राजधर्म ते फासी!
....गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आठवडाभरापूर्वी एक वक्तव्य केले होते. गुजरात दंगलीप्रकरणी मी दोषी असेल तर फाशी द्या. गुजरात दंगल ही देशाला लागलेला कलंक आहे. या दंगलीत १२०० निर्दोष नागरिकांची कत्तल केली गेली. या दंगलीत मोदींची भूमिका काय होती, हे अख्खा देश जाणून आहे. मोदींच्या तत्कालीन भूमिकेवर सडेतोड टीका करताना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी मोदींना राजधर्म निभावण्याचा सल्ला दिला होता. मोदींनी राजधर्म निभावला असता तर ते आज राजकीय जीवनात अस्पृश्य ठरले नसते. या दंगलीची निरपेक्ष चौकशी झालीच नाही. अन्यथा, मोदींना फाशी ठोठावण्याचे काम आजपर्यंत देशातील न्यायसंस्थेनेच केले असते. इतिहास दोन क्रूरकर्म्यांना कधीही क्षमा करु शकत नाही. एक म्हणजे फ्युरर हिटलर तर दुसरे आपले नरेंद्र मोदी!
......
भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तान या मुस्लीम राष्ट्राची निर्मिती झाली. धर्माच्या नावावर जन्माला आलेल्या राष्ट्राचे काय हाल होतात याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून पाककडे पाहिले जाते. तथापि, या फाळणीच्यावेळी जो रक्तपात झाला, तो भारतीय माणूस विसरु शकत नाही. फाळणी ही या देशाची भळभळती जखम आहे. परंतु, झालेल्या हिंसाचाराची जखम अद्यापही चिघळती असून, ती भरुन येणे कदापि शक्य नाही. हा देश फाळणीचे कटू अनुभव विसरला नाही तोच १० वर्षापूर्वी गुजरात दंगल भडकली. गोध्रा हत्याकांड हे मूठभर धर्मांध लोकांचे नृशंस कृत्य होते. त्यांच्या पापाची शिक्षा तब्बल १२०० निरपराध, निहत्त आणि गोरगरीबांना देण्याचा अधिकार नरेंद्र मोदी आणि त्यांच्या धर्मांध प्रवृत्तींना कुणी दिला होता? गुजरातची दंगल ही फाळणीनंतरची सर्वाधिक काळिमा फासणारी घटना ठरली असून, धर्मनिरपेक्ष भारतीय प्रजातंत्राचा तो ठसठसीत पराभव होता. नुकतीच मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची एक मुलाखत वाचण्यात आली. समाजवादी पक्षाचे राज्यसभेचे खासदार शाहीद सिद्दीकी यांच्या उर्दू साप्ताहिक नई दुनियामध्ये ती प्रकाशित झाली होती. मोदी म्हणाले होते, की गुजरात दंगलप्रकरणी मी दोषी असेल तर मला फाशी द्या! प्रश्न असा निर्माण होतो, की मोदींना फाशी देण्याचा अधिकार न्यायसंस्थेला आहे. कोणत्याची गुन्ह्याचे ठोस पुराव्यानिशी आरोप सिद्ध होत असतील तर न्यायसंस्था त्या गुन्ह्यांत संबंधित आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावू शकते. त्यासाठी त्या गुन्ह्यांचा तपास प्रामाणिकपणे व वस्तुस्थितीला धरुन झालेला असावा लागतो. गुजरात दंगलीचा तपासच संशयाच्या भोवर्यात राहिला असून, अद्यापपर्यंत किती लोकांना शिक्षा झाली, हा प्रश्नच आहे. या दंगलीचा प्रामाणिकपणे व निरपेक्ष तपास झाला असता तर कदाचित मोदींना ही मागणी करण्याची गरजच पडली नसती. न्यायसंस्थेनेच मोदी आतापर्यंत फासावर लटकविले असते. गुजरातचे माजी पोलिस अधिकारी संजीव भट्ट यांनी दंगलकाळात मोदी कसे हिटलरशाही गाजवत होते, याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली होती. मोदींच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे एका बैठकीत मोदींसोबत त्यांची कशी खडाजंगी झाली होती, हेही त्यांनी सांगितले आहे. दंगलीत केवळ मोदीसमर्थकच हिंसाचार घडवत नव्हते तर इतर यंत्रणादेखील या हिंसाचारात अग्रेसर होत्या, याचा पुरावाच काही वृत्तवाहिन्यांनी त्याकाळात लाईव्ह दाखविला आहे. एकूणच काय तर गुजरात दंगल ही पूर्वनियोजित आणि अल्पसंख्यांक समाजाला लक्ष्य करुन घडविली गेली होती. सामूहिक हत्याकांड, अल्पसंख्याकांच्या वस्त्याच जाळून टाकणे, क्रूर नरसंहार घडविणे हे काम गुजरातमध्ये मोदींच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात झाले. तेव्हा केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)चे सरकार होते. या सरकारमधील लालकृष्ण अडवाणीसारखे नेते जेव्हा मोदींच्या हिंसाचाराचे समर्थन करत होते तेव्हा पंतप्रधान अटबिहारी वाजपेयी यांनी मोदींना राजधर्म निभावण्याचा सल्ला दिला होता. मोदींनी राजधर्म निभावला नाही. वाजपेयींचेही ऐकले नाही. दंगलीनंतर मोदीच पुन्हा सत्तेवर आले. त्यांनी बहुमताने सत्ता प्राप्त केली असली म्हणजे लोकांनी त्यांना स्वीकारले असे म्हणता येणार नाही. मोदींना हा देश कधीही स्वीकारणार नाही. ज्यांचे हात निरपराधांच्या हत्येने बरबटलेले आहेत, त्यांना स्वीकारण्याइतपत या देशातील जनता निश्चितच असंवेदनशील नाही. मोदी आज राजकीय पक्षांना अस्पृश्य वाटतात, त्यामागे हेच एक प्रमुख कारण आहे. मोदींनी राजधर्म निभावला नाही, त्यांनी राजधर्म निभावला असता तर १२०० निरपराधांच्या हत्याकांडाने गुजरात कलंकित झाला नसता. अलिकडे गुजरातच्या विकासाच्या गप्पा फार रंगत आहेत. गुजरातचा काही प्रमाणात विकास झाला हे खरे असले तरी, हा विकास मोठ्या उद्योगपती घराण्यांमुळे झाला आहे. छोटे उद्योग, कुटीर उद्योग व व्यावसाय नेस्तनाभूत झाले असून, गुजरातचा विकास ही सूज आहे. सूज उतरली, की या विकासाचा खरा चेहरा समोर येईल. मोदी गुजरातचे नेते म्हणून एकवेळ ठीक आहे. परंतु, देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांना लादण्याचा प्रयत्न भविष्यात भाजप करत असेल तर हा देश मोदींसह भाजपलाही लाथडून बसेल. गुजरात दंगलप्रकरणी मोदींना भलेही फाशी मिळणार नसली तरी मोदींच्या नेतृत्वात हा देश त्यांच्या पक्षाला मात्र निश्चितच सुळावर चढविल्याशिवाय राहणार नाही, यात शंका नाही.
(पूर्वप्रकाशन - दैनिक देशदूत, दि. ५ ऑगस्ट २०१२)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा