२१ व्या शतकातील गुजरातचे नीरो!


रोम जळत असताना रोमन सम्राट नीरो हा व्हायोलिन वाजवित होता, असे इतिहास सांगतो. धार्मिक दंगलीचे दाहक चटके सहन केलेला गुजरात आज कुपोषणाने कलंकित झाला आहे. धार्मिकद्वेषाने आजही गुजरात जळत असताना, तेथील नीरो विकासाच्या व्हायोलिनचे तुणतुणे वाजविण्यात मश्गुल आहेत. तरुण महिलांत रक्ताचे प्रमाण कमी असून, त्या कुपोषित असताना मोदीमहोदयांना त्यात रेखीव शरीराचे रहस्य वाटते. रोमचा सम्राट होऊन इतिहास झाला. परंतु, तो आजही गुजरातमध्ये जीवंत असावा, असा संशय येतो आहे.

.....
विकसनशील राष्ट्र म्हणून ज्या कुपोषण आणि भूकमारीमुळे भारताच्या प्रतिमेला धब्बा लागला. ज्या कुपोषणाला भारताचे पंतप्रधान राष्ट्रीय कलंक म्हणून घोषित करतात. त्याच देशातील सर्वात विकसित राज्य असा दावा करणारे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, कुपोषणाला फॅशन व रेखीव सौदर्याचे प्रतिक व तरुणींच्या सौंदर्यविषयक जागृततेचे प्रमाणपत्र बहाल करत आहेत. गुजरात विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या निवडणुकांवर डोळा ठेवून नरेंद्र मोदी यांनी सरकारने केलेल्या तथाकथित विकासाचा डिंगोरा पिटविण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी जोरदार प्रचार मोहीम आतापासूनच हाती घेण्यात आली. काही महिन्यांपूर्वी मोदी यांनी एका उर्दू दैनिकाला एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत त्यांनी राष्ट्रीय कलंक ठरलेल्या गुजरात दंगलीवर पहिल्यांदाच भाष्य केले होते. मोदीमहोदय म्हणाले होते, की राज्यातील दंगलीस मी दोषी असेल तर मला खुलेआम फासावर लटकविले जावे. अर्थात, पोलिस यंत्रणा मोदींना हात लावू शकत नाही, म्हणूनच त्यांनी ही दर्पोक्ती केली होती. आतादेखील गुजरातमध्ये गंभीर प्रश्‍न बनलेल्या कुपोषणावर बोलताना मोदींच्या तोंडी तीच अहंकारी भाषा आली. इंग्रजी दैनिक दी वॉल स्ट्रीट जनरलला दिलेल्या मुलाखतीत मोदी म्हणाले, की गुजरात दंगलीप्रकरणी मी क्षमा मागण्याचा प्रश्‍नच येत नाही. क्षमा तेव्हाच मागितली जाते जेव्हा तो दोषी असेल. बोलताना ते असेही म्हणाले, की आपण दोषी असू तर आपल्यालाही शिक्षा झाली पाहिजेत. मुख्यमंत्री आहे म्हणून आपल्याला बक्षण्याची काहीही गरज नाही. मोदींच्या या वक्तव्यांतून एक बाब प्राकर्षाने जाणवते, की गुजरातमध्ये दंगली उसळणे, त्यात निरापराधांचे जीव जाणे आणि सांप्रदायिक सौहार्द बिघडणे याबाबत मोदींना काहीही सोयरसूतक आजही वाटत नसावे. या दंगली रोखण्यात त्यांना त्याकाळी आलेले अपयश किंबहुना, त्यांनीच हिंसाचाराकडे केलेला हेतुपुरस्सर कानाडोळा पाहाता गुजरात दंगलीची आणि झालेल्या हिंसाचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारण्याची आजही मोदींची मानसिकताच नाही. वास्तविक पाहाता, राज्यात जर काही अमानवीय, अनैतिक आणि असंवैधानिक घडत असेल तर त्या कृत्याची जबाबदारी राज्याचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांचीच असते. सध्या आसाममध्ये हिंसाचार पेटला असून, त्यान शेकडो बळी जात आहेत. या हिंसाचाराचे पाप अर्थात तेथील मुख्यमंत्र्यांच्याच माथी मारावे लागेल. त्याचप्रमाणे गुजरातमध्ये घडलेल्या तत्कालीन हिंसाचाराची जबाबदारी मोदी नाकारतात तरी कसे? हाच खरा सवाल आहे. मोदी विचार करतात त्याप्रमाणे प्रत्येक सत्ताधारी राजकारणी विचार करु लागला तर, देशात बोकाळलेली महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, गुन्हेगारी यांना कोणताही राजकारणी, कोणताही सत्ताधारी पक्ष स्वतःस जबाबदार नाही. या पापांबद्दल उद्या चालून पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंगदेखील काखा वर करतील. अशी ढकलाढकली केली तर चालेल का? त्याचप्रमाणे गुजरात दंगल व या दंगलीत घडलेल्या हिंसाचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून नरेंद्र मोदी यांनी राजीनामा देऊन प्रायश्‍चित घेणे कधीही योग्यच ठरणार असून, तोच त्यांचा खर्‍याअर्थाने सद्भावना उपवास ठरेल. शुक्रवारी नृशंस अशा नरोडा पाटिया हत्याकांडप्रकरणी मोदींच्या माजी सहकारी व एकेकाळी त्यांच्याच मंत्रिमंडळात मंत्री राहिलेल्या माया कोडनानी यांना २८ वर्षाच्या कारावासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. ही बाई आता मरेपर्यंत कारागृहात सडत बसेल. न्यायालयाने दिलेल्या या निकालातून तरी बोध घेऊन धर्मराजाची भूमिका वठवणारे मोदी यांनी खरेतर राजीनामा देऊन राजधर्माचे पालन करायला हवे. तीनवेळा सत्ता प्राप्त करुन आर्थिक विकास साधल्याचा दावा मोदी करत असतात. तथापि, त्यांच्या काळात झालेल्या हत्याकांड व दंगलींच्या जखमा आजही भळभळत्या असून, त्यावर विकासकामांबाबत केलेल्या दाव्यांची मलमपट्टी अजिबात परिणामकारक ठरू शकत नाही. तसेच, सद्भावना उपवासाचे त्यांनी केलेले ढोंगही देशवासीयांची दिशाभूल करु शकत नाही. एकीकडे गुजरातमध्ये देशातील नामचीन उद्योगपती उद्योग-व्यवसाय उभारत आहेत. इतर राज्यांतून उद्योगधंदे गुजरातमध्ये स्थलांतरित होत आहेत. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढल्याने गुजरातच्या विकासाची सूज बरीच मोठी वाटते. त्याच दर्पात मोदी अलिकडे वागत - बोलत असतात. एकीकडे उद्योग वाढले असले तरी दुसरीकडे छोटे कामगार, कारागीर यांच्या पोटावर मात्र पाय पडला असून, शेतकरीदेखील उद्ध्वस्त झाल्याचे चित्र गुजरातमध्ये भयानक आहे. परंतु, या भयावह परिस्थितीबद्दल मोदी कधी चकार शब्द काढत नाहीत. एवढेच नव्हे तर विकासाचा दावा करणार्‍या मोदींच्या राज्यात कुपोषणाचे प्रमाणही मोठे असून, मानव विकास निर्देशांकाच्या अहवालात कुपोषणामध्ये गुजरातचे स्थान देशात तेरावे आहे. आसाम, ओदिशा, पश्‍चिम बंगालसारख्या राज्यांच्या वर गुजरातचे स्थान आहे. या अहवालानुसार, गुजरातमधील ४१ टक्के बालकांचे वजन अपेक्षेपेक्षा कमी आहे. पाच वर्षापेक्षा कमी वयातच सहा टक्के मुलांचा कुपोषणाने बळी जातो. २२ टक्के लोकसंख्येला आजही पुरेसे अन्न मिळत नाही. १५ ते ४५ च्या वयोगटातील तरुण स्त्रियांच्या अंगात रक्ताची कमतरता असून, त्यांचे वजनही अपेक्षेपेक्षा कमी आहे. विकासाचा दावा करणार्‍या मोदींसाठी कुपोषणाची ही आकडेवारी सणसणीत चपराक ठरते. तरीदेखील मोदी आपलीच शेखी मिरवण्यात मश्गुल आहेत. या आकडेवारीबद्दल इंग्रजी वृत्तपत्राच्या मुलाखतीत खुलासा करताना मोदी म्हणाले होते, की मध्यमवर्गीय लोकांची राज्यात संख्या मोठी आहे. ही मंडळी आपल्या रेखीव शरीराबाबत (फिगर) फारच जागृत असून, कमी जेवत असल्याने त्यांच्या अंगात रक्ताची कमी आहे. सुदृढ शरीरापेक्षा त्यांना सुंदर शरीर महत्वाचे वाटते. राज्यात आई आपल्या मुलीला बाळ दूध पित जा, असे जेव्हा सांगते. तेव्हा, आई मी जाडी होईल, असे म्हणून मुलगी दूध पित नाही, अशी कारणमीमांसा मोदींनी मुलाखतीत केली होती. लोकांची ही मानसिकता बदलविण्यासाठी आपण प्रयत्न करु, अशी मखलाशीही मोदींनी मारली होती. मराठीत म्हण आहे, खोटं बोल परंतु रेटून बोलं, याप्रमाणे गुजरातच्या या आधुनिक नीरोच्या स्वभावाचे वर्णन करावे लागेल. दोनवेळचे जेवण ज्यांच्या नशिबी नाही ती माणसे दूध आणणार कोठून? हा खरा सवाल असून, कुपोषणाने ही माणसे मरत असताना मोदींना हे बळी रेखीव सौंदर्याच्या हव्यासापोटी गेल्याचे वाटते काय? नरेंद्र मोदी यांचे राजकारण आणि त्यांची वक्तव्ये पाहिले, की नीरो आजही २१ व्या शतकात गुजरात जळत असताना मोदींच्या रुपात व्हायोलिन वाजविण्याचे काम करत बसल्याचे दिसतो!
(पूर्वप्रकाशन : दैनिक देशदूत, दि. २ ऑगस्ट २०१२)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खसखसच्या शेतीचे वास्तव!