जनतेचे आंदोलन जनतेसाठी!


थोर गांधीवादी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून जनलोकपाल विधेयकाचा एक महत्त्वाचा टप्पा यशस्वी झाला असे म्हणता येईल. परंतु, या आंदोलनातून अपरोक्षरीत्या अनेक महत्त्वपूर्ण बाबी साध्य झाल्या आहेत. स्वातंत्र्यानंतरची काही युद्धे आणि क्रिकेटचे सामने वगळता हा देश कधी एकवटल्याचे दिसून आले नाही. अण्णांच्या आंदोलनात अख्खा देश उतरला होता. तरूणाईच्या डोक्यावर मी अण्णा ही गांधीटोपी आणि हातात असलेला तिरंगा पाहिल्यानंतर ही तरुणाई ६४ वर्षानंतर पहिल्यांदाच एका उच्चध्येयाने प्रेरित झाल्याचे दिसून आले. या तरुणाईला सामाजिक भान देण्याचे महत्त्वपूर्ण काम या आंदोलनाने केले. गांधी आंदोलनानेदेखील एकेकाळी हा देश ढवळून काढला होता. परंतु, मी गांधी असे देशवासीयांनी कधी म्हटले नाही. संपूर्ण देश सर्वप्रकारचे भेदाभेद विसरुन मी अण्णा म्हणाला, हीच एक मोठी क्रांती होती, आणि ही क्रांती अण्णा हजारे यांनी यशस्वी केली आहे. या आंदोलनाने प्रत्येकाला देशाप्रती असलेली आपली जबाबदारी तर कळलीच. परंतु, राजकारण्यांनादेखील संसद मोठी असे जे विनाकारण वाटायचे तो त्यांचा भ्रम दूर झाला असेल. संसद नव्हे तर जनसंसद सर्वोच्च हा बोध आता तरी त्यांनी घ्यायला हवा. अण्णांचे आंदोलन यशस्वी करण्यामध्ये तरुणाईचा जसा सिंहाचा वाटा आहे, तसाच मीडिया आणि न्यू मीडिया यांचाही वाटा आहे. मीडियाने २४ तांस अण्णांचे आंदोलन दाखवून घरात बसलेल्या देशवासीयांना रस्त्यावर उतरवले. तसेच, फेसबुक, ट्वीटर, यूट्यूब, एसएमएस या न्यू मीडियाने देशभरात या आंदोलनाप्रती संवेदना निर्माण केली. या आंदोलनाची फलनिष्पती चांगलीच असेल यात शंका नाही. परंतु, देशात क्रांतीची मशाल पेटली आहे, ही मशाल या देशात दीर्घगामी परिणामांचा उजेड निश्‍चित पाडेल, यात संशय नाही. जनतेने जनतेसाठी चालवलेले हे आंदोलन खरोखर ऐतिहासिकच होते, आणि इतिहास त्याची सुवर्णक्षरांनी नोंद घेईल!
भ्रष्टाचाराच्याविरुद्ध थोर गांधीवादी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या एका दीर्घ उपोषणाची झालेली सांगता, भारतीय लोकशाही आणि राजकारणाच्या एका अध्यायाचा अखेर नाही; परंतु सुरुवात आहे. या नव्या क्रांतीचे परिणाम काय होतील, या आंदोलनाचा काय संदेश आहे, याविषयावर आता गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. या आंदोलनातून एक सुखद संदेश असा आला, की हे आंदोलन केवळ त्याचे प्रणेते अण्णा हजारे यांचा विजय ठरला नसून, तो सर्व देशवासीयांचा आणि ज्याला संविधानाने आम्ही भारतीय नागरिक असे म्हटले आहे, त्या सर्वांचा होता. तशा प्रकारची कबुली खुद्द अण्णांनीच दिली आहे. अलीकडच्या काही घडामोड़ी पाहाता, केंद्र सरकारला असे वाटायला लागले आहे, की या देशात सर्वोच्च ताकद आम्हीच आहोत. संसद सर्वात मोठी व सर्वोच्च आहे, असे वक्तव्य खुद्द पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने केले होते. परंतु, या देशातील सर्व कायदाप्रक्रिया, व्यवस्था व नियम आम्हा भारतीय नागरिकांसाठी आहे. जर आम्ही भारतीय नागरिक या सर्वांबाबत समाधानी नसू तर शासकवर्गाला या सर्व व्यवस्था प्रणालीबद्दल पुनर्विचार करावाच लागेल. या आंदोलनाचा दुसरा संदेश हा आहे, की भारतीय लोकशाहीत काही महत्त्वपूर्ण बदल होणे ही काळाची गरज आहे. पाच वर्षातून एकदा निवडणुकीत मत मागणे, निवडून येणे आणि दिल्लीत बसून सत्ताउपभोग घेणे म्हणजे लोकशाही नाही. हा देश आता कात टाकत असून, लोकांमध्ये साक्षरता वाढली आहे. टीव्ही, मीडिया आणि वृत्तपत्रांनी सर्वदूर सर्व नागरिकांना पुरेसे जागृत केले आहे. परिणामी, नागरिक आता आपल्या अधिकार आणि त्यासोबतच कर्तव्याप्रती अधिक दक्ष झाले आहेत. हा या देशाच्या चांगल्या भवितव्यासाठी शुभसंकेत म्हणावा लागेल. परंतु, हा संकेत राजकारण्यांसाठी फारसा चांगला नाही. परंपरागतरित्या राजकारण करणार्‍या राजकारण्यांना आता बदलाच्या प्रवाहात टिकण्यासाठी स्वतःला बदलावे लागेल, अथवा राजकारणातून बाहेर पडावे लागेल. राजकारणी यापुढे फार काळ मतदारांना त्याच त्या मुद्द्यांवर मूर्ख बनवू शकणार नाहीत. शिवाय, निवडून आल्यानंतर पाच वर्षे कुण्या राजकारण्याला यापुढे निष्क्रियही राहता येणार नाही. म्हणजे, एकप्रकारे परिवर्तनशील पुरोगामी राजकारणाची आस आता लोकशाहीला लागलेली आहे. अशा प्रकारची लोकशाही यूरोप आणि तिकडच्या काही राष्ट्रांत अस्तित्वात आहे. अशा लोकशाहीत राइट टू रिकॉल (लोकप्रतिनिधी योग्य काम करत नसेल तर त्याला परत बोलावण्याचा अधिकार), राइट टू रिजेक्ट (निवडणुकीला उभ्या असलेल्या उमेदवारापैकी एकही उमेदवार पसंत नाही, असे सांगण्याचा अधिकार) आदी महत्त्वपूर्ण बाबी सामिल आहेत. आता अण्णा हजारे म्हणतात त्याप्रमाणे आपल्याला आपला देश अशाप्रकारे परिवर्तनशील पुरोगामी राष्ट्र म्हणून पुढे आणायचा आहे. या देशातील सामाजिक, राजकीय, आर्थिक विषमता दूर करण्यासाठी या मार्गाशिवाय अन्य दुसरा मार्गही नाही. अण्णांच्या आंदोलनाचे सर्वात मोठे शस्त्र हे सत्य व अहिंसाच होते. कोणत्याही यशस्वी क्रांतीसाठी हीच शस्त्रे बलाढ्य आणि परिणामकारक असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या देशाच्या पूर्वोत्तर भागात सुरु असलेल्या हिंसक चळवळी आणि नक्षलवाद्यांनी अण्णांच्या आंदोलनापासून बोध घेण्याची गरज आहे. कोणत्याही मागण्या मान्य करून घेण्यासाठी गांधीवादाचा मार्ग हाच सर्वोत्तम मार्ग आहे, हा बोध या आंदोलनातून घेतल्या गेल्या पाहिजे. इतिहास साक्षीदार आहे, की इंग्रजांची बलाढ्य आणि मजबूत सत्ता उखडून फेकण्यासाठी महात्मा गांधीजींच्या अहिंसक आंदोलनालाच यश आले होते. या आंदोलनाचा महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक परिणाम हा दिसून आला आहे, की या देशातील युवक कायम द्विधा मनस्थितीत होता. त्याच्यासमोर ध्येय नव्हते आणि तो भ्रष्टाचाराच्या भस्मसुराकडून जागोजागी लुटल्या जात आहे. अण्णांनी या युवकाला केवळ राष्ट्रीय प्रवाहातच आणले नाही तर त्याला दिशा दिली. राष्ट्राप्रती असलेली त्याची जबाबदारी त्याला कळून चुकली. त्यामुळेच या आंदोलनाच्या यशस्वीतेत युवकांचा सिंहाचा वाटा राहिला हे सत्य नाकारता येणार नाही. तसेच, चित्रपट अभिनेते किंवा क्रिकेटपटूंचे अनुकरण करणार्‍या युवाशक्तीला पहिल्यांदाच अण्णा हजारेंसारखे रोल मॉडेल मिळाले. संसदेत कायदे किंवा नियम बनवताना समाजाची मागणी आणि लोकेच्छा लक्षात घ्यावीच लागेल, असा ठोस इशाराही यानिमित्ताने स्वतःला सर्वोच्च समजणार्‍या संसदेला अण्णांच्या आंदोलनातून मिळाला आहे. संसद नव्हे तर जनसंसद मोठी आहे, हा धडा सरकार आता चांगलेच शिकले असेल. खरे तर अण्णांचे हे आंदोलन गांधी आंदोलनापेक्षा वेगळे आहे. गांधीजींना ज्यांच्याविरुद्ध आंदोलन करावे लागले ती मंडळी परकीय होती. या परकीय मंडळीविषयी देशातल्या प्रत्येकाच्या मनात आपसुकच चीड होती. देशाच्या स्वातंत्रतेची भावना प्रत्येकाच्या मनात होती, या लोकभावनेला गांधीजींनी फुंकर घातली. स्वातंत्र्याची आग पेटली अन् अहिंसेच्या मार्गाने इंग्रजांची बलाढ्य सत्ता राष्ट्रपिता उलथवून टाकू शकला. अण्णांच्या आंदोलनात देशातील सर्वसामान्य, गोरगरीब आणि सर्व जातीधर्माचे नागरिक स्वयंस्फुर्तीने उतरले. प्रत्येक तरुणाला अण्णांचे आंदोलन म्हणजे स्वतःचे आंदोलन वाटते आहे, म्हणूनच तो मी अण्णा हजारे असे मोठ्या गर्वाने म्हणतो आहे. राष्ट्रपित्याच्या आंदोलनात तरुणांनी मी गांधी असे म्हटलेले आढळत नाही. भारतीय स्वातंत्र्यानंतर १९६२, १९६५ आणि १९७१ च्या युद्धाव्यतिरिक्त, क्रिकेट सामन्यांच्याशिवाय अशा प्रकारच्या एकजुटीची लाट देशात कधी निर्माण झालेली नव्हती. काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून ते त्रिपुरा-मेघालयापर्यंत हिंदू, मुस्लीम, शिख, ईसाई, आदिवासी, दलित, मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांक या आंदोलनात मोठ्या संख्येने उतरले. सर्व देश एकवटला, यातून विदेशीशक्तींनादेखील एक चांगला आणि स्पष्ट संदेश मिळाला आहे, की भारतात फूट पाडण्याचे कितीही प्रयत्न कुण्या बाहेरच्या शक्तीने केले तरी राष्ट्रीय मुद्दा आणि संकटात हा देश सर्व भेद विसरून एकत्र येतो, आणि त्याची ताकद अण्णांच्या आंदोलनाइतकी तिव्र असते. या आंदोलनास मीडियाचे फार मोठे समर्थन राहिले आहे. परंतु, पहिल्यांदाच या देशातील न्यू मीडिया म्हणून ओळखल्या जाणार्‍या एसएमएस, ट्वीटर, यूट्यूब, फेसबुक यांचा मोठ्या प्रमाणात वापर या आंदोलनासाठी झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांच्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची सुरुवात यूट्युबवर संदेश टाकून केली होती. त्यांनी या न्यू मीडियाचा भरपूर वापर प्रचार मोहिमेत केला होता. शेजारच्या पाकिस्तानातदेखील राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांना सत्ता सोडण्यास भाग पाडण्यासाठी या न्यू मीडियाने मोलाची कामगिरी बजावली होती. आतादेखील ज्या राष्ट्रांत सत्तापरिवर्तन झाले, तेथे या न्यू मीडियाचा प्रभावशाली वापर झाल्याचे अधोरेखित झाले आहे. अण्णांच्या आंदोलनाचे यशदेखील या न्यू मीडियाच्या वापरातच दडलेले आहे. भ्रष्टाचार रोखण्यासाठी एकटे लोकपाल साहाय्यभूत ठरणार नाही. परंतु, अण्णांच्या आंदोलनातून भ्रष्टाचाराविरुद्ध जी क्रांतीची मशाल पेटली, जी एक जागृती देशामध्ये झाली आहे. या क्रांतीच्या ज्वाळाच भ्रष्टाचार करणार्‍यांचा नायनाट करण्यास सक्षम ठरेल. नियम व कायद्याने व्यवस्था परिवर्तन होत नसते, ही बाब खरी आहे. परंतु, झालेल्या जनजागृतीने भ्रष्टाचाराचा भस्मासुर रोखता येणे शक्य होईल, हा दिलासा या आंदोलनाची फार मोठी फलनिष्पत्ती म्हणावा लागेल.
(प्रसिद्धी : दैनिक देशदूत, ४ सप्टेंबर २०११)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खसखसच्या शेतीचे वास्तव!