दहशतवाद निपटावाच लागेल!

हा देश सध्या स्फोटांच्या उबरठ्यावर उभा आहे। देशासाठी हिरवा दहशतवाद जसा धोकादायक आहे, तसाच भगवा आणि लाल दहशतवाददेखील धोकादायक आहे. खरे तर दहशतवादाल रंग नसतो. निरपराधांचे बळी घेणार्‍या कोणत्याही कृतीचे समर्थन करता येणार नाहीच. जोपर्यंत राजकारणी धार्मिक मुद्द्यांवर मते मागतील; तोपर्यंत विविध रंगाचे दहशतवाद देशात फोफावत राहतील. माथेफिरु मानसिकता निर्माण करणार्‍या धार्मिक संघटना याच खर्‍याअर्थाने देशाच्या शत्रू आहेत. देशाच्या शेजारील पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ या देशांत दहशतवादाची मूळे असली तरी भारतात कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांच्या स्लीपर सेलला धार्मिक संघटनांनीच हातभार लावला. दहशतवाद उखडून फेकायचा असेल तर धार्मिक द्वेष पसरविणार्‍या संघटनांची तोंडे ठेचावी लागतील, तद्वतच सर्वसामान्य नागरिकांनीदेखील दहशतवाद रोखण्यासाठी अधिक जागृत राहण्याची गरज आहे. शेवटी हा देश आपला आहे. आपण कोणत्याही धर्माचे असलो तरी आपल्या सर्वांची सारखीच मालकी या देशावर आहे. सर्वांनी गुण्यागोविंदाने नांदण्यासाठी दहशतवादाचा बिमोड करावाच लागेल. रंग कोणताही असो, सर्व मिळून हा दहशतवाद सक्तीने निपटून काढू या!!
राज्यसभेत अंतर्गत सुरक्षेवरील चर्चेला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री पी.चिदंबरम् यांनी दहशतवादाबाबत तीन सत्य उघड केले होते. या सत्यांवर दहशतवादाविरुद्ध लढाई लढताना अधिक लक्ष देण्याची गरज त्यांनी प्रतिपादीत केली होती. गृहमंत्र्यांचे म्हणणे आहे, की गेल्या काही वर्षांपासून देशात दहशतवादी संघटनांनी पुन्हा एकदा तोंड बाहेर काढले असून, त्यांचे स्वतंत्र असे मॉड्युल विकसित झाले आहे. या संघटनांची विचारधारा, ध्येय काहीही असो, परंतु या संघटना देशात रक्तपात घडविण्यासाठी वाटेल ते करण्यास सज्ज झाल्या आहेत. सुरक्षा यंत्रणांविरुद्ध तीव्र टोकाची भूमिका घेताना, निरपराधांच्या मूळावर या संघटना उठल्या आहेत. याच दृष्टीकोनातून पुण्यातील जर्मन बेकरीमध्ये घडविलेला बॉम्बस्फोट, मुंबईत झालेले साखळी बॉम्बस्फोट आणि वाराणसीमध्ये झालेले स्फोट या घटनांप्रमाणेच मालेगाव व गोवा येथील स्फोट आणि काही राज्यांत पसरलेला नक्षलवाद या बाबी केंद्र सरकारसाठीच नव्हे तर समस्त देशवासीयांसाठी धोक्याची घंटा आहे. मुंबई, पुण्यातील स्फोटांच्या तपासाचे निष्कर्ष अद्याप बाहेर आलेले नाहीत, परंतु इंडियन मुजाहिदीनवर संशय ठाम असून, त्या दिशेने तपासाला गती आल्याचे तपासयंत्रणा ठामपणे सांगत आहेत. वास्तविक पाहाता, इंडियन मुजाहिदीन ही एकेकाळच्या कट्टरतावादी स्टुडंट इस्लामिक मुव्हमेण्ट अर्थात सिमी या संघटनेचेच सुधारित रुप आहे. त्याअर्थाने चिदंबरम् यांचे तीन सत्य आहेत. १) आपण जगातील सर्वात धोकादायक भागात राहत असून, ज्याचे शेजारी पाकिस्तान, अफगाणिस्तान हे दहशतवाद्यांचे सर्वात मोठे केंद्रबिंदू आहेत. २) दहशतवाद कोणत्याही एका धर्मापुरता सीमित राहिला नाही, तर तो आता डावे कट्टरतावादी, हिंदू दहशतवादी यांच्यापर्यंत जाऊन पोहोचला आहे. हिरवा दहशतवाद जेवढा घातक आहे; तेवढाच भगवा आणि लाल दहशतवाददेखील या देशाच्या मूळावर उठला आहे. ३) पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि नेपाळ या शेजारी राष्ट्रांकडे दहशतवादांविरुद्ध लढण्यासाठी कमकुवत यंत्रणा आणि राजकीय नेत्यांची अनेच्छा असल्याने केवळ या देशातूनच दहशतवादी भारतात येत नाहीत, तर आपल्या देशातदेखील दहशतवादी तयार होत आहेत. या विश्‍लेषणावरून काही बाबी प्रामुख्याने स्पष्ट होतात. कालपर्यंत आपण असे समज होतो, की दहशतवादी केवळ पाकिस्तानातूनच येत आहेत. तेथील लष्कर आणि आयएसआय ही गुप्तचर संस्था भारताला भळभळत्या जखमा देण्यासाठीच या दहशतवाद्यांचा वापर करते. ही बाब काहीअंशी खरी असली तरी दहशतवाद्यांचे इतरही उगम आहेत आणि ते अधिक भयावह आहेत. मुंबईत गत महिन्यामध्ये जेव्हा साखळी बॉम्बस्फोट झाले तेव्हा केंद्र सरकार अथवा राज्य सरकारमधील उच्चपदस्थांनी नेहमीप्रमाणे पाकिस्तानवर आगपाखड करून अंग झटकले नाही. नाहीतर असले स्फोट झाले, की या स्फोटांमागे पाकिस्तानचा हात आहे, हे पालूपाद भारतीय नेते लावून धरत असतात. मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट हे इंडियन मुजाहिदीन या भारतस्थित परंतु, सीमाबाह्य शक्तीद्वारे पर्यायाने पाकिस्तानातील दहशतवादी गटांद्वारे चालविल्या जाणार्‍या संघटनेनेच घडविले हे उघड वास्तव आहे. परंतु, पाकस्थित या दहशतवादी गटांकडून भारतात जसा रक्तपात घडविला जात आहे, तसाच रक्तपात पाकिस्तानमध्येदेखील घडवून आणल्या जात आहे. कालच पश्‍चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील सूती येथील जियारत शेख उर्फ हुसेन याला मुंबई पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) जेरबंद केले. हा दहशतवादी साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी जसा हवा आहे, तसाच तो मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याप्रकरणीदेखील हवा आहे. त्याच्या तपासातून काही धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत. पाकस्थित दहशतवाद्यांना स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात साहाय्य केल्या जात असून, प्रत्येक राज्यांत या दहशतवाद्यांचे स्लीपर सेल (स्थानिक गुप्त जाळे) तयार झाले आहेत. भारत हा विशाल आणि विविधतेने नटलेला देश आहे. या भल्यामोठ्या देशात दहशतवाद्यांना लपण्यासाठी भरपूर जागा असून, त्यांना मिळणारे स्लीपर सेलचे साहाय्य हे अतिधोकादायक आहे. दहशतवादाला कोणताही धर्म नसतो हे खरे आहे. अलिकडच्या काही दुर्घटना पाहाता, ही बाब प्रामुख्याने चव्हाट्यावर आली आहेच. दहशतवाद रोखण्यासाठी कोपर्‍या कोपर्‍यात पोलिस उभे करणे शक्य नाही. तसेच, प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणेदेखील शक्य नाही. ते परवडणारेही नाही. आपल्या येथील गुप्तचर यंत्रणा काही अमेरिका किंवा चीनसारखी सक्षम नाही. त्यामुळे दहशतवाद रोखण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनाच आता पुढाकार घ्यावा लागणार आहे. दहशतवाद केवळ हिरवाच असतो असे नाही. भगवा आणि लाल दहशतवाददेखील काही कमी नाही. लाल दहशतवादाने तर देशातील बहुतांश क्षेत्र व्यापले आहे. पोलिस, सुरक्षा जवान यांच्यासह सर्वसामान्य गरीब आदिवाशींचे बळीदेखील या दहशतवादाने आतापर्यंत घेतले आहेत. तो रोखणे आज तरी अशक्यप्राय झाले आहे. धार्मिक मुद्द्यांवर मते मागितल्यानेच या देशात दहशतवादाला खतपाणी घातले जाते. जोपर्यंत राजकीयनेते धार्मिक मुद्द्यांवर मते मागत राहतील, तोपर्यंत वेगवेगळ्या रंगाचे दहशतवाद या देशात फोफावत राहतील, हे दहशतवाद रोखायचे असतील तर आता राजकीय नेत्यांनीदेखील अधिक जबाबदारीने वागले पाहिजेत. राजकीय नेत्यांनी आता विकासाच्या मुद्द्यांवर भांडले पाहिजेत, गरिबी, आर्थिक समस्या आणि प्रगती हे मुद्दे घेऊन निवडणूका लढविल्या गेल्या पाहिजेत. राजकारण्यांनी धार्मिक मुद्दे घेऊन जनमत पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केला तर दहशतवादाला खतपाणी घालणारे वातावरण तयार होते, त्याचा फायदा दहशतवाद्यांना मिळतो. या देशाच्या सदृढ भवितव्यासाठी दहशतवाद आटोक्यात आणणे गरजेचे असून, त्यासाठी केवळ सुरक्षा यंत्रणाच नव्हे; तर सर्वसमावेशक प्रयत्न होणे म्हणूनच गरजेचे आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खसखसच्या शेतीचे वास्तव!