भाजपचे 'माधवंम'!
.........माळी, धनगर अन् वंजारी (माधवं) हा ओबीसीतील मोठा जातसमूह सोबत घेऊन स्व. गोपीनाथ मुंडे यांनी राज्यातील सत्तासमिकरणे बदलली होती. सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग राबविताना, तो कमालीचा यशस्वीही करून दाखविला होता. आतादेखील आगामी विधानसभेसाठी रणनीती आखताना भाजप-संघातील चाणक्य माधवंसोबतच त्यात मराठाही मिळविण्याची व्यूहरचना करत आहेत. ती कितपत यशस्वी ठरेल, हे काळाच्या ओघात स्पष्ट होईलच; परंतु मराठा समाज भाजपच्या या भुलभुलय्याला भुलेल का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल!
............आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील सत्ता ताब्यात घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. रा. स्व. संघ अन् भाजपातील चाणक्य सध्या यासंदर्भात चिंतनात मग्न असून, त्यांच्या चिंतनातून तूर्त एक धक्कादायक रणनीती बाहेर पडली. राज्यात सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी राबविला होता. या प्रयोगाचे फलित म्हणजे शेठजी-भटजींचा पक्ष अशी भाजपची असलेली ओळख पुसून तो बहुजन समाजापर्यंत पोहोचला होता. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे अन् स्व. मुंडे-महाजन यांची रणनीती यशस्वी झाल्यानेच राज्यात शिवशाहीची सत्ता आली होती. आतादेखील सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजप-संघाचे चाणक्य माळी-धनगर-वंजारी या आपल्या जुन्या फॉर्म्युल्यात मराठा समाजाला सोबत घेण्याचा प्रयत्न करत असून, या नव्या 'माधवंम' पॅटर्नचा प्रयोग आगामी निवडणुकीत राज्यात होईल. हा नवा पॅटर्न कितपत यशस्वी होईल? याबाबत मात्र प्रश्नचिन्ह कायम आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या दिल्लीतील अपघाती निधनाकडे राज्यातील बहुजन समाज घातपात म्हणूनच पाहात आहे. या घातपातामागची कारणे, आणि सूत्रधार समोर यायला हवा, अशी या समाजाची मानसिकता झाली आहे. जोपर्यंत या संशयास्पद घातपातावरील शंका-कुशंकेचे सावट पूर्णपणे दूर होत नाही; तोपर्यंत बहुजन समाजातील वंजारी समाज तरी या नव्या पॅटर्नमध्ये भाजपसोबत आहे की नाही, याबाबत शंका निर्माण होते. भाजपने मुळात राबविलेला माधवं हा पॅटर्न राजकारणातील मातब्बर मराठ्यांना शह देण्यासाठीच होता. इतर मागासवर्ग (ओबीसी) समाजातील माळी, धनगर व वंजारी हे समाज लोकसंख्येने सर्वाधिक मोठे आहेत. या समाजाच्या एकत्रिकरणातून शिवशाहीने सत्तेचा सोपान चढला होता. आता राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट दिसून आली असली तरी, विधानसभा निवडणुकीत या लाटेचा काही फायदा होईलच, हे निश्चित नसल्याने, भाजपने माधवंला गृहीत धरून त्यात मराठा मिळविण्याची राजकीय व्यूहरचना आखण्याचे ठरवले असावे. हे राज्य ज्यांना जाणते राजे संबोधते ते शरद पवार हे अत्यंत चाणाक्ष अन् मातब्बर असे राजकारणी आहेत. राज्याचा सर्वांगाने खडान् खडा अभ्यास पवारांना आहे. भाजपच्या चाणक्यांचे असले डाव मोडीत काढण्याची त्यांची हातोटी विलक्षण म्हणता येईल. मराठा समाज हा पवारांचा एकहाती मतदार असून, ओबीसीतील छोट्या जातींना नेहमीच पवारांचे आकर्षण राहात आले आहे. सहकार, शिक्षण, कारखानदारी यांच्या माध्यमातून पवारांनी स्वतःची शक्तिस्थाने राज्यात निर्माण केली आहेत. पर्यायाने भाजपच्या चाणक्यांना पवारांच्या रणनीतीला पुरून उरणे नेहमीच अशक्य ठरत आले. आता ज्या माधवंम पॅटर्नचा हिशोब हे चाणक्य मांडत आहेत, त्यात या समाजातील त्या त्या समाजाला चालणारे नेते या पक्षाकडे आहेत का? हा खरा प्रश्न उरतो. लोकसभा निवडणुकीत स्व. गोपीनाथ मुंडे यांनी या पॅटर्नचा प्रयोग केला होता. धनगर समाजाचे महादेवराव जानकर, वंजारी समाजाचे स्वतः मुंडे तर मराठा समाजातील विनायक मेटेंना घेऊन भाजप-शिवसेना महायुती लोकसभेला सामोरे गेली होती. राज्यातील घवघवीत यश पाहाता, हा माधवंम पॅटर्नचा विजय आहे, की नरेंद्र मोदी लाटेचा फायदा झाला, याचे विश्लेषण करणे अवघड ठरेल. असे असले तरी लोकसभेचे प्रश्न वेगळे अन् विधानसभेची गणिते वेगळी असतात. विधानसभेला सामोरे जाताना मोदी लाटेचा फायदा होईलच असे नाही. स्थानिक मुद्दे, स्थानिक पातळीवरील राजकीय समिकरणे, जाती-पातीचे राजकारण या बाबीच महत्वपूर्ण ठरत असतात. भाजपचे चाणक्य मराठा समाजाला सोबत घेण्याचा विचार करत असले तरी, लोकसभा निवडणुकीतील अनुभव मात्र फारसा चांगला नाही. बिडमध्ये स्व. मुंडेंना पाडण्यासाठी 'वाजवा तुतारी, अन् पाडा वंजारी' ही घोषणा देणारे कोण होते? अशीच घोषणा नाशिकातही छगन भुजबळांच्याविरोधात देण्यात आली होती. तिकडे 'द्या टाळी अन् पाडा माळी' ही घोषणा चालली. मोठ्या संघर्षाने बिडमधून मुंडे विजयी झाले खरे; परंतु नाशिकात भुजबळ मोठ्या मताधिक्क्याने पडले. भुजबळांना 'जागा दाखविण्यात' आली, अशी प्रतिक्रिया व्यक्त करणारे कोण होते? माळी असो, धनगर असो की वंजारी असोत, हे जातसमूह ओबीसीवर्गातील बहुसंख्य घटक आहेत. मंडल आयोगानुसार ओबीसींची आकडेवारी ५२ टक्के ऐवढी आहे. म्हणजेच समस्त ओबीसींनी एकगठ्ठा मतदान केले तर राज्याचा मुख्यमंत्री ओबीसीच राहील. परंतु, तसे होत नाही. हिंदू ओबीसीत बलुतेदार हे जसे घटक आहेत; तसेच मुस्लीम, खिस्ती, जैन व शिख हे अल्पसंख्यांक समूहदेखील ओबीसींत आहेत. हा जातसमूह वेगवेगळ्या पक्षाचा पक्का मतदार असून, ओबीसींच्या मतांचे ध्रुवीकरण हेच ओबीसींच्या राजकीय पिछेहाटीचे मूळ कारण आहे. मुंडे, भुजबळ हे नेतृत्व मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचू शकत नाही, त्याला कारणही हीच बाब आहे. शरद पवारांच्याविरोधात लाखभर मते घेणारे महादेवराव जानकर यांचा वारंवार पराभव होतो, त्याला कारणही ओबीसी मतांचे ध्रुवीकरणच आहे. भाजपच्या माधवं पॅटर्नला यशस्वी करणारे स्व. मुंडेंच्या निधनाने भाजपचे नुकसान तर झालेच; परंतु मुंडेंच्या निधनाबद्दल जे संशयाचे धुके दाटून आलेले आहेत, त्यामुळे हा पक्ष सध्या अडचणीत आलेला आहे. मुंडेंचे निधन हत्त्याच आहे; ही जनमाणसाची तीव्र भावना आहे. संशयाची सुईदेखील भाजपच्याच काही चाणक्यांवर जाते. त्यामुळे मुंडेंच्या निधनाने निर्माण झालेल्या शोकलहरीवर स्वार होणे भाजपसाठी तसे सोपे राहिलेले नाही. या राज्यातील जनमाणसाने नेहमीच पेशवाईचा तिरस्कार केला. आजही त्याबाबत संवेदना बोथट झालेल्या नाहीत. भाजपकडून देवेंद्र फडणवीसांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे येत असेल तर त्याचीही किंमत भाजपला मोजावी लागेल. यापूर्वी ही किंमत शिवसेनेने मोजली आहे. शिवशाहीचे पहिले मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांना संधी मिळाली. त्यामुळे राज्यात पुन्हा पेशवाई आली हो! अशी ओरड झाली. पर्यायाने शिवसेनाप्रमुखांना जोशींना हटवून नारायण राणे या मराठानेत्याला मुख्यमंत्री करावे लागले. दिल्लीत नरेंद्र अन् राज्यात देवेंद्र अशी घोषणा सध्या भाजपचे कार्यकर्ते देत आहेत. दिल्लीत नरेंद्र ठीक आहे, परंतु या पुरोगामी राज्यात देवेंद्र चालेल का? हा मोठा सवाल आहे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा