हे तर देशोन्नतीकारांवर सूड उगविण्याचे षड्‌यंत्र!


वृत्तपत्रांचा मनुवादी चेहरा बहुजन समाजाने फार जवळून पाहिला आहे. परंतु, वृत्तपत्राला बहुजनवादी चेहरा देण्याचे काम देशोन्नतीकार प्रकाश पोहरे यांनी केले. किंमतयुद्धाच्या काळातही साडेतीन ते चार रुपयांत विकले जाणारे देशोन्नती हे दैनिक, वृत्तपत्र म्हणून नव्हे तर शेतकरी लढ्यातील अग्रदूत आणि आणि बहुजनांचे मुखपत्र म्हणून आजही अकोला आणि नागपुरातून प्रकाशित होते. या दैनिकाची नियोजनबद्ध संपादकीय भूमिका ज्या लढवय्या शेतकरी नेत्याने आखली आज त्या नेत्यावर शेटजी-भटजीची मीडिया वैयक्तिक सूड उगवत असल्याचे अत्यंत संतापजनक तितकेच दुर्देवी चित्र नागपुरात पहावयास मिळत आहे. एखादा मराठा ध्येयवादी व्यक्ती कोट्यवधी रुपये गुंतवून प्रकाशन सुरु करतो. तेथे काही मूठभर कर्मचारी संघटना स्थापन करतात. अवास्तव वेतनवाढीचा हट्ट धरतात. हा हट्ट भडकलेल्या सर्वचस्तरातील महागाईच्या काळात या ध्येयवादी मालकाला आर्थिक चणचणीमुळे पुरवणे शक्य होत नाही. म्हणून, जेथे लेकराबाळाच्या अन्नाची तरतूद होते, त्या रोजीरोटीतच माती कालवण्याचे काम काही मूठभर कर्मचारी करतात. अख्खे युनीटच वेठीस धरतात. प्रिंटींग युनीटमध्ये वारंवार बिघाड करणे, छपाईयंत्रे निकामी करण्याचा प्रयत्न करणे आदी दुर्देवी प्रकार होतात. ऐवढे सारे सोसूनही वारंवार कर्मचार्‍यांशी चर्चा करण्याचे धोरणच देशोन्नतीकार प्रकाश पोहरे यांनी स्वीकारले. परंतु, व्यवस्थापनाकडे एक खाष्ट, शोषण करणारा मालक म्हणून पाहायाचे, त्यांचे म्हणणेच लक्षात घ्यायचे नाही, आणि आपला असहकार चालू ठेवून वृत्तपत्र कसे बंद पडेल, याची व्यूहरचना आखायची या नतद्रष्टेपणाला काय म्हणावे? देशोन्नतीकारांचे वैशिष्ट्य हे आहे, की ते कोणताही कर्मचारी कधीच काढत नाहीत. नवशिखे म्हणून येणारे कच्चेबाळ देशोन्नतीत तयार होतात. शिकून तयार झाल्यानंतर हेच कच्चेबाळ इतर दैनिकात आहे तेवढा पगार द्या, अशी मागणी करतात. ती पूर्ण झाली नाही तर देशोन्नतीकारांच्यानावे बोटं मोडतं इतर वृत्तपत्रांचा मार्ग धरतात. बाहेर जाऊन देशोन्नतीत शोषण होते हो! ही त्यांची ओरड कायम असतेच. विदर्भातील बहुतांश दैनिकांना कर्मचारी पुरविण्याचे काम देशोन्नतीनेच केले आहे. बहुजन समाजातील अनेक चांगले चेहरे पत्रकार म्हणून पुढे आले ते केवळ देशोन्नतीकारांमुळेच, हे विदर्भातील उघड सत्य आहे. आता राहिला प्रश्‍न तो नागपूर दुर्घटनेचा. झालेली दुर्घटना अत्यंत दुर्देवी आहे. ती टळायलाच हवी होती. परंतु, ती कोणत्या परिस्थितीत घडली हेदेखील लक्षात घ्यायला हवे. या घटनेची दुसरी बाजू न पाहाताच देशोन्नतीकारांवर टीकेची झोड उठविण्याचे काम शेटजी-भटजीच्या वृत्तपत्रांनी हाती घेतल्याचे दिसून येते. या घटनेचा पोलिस योग्य तो तपास करतीलच; दोषी आढळल्यानंतर न्यायसंस्था देशोन्नतीकारांना योग्य ती शिक्षाही देईल. परंतु, घटनेची वस्तुस्थिती पाहाता आणि घटनास्थळावर जे घडले ते पाहाता, देशोन्नतीकार या वाईट प्रसंगातून सुखरुप बाहेर येतील, यात तिळमात्र शंका नाही. ७ सप्टेंबरपासून देशोन्नती प्रेसमध्ये संप पुकारण्यात आला आहे. त्यामुळे देशोन्नती छपाईचे काम करणार्‍या एनएससीएन प्रेसला बंद करण्याचा निर्णय संबंधित व्यवस्थापनाने घेतला. हा कटू निर्णय घेताना देशोन्नतीकार कमालीचे हळहळले असतील. ‘‘ कित्ती दिवस चाललं रे बे हा पेपर ’’ देशोन्नतीचा पहिलाच अंक हातात घेताना नागपुरकरांनी या वाक्याने देशोन्नतीचे स्वागत केले होते. तेव्हा मीदेखील नागपुरातच होतो. रवीसरांसह (कार्यकारी संपादक रवी टाले) भाऊंना हा किस्सा मी स्वतः सांगितला होता. नागपुरकरांनी अऩेक वृत्तपत्रे बंद पडत गेल्याचे पाहले होते. नागपुरात येणारे वृत्तपत्र बंदच पडते, अशी नागपुरकरांची धारणा आहे. ती धारणा खोटी ठरविण्याचा देशोन्नतीकारांचा नेहमीच उद्देश राहिलेला आहे. त्यामुळे देशोन्नती प्रेस बंद करण्याचा निर्णय घेताना देशोन्नतीकारांना काय वाटले असेल, याची कल्पना केवळ त्यांच्या जवळच्याच व्यक्तींना येऊ शकते. ही प्रेस बंद करण्यापूर्वी, एनएससीएनच्या व्यवस्थापनाने नियमानुसार प्रेसच्या कर्मचार्‍यांना दोन महिन्यांचे अग्रीम वेतन देण्यात येऊन प्रेस बंद करत असल्याची सूचना कामगार आयुक्तांनाही दिली होती. एखाद्या उद्योजकाला सहकार्यच करायचे नाही. त्याने या असहकार्यामुळे उद्योग बंद केला तर त्या मालकालाच लक्ष्य करायचे, ही कुठली कामगार नीती झाली? १३ ऑक्टोबरला जी दुर्देवी घटना घडली. ती टळायलाच हवी होती. परंतु, नव्या सुरक्षारक्षकांना प्रेस दाखविण्यासाठी व कामाची जबाबदारी सोपविण्यासाठी गेलेल्या देशोन्नतीकारांवरच काही माजी कामगारांनी हल्ल्याचा प्रयत्न केला. स्वतःच्या मालकीच्याच उद्योगातच त्यांना जाण्यास मनाई करण्यात आली. त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्कीही झाली. स्व. राजेंद्र दुपारे यांच्यासह काही माजी कर्मचार्‍यांनी देशोन्नतीकारांसोबतच्या सुरक्षा रक्षकाची बंदूक हिसकविण्याचाही प्रयत्न केला. देशोन्नतीकारांवर झालेल्या हल्ल्याचा प्रयत्न पाहाता, त्यांच्या जीवाचे काही बरेवाईट झाले असते तर विदर्भासह तमाम शेतकरीवर्ग व बहुजन समाजाची अतोनात हानी झाली असती. ही हानी कशी भरून निघणे शक्य होते? तरीदेखील झालेला प्रकार पाहाता देशोन्नतीकार घटनास्थळाहून तातडीने निघाले. कामगारांना अटकाव करण्यासाठी प्रारंभी हवेत गोळीबार करण्यात आला, परंतु झालेल्या झटापटीत गोळी स्व. दुपारे यांना लागली. हा एक केवळ दुर्देवी अपघात आहे. माजी कामगारांनी देशोन्नतीकारांवर हल्ल्याचा प्रयत्न केला नसता तर हा दुर्देवी अपघात निश्‍चितच टळला असता. विदर्भातील दोन नेते अत्यंत फाटक्या तोंडाचे म्हणून ओळखले जातात. छ. शिवाजी शिक्षण संस्थेचे वसंतराव धोत्रे आणि दुसरे शेतकरीनेते प्रकाश पोहरे. स्व. दादासाहेब काळमेघ हेदेखील असेच फाटक्या तोंडाचे म्हणून ओळखले जात होते. फटकळ बोलणे हा या लोकांचा स्वभावगुण आहे. ही मोठी माणसे अस्सल वर्‍हाडीत अद्वातद्वा बोलतात खरे; परंतु अंतःकरणातून ती प्रांजळ, मायाळूच असतात हे त्यांच्या सहवासातच गेल्यानंतर कळते. घटनास्थळी देशोन्नतीकार माजी कामगारांवर खवळले होते हे खरे आहे, परंतु, त्यांच्या रोषाचा मुद्दा हाच होता, की आता तुमचा या प्रेसशी काहीही संबंध राहिला नाही. तेव्हा हा विरोध आणि उपद्रव कशासाठी? परंतु, या सर्व प्रकरणात, विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांसाठी लढणारा, बहुजन समाजाच्या हक्कासाठी आवाज उठविणारा, अनेक शेतकरी विधवांचे आश्रू पुसणारा आणि देशोन्नती हे दैनिक शेटजी-भटजींसारखे राजकीय किंवा आर्थिक फायद्यासाठी व्यापार म्हणून न चालविता एक लोकचळवळ म्हणून चालविणार्‍य बहुजन संपादकावर, लोकनेत्यावर आज एका माजी कर्मचार्‍याच्या खुनाचे बालंट लागले. खरे तर गजाआड होण्याची ही काही देशोन्नतीकारांची पहिलीच वेळ नाही. परंतु, अगोदरच्या गजाआड राहण्याची कारणे वेगळी आहेत. सामाजिक व राजकीय उद्दिष्टांच्या आदोलनांमुळे त्यांना २५ ते २६ गुन्ह्यांना सामोरे जावे लागले असेल. पैकी अनेक प्रकरणांत त्यांना अटकही झाली. परंतु, ही अटक समाजहितासाठी होती. काही प्रकरणांत तर सरकारने सन्मानाने त्यांच्यावरील गुन्हेही मागे घेतलेत. स्व. दुपारेंच्या मृत्यूप्रकरणात देशोन्नतीकारांना झालेली अटक ही दुर्देवी तर आहेच. परंतु, एका चांगल्या लोकनेत्यावर, संपादकावर ओढावलेले दुर्देवी संकट आहे. या दुर्देवी प्रकरणात देशोन्नतीकारांना उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळणे मेरिटच्या जोरावर सहज शक्य होते. परंतु, तत्पूर्वीच पोलिसांनी त्यांना अटक केली. परिणामी, उच्च न्यायालयातील त्यांचा जामीनअर्ज व्यपगत झाला. देशोन्नतीकार कुठे आहेत, याची टीपही अकोल्यातील त्यांच्याच एका माजी कर्मचार्‍यांने पोलिसांना द्यावी, हेदेखील एक मोठे दुर्देवच म्हणावे लागेल. राष्ट्रपिता महात्मा फुले यांचा सत्याशोधकीय विचारांचा वारसा चालविणारे, फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारा केवळ लेखनीतूनच नव्हे तर प्रत्यक्ष जीवनातही अनुसरणारे पोहरे गजाआड झाल्यानंतर शेटजी-भटजीच्या वृत्तपत्रांनी भडक, रक्तरंजित आणि केवळ व्यावसायिक सूड उगविण्याच्या हेतूने देशोन्नतीकारांविरुद्ध बातम्या प्रकाशित करण्याचा सपाटा लावला आहे. या बातम्या छापताना देशोन्नतीकारांची भूमिका, त्यांचे म्हणणेही ऐकून घेतले नाही. दुसरी बाजू समाजासमोर येऊ दिलीच नाही. शिवाय, माजी कामगारांसह काही पत्रकार संघटनांना भडकविण्याचे उद्योगही या शेटजी-भटजींनी हस्तकांमार्फत चालविले आहेत. तथापि, न्यायसंस्थेवर विश्‍वास असलेल्या सामान्य माणसाला निष्कारण गोवले गेलेले देशोन्नतीकार या प्रकरणातूल सुखरुप बाहेर येतील, असा ठाम विश्‍वास आहेच.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खसखसच्या शेतीचे वास्तव!