली असावी, अशी शंका मनात येते. दुर्देवाची बाब अशी, की ज्यांचे बोट धरून पंकजा, धनंजय अन्‌ प्रितम हे मुंडेभावंड राजकारणात मोठे झाले. अगदी मंत्री, विरोधी पक्षनेते अन्‌ खासदार झालेत, तीच या घातपाताबद्दल अवाक्षरही बोलत नाहीत, हे पाहून आम्हाला तीव्र वेदना होतात. गावपातळीवर एखादा खून झाला, की त्याचा कसोशीने पोलिस तपास होतो. मृत्यूबाबत उपस्थित केलेल्या शंकांचे समाधान होईपर्यंत तपासकाम चालते अन्‌ आरोपी न्यायदारापुढे उभे केले जातात. परंतु, धक्कादायक बाब अशी, की कोट्यवधी बहुजनांचे लोकनेतृत्व ज्या व्यक्तीने भूषवले. आपले साडेसहा दशकांचे आयुष्य गोरगरिब, दीन-दलित अन्‌ पीडित समाजासाठी खर्च केले, त्या स्व. मुंडेसाहेबांच्या घातपाताबद्दल कुणीही काहीही बोलायला का तयार नाहीत? लोकांच्या मनात ज्या शंका आहेत? रवींद्र द्विवेदी पोटतिडकीने जे सवाल उपस्थित करत आहेत, त्याचे उत्तर मागण्याचे धाडस कुणी का दाखवत नाहीत? ज्या समाजासाठी मुंडेसाहेबांनी खास्ता खालल्यात तो समाजही मुर्दाड झाला का? हा सवाल आम्हाला उद्विग्न करतो. मुंडेसाहेबांचा अगदी ठरवून खून केला गेला, ही जनभावना आहे. ती खरी असावी, असे आम्हालाही वाटते. रवींद्र द्विवेदी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरून जनभावनाच सत्य असल्याचे मनोमन पटते. 2 जूनच्या रात्री मुंडेसाहेब कुठे होते? याच प्रश्नाचे उत्तर समाधानकारक का मिळत नाही? मुंडेसाहेब केंद्रीय मंत्री होते. त्यांच्याबाबतचा राजशिष्टाचार (प्रोटोकॉल) कुठे झक मारत होता? त्यांना लालदिव्याची गाडी नव्हती का? त्यांचे शासकीय अंगसंरक्षक, स्वीय साहाय्यक, शासकीय चालक, पोलिस संरक्षण हे अगदी गायब कसे झाले व कुणी केले? देशाच्या एका केंद्रीय मंत्र्याचे मरण ऐवढे सोपे झाले आहे का? मुंडेसाहेबांचे उभे आयुष्य शरद पवारांशी राजकीय वैर करण्यात गेले. पक्षांतर्गत ते नितीन गडकरी यांचे मोठे राजकीय विरोधक होते. पंतप्रधानपदासाठी जेव्हा नरेंद्र मोदी यांचे नाव संघामताने भाजपने पुढे केले, तेव्हा मुंडेसाहेब ज्येष्ठनेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नावासाठी आग्रही होते. नरेंद्र मोदी यांचा पूर्वेतिहास देशाला माहित आहे. त्यामुळे त्यांच्या नियंत्रणाखाली काम करणारे सीबीआय मुंडे घातपाताची अगदी इमानदारीने चौकशी करेल, यावर अजिबात विश्वास ठेवता येत नाही. सीबीआयचा अहवाल पाहिला तर सीबीआयने माती खाल्ली असेच प्रत्येकाला वाटते. अगदी खेड्यापाड्यात एखाद्याचा खून झाला तर त्याच्या नातेवाईकांना न्याय मिळतो. मग्‌ येथे तर कोट्यवधी बहुजन समाजाचा नेता घातपाती गेला. त्यांचा खूनच झाला असे हा समाज समजतो. रवींद्र द्विवेदींसारखे ज्येष्ठदेखील पुराव्यानिशी याबाबत आवाज उठवित आहेत. तेव्हा मुंडेसाहेबांशी नाते असलेल्या कोट्यवधी बहुजन समाजाला न्याय का मिळत नाही? हा प्रत्येकाच्या मनात खदखदणारा असंतोषजनक सवाल आहे. ‘साहेबांचा काटाच काढल्या गेला हो’! ही भावना खेड्यापाड्यातील प्रत्येकाच्या मनात आहे, ती खरी वाटावी, यासारखे दुसरे दुर्देव तरी कोणते? परत या, परत या, म्हणूनही आता साहेब परत येणार नाहीत. भगवानगड पोरका झाला अन्‌ भगवानबाबादेखील आता समाधीमग्न झाले आहेत. राज्य-दिल्लीच्या सत्तेत, लालदिव्याच्या गाडीखाली तमाम बहुजनांच्या भावना चिरडल्या जात आहेत. द्विवेदी यांनी पोटतिडकीने उठवलेला आवाजही कुणी प्रसारमाध्यमांनी जनतेपर्यंत पोहोचवला नाही. ते काम दैनिक लोकमंथनने अगदी बेडरपणे केले. मुंडेसाहेबांच्या संघर्षाचा, विचारांचा अन्‌ बहुजन समाजाप्रती बांधिलकीचा वारसा आम्हाला तर चालवावा लागणारच आहे. तो आम्ही पुढेही चालवूच! परंतु, मुंडेसाहेबांच्या रक्ताने माखलेली सत्तेची फळे त्यांचे वारसदार मुकाटपणे चाखताना पाहून आम्हाला वाईट वाटते. ही फळे मिळाल्यामुळेच या वारसदारांची तोंडे बंद असून, सत्ताधार्‍यांच्या ‘हो’ ला ‘हो’ म्हणण्याचे काम त्यांच्याकडून होत असावे. परंतु, कोट्यवधी बहुजन समाज सत्य काय ते जाणतो. जे बापाचे होऊ शकत नाहीत ते आपलेही होऊ शकणार नाहीत, असा विचार आता जनतेच्या मनात येऊ लागला आहे. मुंडेसाहेबांचा खूनच झाला का? अन्‌ तो पचणार का? हा काळजात खदखदणारा सवाल बहुजन समाज विचारतो आहे. त्याचे उत्तर काय असेल हे काळच ठरवेल!
(Agralekh/Lokmanthan/28 Dec.2014

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खसखसच्या शेतीचे वास्तव!