पृथ्वी नावाच्या ग्रहावर माणसांची दाटी!

जगाच्या लोकसंख्येने सात अब्जाचा आकडा ओलांडला आहे. पृथ्वीसारख्या ग्रहावर एवढ्या माणसांची दाटी झाली असली तरी त्यांच्या भवितव्याचे आणि वर्तमानाचेही काय, या प्रश्नाचे उत्तर आता शोधावे लागेल. मानव हा जमिनीवर राहणारा प्राणी असल्याने २९ टक्के भूभागावर त्याचे अस्तित्त्व असेल, त्यातीलही बहुतांश भूभाग बर्फ, वाळू आणि जंगल यांनी व्यापलेल्या असल्याने उर्वरित जमिनीवर अन्न पिकवणे आणि निवास वसविणे यासाठी त्याला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. नैसर्गिक साधनसंपत्तींचा नाश करण्याचे पाप मानव करतच आहे, त्यामुळे पुढील पिढीसाठी काहीही शिल्लक राहणार नाही. परंतु, दाटी केलेल्या माणसांसाठी पृथ्वीवर पुरेसे अन्नही पिकेल का नाही, ही शंका आहे. सात अब्जावे बाळ भारतात जन्माला आले, त्याचा फार मोठा उदोउदो झाला. परंतु, या बाळाचे पुढचे भवितव्य काय, या प्रश्नाचे उत्तर केंद्र सरकारकडे आहे का, किंवा संयुक्त राष्ट्रे (यूएन) तरी या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देईल का? पृथ्वीवर लोकसंख्या वाढीने दाटी झाली असून, उद्या या दाटीत सर्वांचाच जीव गुदमरणार आहे, ही दाटी कमी करण्यासाठी आजच पुढाकार घ्यावा लागेल!
....
पृथ्वीवर साधने मर्यादीत आहेत आणि त्यांचा वापर करणार्यांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजांच्याही पुढे जाऊन माणसाच्या लोभी प्रवृत्तीने कितीतरी गरजांचे जाळे निर्माण केले. या जाळ्यात आजकाल प्रत्येकजणच अडकल्याचे दुर्देवाने दिसते. नैसर्गिक संसाधनांची अक्षरशः उधळपट्टी सुरु असून, ही संसाधने संपविण्याचा विडाच आपणा सर्वांनी उचलला की काय हा प्रश्न निर्माण होतो. खणिजे, इंधन, पाणी, जंगल सर्व काही मानवी लालसेच्या विळख्यात सापडले असून, ज्या गतीने या संसाधनांचा नायनाट सुरु आहे, त्याच्या दुप्पट गतीने पर्यावरणाचे संतुलन बिघडत असल्याचे कटू वास्तव आहे. परिणामी, भविष्यातील पिढीसाठी उजाड पृथ्वीशिवाय काहीही शिल्लक राहणार नाही, अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. आजरोजी कोट्यवधी लोकांसाठी अन्न निर्माण करणे जिकरीचे होऊन बसले असून, जगातील अब्जावधी लोकांना राहण्यासाठी घर नाही. अंगभर वस्त्रे नाहीत, अशा परिस्थितीत लोकसंख्या भरमसाठ वाढत असेल तर ती चिंताजनकच नव्हे तर गंभीर बाब ठरली आहे. विशेषकरून अविकसित आणि भारतासारख्या विकसनशील राष्ट्रांसाठी वाढती लोकसंख्या हे भीषण संकट आहे. जगाची लोकसंख्या पाच अब्जावरून सहा अब्जावर पोहोचण्यासाठी ११ वर्षांचा कालावधी लागला होता. परंतु, आता हाच आकडा सात अब्जांवर पोहोचण्यासाठी १३ वर्षांचा कालावधी लागला आहे. म्हणजेच, लोकसंख्या नियंत्रणासाठी पुरेसे प्रयत्न सुरु झाल्याचे हे द्योतक म्हणता येईल. परंतु, तरीही आरोग्याच्या सुविधा, मृत्युदरांत झालेली घट, माता व बाल मृत्यूला झालेला अटकाव, आणि प्रजनन स्तरावर आजही असलेली विविधांगी लालसा यामुळे लोकसंख्या वाढीस म्हणावा तसा अटकाव घालता आलेला नाही. वाढत्या लोकसंख्येमुळे विविध गंभीर समस्यांची निर्मिती झाली आहे. सामाजिक समस्या, बेरोजगारी, गरिबी आदींमुळे मानवजीवन भयावह झाले असून, आजही काही आफ्रिकी देशांत लोकसंख्या वाढीची गती चिंताजनक आहे. त्यामुळे रोजगारांच्या संधी कमी झाल्या असून, नैसर्गिक संसाधनांच्या वापरांसाठी प्रत्येकजण संघर्षरत झाला आहे. आंतरराष्ट्रीय श्रम संस्थेच्या म्हणण्यानुसार सर्व आफ्रिका देशांसह आशियामध्ये गरिबीची तीव्रता भयानक असून, इतर देशांच्या तुलनेत या दोनच भूभागात गरिबी दुप्पटीने आहे. या देशांत १५ ते २४ वयोगटातील जवळपास आठ कोटी युवक बेरोजगार असून, भारताच्या संदर्भात बोलायचे झाले तर या देशात ही समस्या सर्वाधिक चिंतादायक आहे. लोकसंख्या वाढीचा वेग भारतात मोठा आहे. आपल्या देशात प्रतिमिनीटाला ५१ बालकांचा जन्म होतो. लोकसंख्या वाढीसाठी आर्थिक व सामाजिक परिवर्तन सहाय्यभूत ठरत असून, जितकी मोठी लोकसंख्या तेवढ्या हातांना काम आणि देशाची प्रगती असा चुकीचा प्रचार त्याला कारणीभूत आहे. हीच धारणा आजकाल पाकिस्तान, बांगलादेश किंवा अफगाणिस्तान या देशांमध्ये बळावली असली तरी या धारणेचा जनक खर्याअर्थाने भारतच आहे. बालमजुरीची समस्यादेखील याच विचारातून जन्माला आली. भारतासारख्या परंपरावादी देशात वंशाला दिवा हवा, हा एक खुळचट गैरसमज लोकसंख्या वाढीस कारणीभूत ठरला आहे. सुशिक्षीत व संपन्न घरात वंशाचा कुलदीपक म्हणून मुलगा हवा हा हव्यास मोठा असून, तीन ते चार मुली झाल्यानंतरही मुलाच्या आशेपोटी लोकसंख्या वाढीचे काम सुरुच असते. दुसरीकडे, याच हव्यासातून स्त्रीभ्रूण हत्येची समस्यादेखील जटील झाली आहे. महाराष्ट्र व पंजाबसारख्या आर्थिक संपन्न राज्यात स्त्रीभ्रूण हत्येची गंभीर परिस्थिती आहे. भारतीय समाजजीवनात स्त्रीयांना दुय्यम दर्जा दिला जातो. स्त्रीयांत त्यांच्या हक्क व अधिकाराविषयी अद्यापही पुरेसी जागृकता आलेली नाही. भारतातील महिला लोकसंख्येचा सर्वात मोठा हिस्सा आजही केवळ संतानोत्पतीसाठी काम करत आहे. कुटुंबाच्या इच्छेनुसार या महिलांनी अपत्यांना जन्म द्यायचा असून, त्यात त्यांना स्वतःचा काहीही अधिकार नाही. महिलांमध्ये असलेला शिक्षणाचा अभाव आणि परनिर्भरता या घटकांमुळे भारतीय महिला असह्यतेचे जीवन जगत आहेत. त्याचा फटका लोकसंख्या वाढीसाठी बसत आहे. दुर्देवाची बाब ही आहे, की भारत सरकार या सर्व परिस्थिती आणि समस्यांविषयी जाणून आहे. परंतु, या समस्येवर मात करण्यासाठी कोणतेही आधुनिक प्रयत्न करण्याचे पाऊल हे सरकार उचलत नाही. आजही पारंपरिक उपाययोजनांद्वारेच लोकसंख्या नियंत्रणाचा खटाटोप सरकार करत असून, त्यामुळेच जगाच्या सात अब्ज लोकसंख्येत १८ टक्के वाटा भारताने उचलला आहे. वाढती महागाई, रोजगाराच्या घटलेल्या संधी, पारंपरिक उद्योगांचा अस्त आणि वाढत्या लोकसंख्येला पोसण्यासाठी अन्नाची कमी, या समस्या आता अकराळ विकराळ रूप धारण करून आल्या आहेत. जगातील सात अब्जाचा आकडा पूर्ण करणारी उत्तर प्रदेशातील नर्गिस नावाची बालिका भलेही भारतात जन्माला आली असेल, परंतु तिचे भविष्य काय याचे उत्तर भारताकडे नाही. जगाचे नेतृत्त्व करणार्या संयुक्त राष्ट्रांकडे (यूएन)देखील या बालिकेच्या उज्ज्वल भवितव्याचे उत्तर नाही, ही मोठी शोकांतिका आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा